Skip to main content
x

कशाळकर, नागेश दत्तात्रेय

नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचा जन्म मालवणला झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे निधन झाले व वडिलांना विरक्ती आली. म्हणून नागेश व इतर भावंडांना त्यांनी सातार्‍याला, मुलांच्या मामाकडे सुपूर्त केले आणि त्यांनी कीर्तनकार म्हणून गावोगाव भ्रमंती केली. साताऱ्याला  न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना एक हुशार विद्यार्थी म्हणून नागेश कशाळकर परिचित होते. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांना अनेक पुस्तके पारितोषिके म्हणून मिळाली. साताऱ्याला शिकत असताना त्यांना संस्कृत आणि संगीत या दोन विषयांची गोडी लागली. सदर शाळेत ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात केलेले मदंगेबुवा ‘संगीत’ हा विषय शिकवीत होते. त्यांनी नागेश कशाळकरांना स्वतंत्र तालीम दिली आणि पंचवीस रागांतील वेगवेगळी धृपदे शिकवली.

पुढच्या शिक्षणासाठी नागेश पुण्याला आले. त्या वेळेला बालगंधर्वांची गायकी बहराला आली होती. बालगंधर्वांची संगीत नाटके बघून नागेश यांनी नाट्यगीतांचा अभ्यास केला. लहानपणापासून एकपाठी असल्यामुळे सगळी नाट्यगीते त्यांना बारकाव्यांसकट तोंडपाठ झाली. पुढे त्यांना याच अभ्यासाचा फायदा संगीताचा व्यासंग वाढवताना झाला. फर्ग्युसन महाविद्यालयामधून बी.ए. झाल्यावर एलएल.बी. करण्यासाठी ते नागपूरला गेले. याच काळात त्यांना संस्कृत साहित्याचीही गोडी लागली. त्यांना कोल्हटकरांसारख्या व्यासंगी संस्कृत पंडितांबरोबर पातंजल सूत्रांचा अभ्यास करण्याचीही संधी मिळाली.

नागेश यांनी वकिली व्यवसाय हा उपजीविकेचे साधन ठरवून यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या तालुक्याच्या गावी वास्तव्य केले. तेथे त्यांनी संगीताचा छंद मनापासून जोपासला. याच काळात त्यांचा शांताबाई आठल्ये यांच्याशी विवाह झाला. गावातील संगीतातल्या जाणकार लोकांना एकत्र करून त्यांनी संगीताचा रियाज सुरू केला. भातखंडे व इतर संगीतज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांचा त्यांनी अभ्यास केला. जुन्या संस्कृत ग्रंथांतून संगीतविषयक माहिती गोळा केली. संगीताची प्राचीन शिक्षणपद्धती कशी होती व आजच्या काळात ती कशी असावी याचा सखोल अभ्यास करून त्यांनी १९६४ साली ‘गांधर्व शिक्षा’ हे संगीत शिक्षणपद्धतीवरील पुस्तक लिहिले.

संगीताबरोबरच त्यांना संत साहित्याचीही आवड होती. महाराष्ट्रातील नामदेव, दासोपंत, एकनाथ, तुकाराम, रामदास अशा संतांच्या सांगीतिक योगदानावर त्यांनी ‘संगीत कला विहार’ मासिकात लेखन केले. सदर लेखमालेला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

पांढरकवडा या गावी कार्यक्रमाच्या शोधात येणार्‍या अनेक गायक व वादक यांच्या उतरण्याची सोय कशाळकर आपल्या घरी करत. त्या गायकांकडून मिळवलेले राग व चिजा ते आत्मसात करत व आपल्या मुलांना शिकवत. विविध घराण्यांच्या चिजा शिकविल्यामुळे समृद्ध गायकीचा वारसा त्यांच्या मुलांना मिळाला. अरुण कशाळकर, उल्हास कशाळकर आणि विकास कशाळकर ही त्यांची मुले त्यांच्याच तालमीत तयार झाली. नागेश कशाळकर हे गायक म्हणून प्रसिद्ध नसले तरी संगीतज्ञ व अभ्यासक म्हणून संगीत क्षेत्रात परिचित होते. जवळजवळ ३८ वर्षे अखंडपणे ‘संगीत कला विहार’ मासिकातून त्यांनी विपुल लेखन केले.

वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतर त्यांचा अध्यात्माकडे ओढा वाढला. चाळीस वर्षे दररोज केलेल्या ज्ञानेश्वरीच्या वाचनामुळे त्यांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली होती.  त्यावर त्यांनी साररूपाने ‘बालज्ञानेश्वरी’ ही छोटी, सहज समजेल अशी पुस्तिका लिहिली. परंतु त्यांचे मुख्य योगदान म्हणजे पातंजल सूत्रांवर त्यांनी साध्या, सोप्या भाषेत लिहिलेले भाष्य हे होय. वयाच्या नव्याण्णवाव्या वर्षी, पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलांनी ‘सुबोध पातंजल’ हे त्यांनी लिहिलेले भाष्य प्रकाशित केले.

       - विकास कशाळकर

कशाळकर, नागेश दत्तात्रेय