Skip to main content
x

कुलकर्णी, रामचंद्र नरहर

शंकराचार्य विद्याशंकर भारती

    रवीरपीठ (कोल्हापूर) अधिपती पू. जगद्गुरू शंकराचार्य विद्याशंकर भारती म्हणजेच पूर्वाश्रमीचे रामचंद्र नरहर कुलकर्णी (कऱ्हाडकर) यांचा जन्म कोळे - नरसिंहपूर, जि. सांगली येथे झाला. रामचंद्रबुवांचे वडील नरसिंहपूर येथे नरसिंहाची पूजा आणि शेती करून राहत होते. नरहरबुवा स्वरभास्कर बखलेबुवा यांचे शिष्य व बालगंधर्व व मा. कृष्णराव यांचे संगीत शिक्षणातील सहाध्यायी होते. बुवांच्यामुळे घरातील धार्मिक संस्कार, संगीताचा व कीर्तनाचा वस्तुपाठ त्यांच्यावर झाला होता. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर पुढे त्यांचा विवाह होऊन त्यांना पाच मुलगे व दोन मुली अशी अपत्ये झाली.

     नरहरबुवा यांनी आपली स्वरवाणी संपूर्ण जीवनभर कीर्तन सेवेसाठी खर्ची घातली. लहान वयातच रामचंद्रबुवांचे मातृछत्र हरपल्यामुळे नरहरबुवांनी माता-पिता व गुरू या भूमिकेतून रामचंद्रबुवांना स्थिरता प्राप्त करून दिली. पुढे रामचंद्रबुवांचा विवाह झाला. त्यानंतर १९४२ च्या ‘भारत छोडो’ या आंदोलनात क्रांतिवीर नाना पाटील यांच्याबरोबर ते चळवळीत सहभागी झाले. पाटलांच्या सहवासात त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाचे कार्य केले. तथापि, वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘कऱ्हाडकर कीर्तन पठडी’ सुरू ठेवली. सन १९४३ ते १९५३ दरम्यान त्यांनी वडिलांबरोबर पेटी वाजवून साथ दिली. सन १९५३ ते १९५६ दरम्यान सलग चार वर्षे श्री चंद्रेश्वर मंदिर, ऑपेरा हाउस, मुंबई येथे चातुर्मास केल्याबद्दल त्या मंदिराच्या वतीने गोविंद आफळे यांच्या हस्ते व रामचंद्र शिरवळकर यांच्या उपस्थितीत ‘सुवर्णपदक’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. १९६७ साली नरहरबुवा निवर्तले. पुढे संपूर्ण जबाबदारी रामचंद्रबुवांवर आली. आता त्यांनी कीर्तनाच्या निमित्ताने गावोगावी कीर्तन-सुगंध पसरविला. महाराष्ट्र, गुजरात,मध्य प्रदेशात सर्वत्र त्यांनी कीर्तन सेवा केली. यातूनच ते विरागी बनू लागले.

     यातूनच पुढे त्यांची भेट उगारचे यती महाराज यांच्याशी झाली. आध्यात्मिक विचार अंतर्मुख झाले. त्यांनी दोन वेळा गायत्री पुरश्चरण केले. रोज श्री गुरुचरित्र वाचन, दत्तोपासना सुरू होती, ती दृढ झाली. त्याबरोबर गणेश उपासनाही सुरू होती. ते काही काळ कऱ्हाडला  राहिले म्हणून त्यांना ‘कऱ्हाडकर बुवा’ म्हणून ओळखू लागले. समाजात ते एक प्रतिष्ठित नाव झाले. समाजावर त्यांचा प्रभाव होता. एक अत्यंत मार्मिक, हजरजबाबी, विनोदी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होता. प्रपंचाबरोबर त्यांनी धर्मकार्य केले, समाजकार्यही केले. त्यांनी कीर्तन क्षेत्रात अनेक विद्यार्थी तयार केले, उदा. दत्ताबुवा घाग, जोगळेकर, गोखले असे अनेक नामांकित कीर्तनकार आहेत. एकूण विरक्त वृत्तीला यतिमहाराज उगार यांचे मार्गदर्शन मिळून दि. १२ मार्च १९८३ रोजी त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला व त्यांचे नाव विद्याशंकर भारती हे झाले. त्यांनी करवीर पीठाची प्रतिष्ठा स्वप्रयत्न व त्यागी वृत्तीने वाढविली. त्यांना चिलये महाराज व बेळगावचे हरिकाका यांचेही कृपाशीर्वाद लाभले. पीठाधीश या नात्याने त्यांनी आवश्यक असणारे ज्ञान यतिमहाराजांकडून घेतले. शास्त्रधर्माचेही ज्ञान घेतले.

     विद्याशंकर भारती यांनी करवीरपीठ मठाचा जीर्णोद्धार केला. या काळात यशवंत काशिनाथ कुलकर्णी (अप्पा कुलकर्णी) शिरटीकर हे मठात आचार्यांबरोबर सेवा साहाय्यक होते. (तेच विद्यमान श्री शंकराचार्य विद्यानृसिंह भारती होत.) त्यांनी आचार्यांबरोबर राहून सर्वत्र संचारही केला.

     श्री शंकराचार्य विद्याशंकर भारतींनी आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचे कार्य केले. विश्व हिंदू परिषदेबरोबर राहून हिंदू धर्माच्या जागरणाचे कार्य केले. त्यांनी हिंदू समाजातील समष्टी जीवनात समतोल ठेवून तो तेजस्वी आणि धर्मशील बनविण्याचे कार्य केले. सुमारे वीस वर्षे सतत संचार करून करवीर पीठास देशात एक श्रेष्ठ व जागृत धर्मपीठ म्हणून नावलौकिक प्राप्त करून दिला. आचार्यांनी कारगिल युद्धाच्या वेळी, लातूर भूकंपाच्या वेळी सर्वप्रथम तेथे पोहोचून मठाच्या वतीने मदत केली. रामजन्मभूमीच्या वेळी अनेक साधू- संतांना एकत्र केले. नवनवीन उपक्रम राबविले. धर्मांतरे रोखली. ज्यांची धर्मांतरे झाली होती, त्यांना परत हिंदू धर्मात आणले. आचार्य हे लोकमान्य शंकराचार्य होते. त्यांनी समाजात सक्रिय सहभाग घेतला. आचार्य पदावर असूनही एक सुजाण नागरिक म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या समाजकारणात भाग घेतला होता.

    वंदनीय आचार्यांनी हिंदू धर्मात समाज जागृती करून संघटन केले. जीवनात एक आदर्श, धैर्य, सहानुभूती, सहिष्णुता या दैवी गुणांनी समाजात वस्तुपाठ निर्माण केला. कोणत्याही संकटाला न घाबरता तेजस्वी व विजिगीषू वृत्तीने जगात ‘जगद्गुरू’ हे नाव सार्थकी ठरविले. अशा विचारांचा प्रभाव व प्रत्यक्ष कृतीवर आचार्यांचा विशेष कटाक्ष होता.

    आचार्यांनी श्री विद्यानृसिंह भारती यांच्याकडे  २००५ साली पुढील कार्यासाठी सूत्रे दिली व ‘क्षेत्रसंन्यासी’ म्हणून पुढे ते करवीर पीठात राहिले आणि  करवीर क्षेत्रातच देह सोडला.

- डॉ. अजित कुलकर्णी

कुलकर्णी, रामचंद्र नरहर