Skip to main content
x

कुलकर्णी, दत्तात्रय गुंडो

कुलकर्णी, डी.जी

           ‘डी.झी.’ (डी.जी.) कुलकर्णी यांचा जन्म कर्नाटकातील ‘शेडबाळ’ या खेडेगावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुंडोपंत होते. ते गावचे कुलकर्णी, तरीही घरची गरिबी होती. प्रतिकूल परिस्थितीतही ते शिकले, मॅट्रिक झाले. पुढे काही करण्यासाठी म्हणून मुंबईला आले आणि अचानक धनलाभ व्हावा तसे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे कलाविश्‍व त्यांना दिसले. चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी तेथे प्रवेश घेतला; परंतु १९४२ मध्ये सुरू झालेल्या असहकारितेच्या चळवळीत ते सहभागी झाले. त्यांना अटक झाली. तुरुंगवासात झालेल्या मारहाणीमुळे त्यांचा एक पाय कायमचा अधू झाला. परिणामी, कलाशिक्षण अर्धवट राहिले.

           भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर त्यांनी १९४९ मध्ये आपले कलाशिक्षण पूर्ण केले. १९५१ च्या दरम्यान अर्थार्जनासाठी ते ‘इंडियन एक्स्प्रेस ’ व ‘टाइम्स ऑफ इंडिया’त इलस्ट्रेटर म्हणून काम करत होते. त्यांचा विवाह १९५१ मध्ये झाला.

           डीझी कुलकर्णी हे स्वातंत्र्यपूर्व काळात उदयाला आलेल्या आधुनिक चित्रकारांपैकी एक होत. ‘फ्रीप्रेस’ गटातील वर्तमानपत्रांत येणाऱ्या त्यांच्या व्यंगचित्रांमुळे ‘डीझी’ या टोपणनावाने ते प्रसिद्धीला आले. मनस्वी चित्रकार, निर्मितिशील शिल्पकार आणि प्रयोगशील व्यंगचित्रकार म्हणून ‘डीझीं’नी कलाक्षेत्रात आपला असा एक ठसा उमटविलेला आहे. डीझींना वाचनाची, तसेच संगीताचीही आवड होती. ते कानडीमध्ये उत्कृष्ट कविता करत असत.

           त्यांनी १९७२ पर्यंत ‘फ्रीप्रेस’ व ‘नवशक्ति’ या वृत्तपत्रांतून व्यंगचित्रकार म्हणून काम केले. त्यानंतर तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी स्वतःला केवळ कलानिर्मितीस वाहून घेतले. स्वातंत्र्यसंग्रमात प्रत्यक्ष भाग घेऊनही डीझींनी स्वातंत्र्यसैनिकाच्या सवलती कधी स्वीकारल्या नाहीत.

           डीझींच्या सुरुवातीच्या चित्रांत लघुचित्रांचा आणि काही अंशी वास्तववादी चित्रणाचा थोडा प्रभाव जाणवतो. या काळात त्यांनी जलरंगात भरपूर काम केलेले दिसते. त्यानंतरच्या काळात मात्र वास्तववादाचा किंवा मिनिएचर्स पेंटिंगचा प्रभाव कमी झालेला दिसतो. या काळातली त्यांची चित्रे त्यांच्या मनस्वी व्यक्तिमत्त्वाची एक खास ओळख करून देतात.

           त्यांच्या चित्रांचे विषय अगदी साधेसुधे, नेहमीच्या जीवनातले असत. क्वचित कधी एखाद्या सणाचे चित्रीकरणही त्यांत दिसते. जे संवेदनशील मनाला भावेल, ते-ते त्यांच्या चित्रांत सहजपणे चित्रित झालेले दिसते. या काळात त्यांनी विदूषकाच्या जीवनावर रंगविलेली चित्रे कलादृष्ट्या अजोड ठरावीत अशीच आहेत. विदूषकाच्या जीवनातील विरोधाभासाचे चित्रण त्यांनी समर्थपणे केले आहे. त्यांच्या या प्रकारच्या चित्रांत रंगविलेपन अतिशय प्रभावी, कौशल्यपूर्ण आणि सहज केलेले आहे.

