Skip to main content
x

किर्लोस्कर, आनंदीबाई शंकरराव

अज्ञाता

नंदीबाई किर्लोस्करांनी ‘अज्ञाता’ या नावाने कथालेखन केले. ‘प्रतिबिंब’ (१९४१), ‘अंतरंग’ (१९४२), ‘ज्योती’ (१९४४) हे कथासंग्रह आणि ‘नव्या वाटा’ हे नाटक प्रकाशित. आनंदीबाई मूळच्या पुण्याच्या वैद्य. अध्यापनशास्त्रातले शिक्षण पूर्ण झाल्यावर किर्लोस्करवाडीत अध्यापनाचे कार्य. साहित्यात रस असल्याने ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या कार्यात आणि लेखनात सहभाग. १९३२ सालात संपादक शंकरराव किर्लोस्कर यांच्याशी विवाह. दोघांचाही हा पुनर्विवाह होता, पण समाजाची टीका आनंदीबाईंनाच सहन करावी लागली. स्वतःच्या दुःखातून त्यांनी इतर स्त्रियांची दुःखे जाणून घेऊन त्यांच्या दुःखाला वाचा फोडणारे कथालेखन केले. विवाहानंतर ‘स्त्री’ मासिकाचे संपादन केले. त्या संबंधित लेखक आणि चित्रकार यांच्याशी चर्चा करून दिवाळी अंकाचे नियोजन करीत असत. वेश्यांच्या वेदनेची आणि अगतिकतेची कल्पना असल्यामुळे प्रत्यक्ष वेश्यावस्तीत जाऊन त्यांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. त्या अनुभवांवर आधारित असा ‘मगरीच्या मगरमिठीतून सुटका’ नावाचा लेख लिहिला. शोधक पत्रकारितेचे हे एक महत्त्वाचे उदाहरण!

आनंदीबाईंचे आजूबाजूच्या समाजाचे निरीक्षण सूक्ष्म आणि नेमके आहे. मनाचे डोळे उघडे ठेवून समाजात होणारे स्त्रियांचे शोषण त्या पाहतात. स्त्रियांची वंचना आणि दुर्दशा त्यांना पाहवत नाही. संसारातल्या लहान-लहान गोष्टीही स्त्रियांच्या अस्मितेवर आघात करतात, हे त्या आजूबाजूला रोजच पाहत होत्या. सुशिक्षित स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाणीव होऊनही जुन्या-पुराण्या रूढी-नियमांमुळे तिची होत असलेली परवड पाहून त्या व्यथित होतात. पतीच्या अहंकारामुळे पत्नीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व चिरडून जाते, याचे त्यांना फार दुःख होई. संसारातल्या अशा प्रसंगांवर आनंदीबाईंनी कथा लिहिल्या. स्त्रियांच्या मनातल्या निरनिराळ्या भावनांचा वेध नाजूकपणे घेतला. आपल्या कथेतून मध्यमवर्गीय जाणिवा प्रभावीपणे व्यक्त केल्या. स्त्रीजीवनाचे व मध्यमवर्गाचे अंतरंग उलगडून दाखवले.

त्यांच्या बहुतेक कथा स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधांतून निर्माण होणार्‍या गुंतागुंतीचा वेध घेतात. उदा. अशोकचे पत्नीवर प्रेम  आहे, पण चित्र काढण्यासाठी ती हेमकांताकडे जायला लागताच संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसते. मूल व्हावे म्हणून देवकी नवर्‍याचे दुसरे लग्न करून देते, तर ती नवी बायको देवकीलाच घराबाहेर काढते. सुलोचनाच्या लिखाणाला प्रोत्साहन देणारा तिचा नवरा तिला प्रसिद्धी मिळताच घटस्फोट देतो. दणकट स्वतंत्र व्यवसाय करणार्‍या जाईसारख्या विधवेला गावातल्या गुंडाशी पाट लावावा लागतो आणि त्याच्या जाचाने ती खंगून मरून जाते. अर्धवट शिक्षण घेतलेल्या अंबूच्या आयुष्याचे मातेरे होते. समाजाच्या दांभिकपणाला वैतागून कालिंदी पुनर्विवाहाला नकार देते. मुलाच्या घरी आश्रितासारखी पडून राहण्याची वेळ मावशीवर येते. मामाच्या लोभापायी पुष्पलतेला चित्रपटातला उच्छृंखलपणा सहन करावा लागतो. प्रौैढ कुमारिकेच्या प्रश्नाभोवतीही आनंदीबाईंनी कथा लिहिल्या. वेश्यांबद्दल त्यांना अपार सहानुभूती वाटे. बापूसाहेबांसारख्या लोकप्रिय नेत्याच्या तारुण्यातल्या भित्रेपणामुळे मंजुळेला शेवटी वेश्या व्हावे लागते. तारा नावाची वेश्या श्यामबरोबर पत्नीसारखी राहत असते, पण श्यामच्या पत्नीच्या हातून चूक घडताच तिला माफ करून ‘तिचा स्वीकार कर’ असे सांगून ती निघून जाते. समाजाच्या चालीरीतींवर त्या उपरोधाचे शस्त्र चालवतात. विद्याधरला एका जमीनदार विधवेशी लग्न करायचे असते, पण समाजाला उघड लग्न मान्य नाही, मात्र चोरटे संबंध मात्र चालतात. गरीब बायजाबाई कर्ज काढून शाळेतल्या नृत्यासाठी चंद्राला कपडे शिवून देते, पण नेत्याच्या लांबलचक भाषणामुळे नृत्य रद्द होते. श्रीमंत अक्कासाहेबांना गाणे अजिबात येत नसूनसुद्धा त्यांना दिगंबरला गाणे शिकवावे लागते, अन् गाणे येत असलेल्या रखमीला भिकारीण झाल्याचे पाहावे लागते.

आनंदीबाई किर्लोस्कर म्हणजे एका निरलस व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक होय. स्त्रियांच्या प्रश्नावरील या कथा मात्र जुळवलेल्या व रचलेल्या वाटतात. मूलभूत मानवी भावभावनांवर या कथा आधारीत नाहीत म्हणून रूढींवरच्या या कथा कालातीत होत नाहीत. पण आनंदीबाईंची तळमळ सच्ची असल्यामुळे या कथा मनाला स्पर्शून जातात. स्त्री-मनाचे आकलन दमदार असल्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व, तिचे सत्त्व आणि तिचे अस्तित्व हा त्यांच्या प्रत्येक कथेचा केंद्रबिंदू आहे. मेंदूच्या विकाराने त्यांचे अकाली निधन झाले.

- डॉ. अपर्णा लव्हेकर

किर्लोस्कर, आनंदीबाई शंकरराव