Skip to main content
x

कुलकर्णी, मनोहर बाळकृष्ण

       प्रा.डॉ. मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी ह्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या येवले तालुक्यातील नगरसूल गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक नगरपालिकेच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण ज्यु. स. रूंग्टा विद्यालयात झाले. नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयामधून संस्कृत व मराठी विषय घेऊन ते एम. ए. झाले. १९५९ मध्ये मुंबईच्या महाविद्यालयामधून त्यांनी बी. एड. पदवी मिळविली. १९७४ मध्ये ते पीएच. डी. झाले. ‘ब्राह्मणिक मायथॉलॉजी :अ स्टडी बेस्ड ऑन सिक्स इम्पॉर्टंट ब्राह्मणस्’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

     १९५३ मध्ये नाशिक रोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतरची दहा वर्षे रत्नागिरीच्या र. प. गोगटे महाविद्यालयात ते व्याख्याता, सहायक प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करीत होते. नंतर ते नाशिकला परत  आले व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक व नाशिक रोड येथील महाविद्यालयात एकवीस वर्षे वरिष्ठ व्याख्याता म्हणून कार्यरत होते. संस्कृत व मराठी हे त्यांचे अध्यापनाचे विषय होते. इंग्रजी, संस्कृत व मराठी साहित्याचा गाढा व्यासंग, प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व ह्यामुळे उत्तम प्राध्यापक म्हणून त्यांचे नाव झाले. संस्कृतच्या अभ्यासामुळे मराठी व्याकरण, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान, प्राचीन मराठी वाङ्मय ते उत्कृष्ट रीतीने शिकवीत. सलग सदतीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात ते विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मार्गदर्शन करीत होते. नंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली.

     महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी लेखनास सुरुवात केली. १९४९ मध्ये ‘हिंद’ मासिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली व त्यानंतर प्रसाद, विवेक, बलवंत, किर्लोस्कर, अमृत, बहुश्रुत अशा मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत राहिल्या. ‘नव्याने रामकथा गाऊं’, ‘उपनिषदांतील कथा’, ‘भारतातील धार्मिक विविधता’, ‘मनू आणि स्त्री’, ‘भाषाविज्ञानाचे स्वरूप आणि व्याप्ती’ ही त्यांची काही पुस्तके त्यांच्या विविधांगी प्रतिभेचे व प्रगाढ व्यासंगाचे दर्शन घडवितात. ‘महाभारतातील व्यक्तिरेखा’, ‘भासाची जळालेली नाटके’ ह्यासारख्या त्यांच्या लेखमाला संस्कृतमधील साहित्यकृतींचा वेगळ्या दृष्टिकोनातून वेध घेतात. सर्वांसाठी विशेषत: किशोरवयीन मुलांसाठी ‘सुभाषित विचार’ही मूल्ये रुजविणारी माला होती. विविध नियतकालिके, वृत्तपत्रे ह्यातून त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध झाले आहे. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदांतून त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. यादवपूर (कोलकाता) अधिवेशनात ‘उषस् इन ब्राह्मणाज्’, उज्जैन अधिवेशनात ‘दि कन्सेप्ट ऑफ इम्मॉर्टेलिटी इन द ब्राह्मणाज्’ हे त्यांचे निबंध गाजले. २००१ मध्ये नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

     हे सर्व करीत असताना अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांना अध्यक्ष, सदस्य म्हणून त्यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण मंडळ, भगूर ह्या संस्थेचे कार्याध्यक्षपद त्यांनी वीस वर्षे सांभाळले. या काळात संस्थेच्या विकासाला दिशा व गती त्यांनी दिली आणि भगूर देवळाली परिसरातील एक नावाजलेली शिक्षणसंस्था नावारूपास आली. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे ते बारा वर्षे सदस्य व तीन वर्षे उपकार्याध्यक्ष होते. आकाशवाणीवरही त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारित झाले व होत असतात.

     प्रा. डॉ. म. बा. कुलकर्णी ह्यांच्या ह्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील  कार्याचा गौरव नाशिक प्राच्य विद्यापीठाने ‘संस्कृत विभूषण’ उपाधी प्रदान करून व नाशिकच्या शिक्षक गौरव समितीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन केला. त्यांनी ‘मराठी अन्याय निवारण समिती’ स्थापन केली आहे. एका चळवळीचे स्वरूप ह्या समितीच्या कार्यास प्राप्त झाले आहे.

- प्रा. सुहासिनी पटेल

कुलकर्णी, मनोहर बाळकृष्ण