           त्यांच्या चित्रांत मानवाकृती असतात, अनेक वस्तूही असतात; पण त्यांना रंग, रेषा व आकारांतूनच आशयाप्रमाणे संस्कारित केलेले दिसते. त्यामुळे त्यांची चित्रे ‘इलस्ट्रेशन’ न वाटता ‘पेंटिंग’ बनतात. अलीकडे, १९९० मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचे एक मोठे प्रदर्शन भरले होते. हेब्बर, आरा, गायतोंडे, पळशीकर, हुसेन यांसारख्या स्वतःच्या समकालीन चित्रकारांवरील आपली ‘व्यंग’ लघुचित्रे त्यांनी येथे प्रदर्शित केली होती. कलाजगतात ती गाजली.

           एक उत्तम चित्रकार असूनही त्यांची प्रदर्शने फारशी झाली नाहीत. अनेकांगी कल्पनाशक्ती आणि कलासिद्धी असूनही त्यांना म्हणावी तेवढी लोकप्रियता किंवा प्रसिद्धी मिळाली नाही. मुंबईतील आधुनिक कलावंतांच्या प्रगतिशील पिढीतील ते एक कलावंत; पण यांपैकी कोणत्याही गटात ते स्थिरावले नाहीत.

           ‘फ्री प्रेस’मधून निवृत्त झाल्यावर ते शिल्पकलेकडे वळले आणि त्या काळात त्यांनी चित्रांपेक्षा शिल्पेच अधिक घडविली. डीझींनी शिल्पकलेचे पद्धतशीर शिक्षण घेतले नव्हते. आणि म्हणूनच या माध्यमात त्यांनी पूर्णपणे मुक्त आविष्करण केले. या शिल्पांत त्यांची स्वतःची अशी एक आदिम शैली दिसून येते. शिल्पांसाठी त्यांनी लालसर सॅण्डस्टोन, सीस्ट, सेलीकेरी इत्यादी वेगवेगळे दगड वापरले.

           डीझींच्या शिल्पांत आदिम मानवी चैतन्याची अनेकविध रूपे पाहायला मिळतात. स्त्री-पुरुष, मातृत्व, बाल्य अशा अनेक आदिबंधांचे प्रकटीकरण या शिल्पांतून सहजपणे झालेले दिसते. ही शिल्पे घडवताना माध्यमाची घनता, आकारांचा साधेपणा, ठसठशीतपणा यांना महत्त्व दिलेले दिसते. शरीरशास्त्राचा अचूक रेखीवपणा न दाखवता, आकाराच्या साधेपणात सौंदर्य आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्या त्या माध्यमाच्या पोताचा ते फार सुुंदर वापर करतात. त्यांच्या सगळ्याच शिल्पांत एक ‘आदिम भावनाशय’ मोकळा झालेला आहे. त्यामुळे त्यांची शिल्पे मुद्दाम घडवल्यासारखी वाटत नाहीत, तर सहजपणे घडल्यासारखी वाटतात.

           डीझींना कलावंत म्हणून अनेक पारितोषिके मिळाली. त्यांना १९६७ मध्ये ‘ललित कला अकादमी’चा राष्ट्रीय पुरस्कार आणि १९९० मध्ये  ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार मिळाला. त्यांचे १९९२ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे त्यांच्या सुविद्य पत्नी, सतारवादक अलका कुलकर्णी आहेत. त्यांची चित्रे व शिल्पे यांचा एक ट्रस्ट करण्यात आलेला आहे. या ट्रस्टतर्फे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील दोन होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कॉलरशिप देण्यात येते.

           डीझींची सर्व शिल्पे १९९७ साली बेळगाव जवळील ‘कुद्रेमणी’ येथील आशानंद फार्ममध्ये, तर १९९९ मध्ये सर्व चित्रे चेन्नई येथील लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो कंपनीच्या आवारात कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात आलेली आहेत.

- ज्योत्स्ना कदम

कुलकर्णी, दत्तात्रय गुंडो