Skip to main content
x

कुलकर्णी, सोनाली व्यंकटेश

अभिनेत्री
 

राठी, हिंदी व इंग्रजी नाटके, मराठी, तमिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी, इटालियन चित्रपट हे जणू काही कमीच म्हणून की काय,   नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन, दैनिकांतून सदर लेखन अशी बहुआयामी, प्रतिभावंत, सक्षम अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. मुक्ता’, ‘देवराई’, ‘रेस्टॉरंट’, ‘दोघीअशा चित्रपटातून स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध करणार्‍या सोनाली यांनी अभिनयाचे पहिले पाऊल टाकले ते गणेशोत्सवातून.

संदीप कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी या दोन भावांमुळे सोनाली यांचा अभिनयाकडचा ओढा वाढत गेला. याच काळात आई सुचिता व वडिलांच्या प्रोत्साहनामुळे सोनाली कुलकर्णी नऊ वर्षे माणिक अंबिके यांच्याकडे भरतनाट्यम् शिकल्या.

चित्रपटात येण्यापूर्वी सोनाली यांची कारकिर्द नाटकमय होती. नाटकात काम करण्याबरोबरच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या सोनाली यांनी पुण्यातल्या मानाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी मंजूनावाचे नाटक लिहिले आणि दिग्दर्शितही केले होते, अर्थात अभिनयासह. या नाटकातल्या त्यांच्या भूमिकेचे दिग्गजांकडून विशेष कौतुक झाले. याच दरम्यान प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड त्यांच्या नव्या चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. कर्नाड यांच्या चित्रपटाकरता सोनाली यांनी स्क्रीनटेस्ट दिली आणि चेलुवी’ (१९९२) या चित्रपटासाठी त्यांची निवड झाली. ही भूमिका एका झाडाची होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. या चित्रपटाने सोनाली यांना अभिनयाचे नवे दरवाजे उघडून दिले. यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत सोनाली यांचा प्रवेश झाला तो डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित मुक्ताया लक्षवेधी चित्रपटामध्ये. जब्बार पटेल यांच्या डॉ. आंबेडकरचित्रपटातही सोनाली यांनी रमाबाई आंबेडकर यांची ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत त्यांच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली.

अमोल पालेकर यांचा दायरा’, ‘कैरी’, सुमित्रा भावे यांचा दोघी’ (१९९४), ‘देवराई’, ‘घराबाहेर’, ‘रेस्टॉरंटहे सोनाली यांचे आवर्जून कौतुक करावे असे चित्रपट. या चित्रपटांना प्रेक्षकांची आणि जाणकारांचीही दाद मिळाली. मुक्ता’, ‘दोघी’, ‘देवराईया चित्रपटांसाठी सोनाली यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. दोघीचित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला.गाभ्रीचा पाऊस’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘देऊळहा सुवर्णकमळ विजेता चित्रपट हे त्यांचे आणखी काही महत्त्वाचे चित्रपट. प्यार तूने क्या किया’, ‘टॅक्सी नं.९.२.११’, ‘मिशन कश्मीर’, ‘दिल चाहता हैहे हिंदी चित्रपटही सोनाली यांच्या नावावर जमा आहेत. दिल चाहता हैया गाजलेल्या चित्रपटातील वो लडकी है कहाँया लोकप्रिय गाण्याने सोनाली यांनाही देशभरातल्या हिंदी चित्रपट रसिकांमध्ये प्रसिद्धी लाभली. २०१२ मध्ये त्यांनी सिंघमया चित्रपटात प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याच्या बायकोची केलेली भूमिका लक्षणीय ठरली.

ब्राईड अ‍ॅन्ड प्रेज्युडीसहा सोनाली यांनी ऐश्वर्या रॉय यांच्यासोबत केलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट. फुको डी सु मेअर्थात फायर ऑट माय हार्टया इटालियन चित्रपटात सोनाली यांना प्रख्यात हॉलिवूड अभिनेता ओमर शरीफ यांच्यासमवेत भूमिका करण्याची संधी मिळाली. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना मिलान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चाहूलहे सोनाली कुलकर्णी यांचे पहिले व्यावसायिक नाटक होय. या नाटकात त्यांनी तुषार दळवी यांच्यासोबत काम केले. नको रे बाबा’, ‘सखाराम बाईंडरया नाटकातून भूमिका करणार्‍या सोनाली कुलकर्णी समन्वयया त्यांच्या नाट्यविषयक ग्रुपद्वारे मराठी रंगभूमीशी जोडून आहेत. याचबरोबर त्यांनी बसंत का तिसरा यौवन’, ‘सर सर सरलाया हिंदी नाटकांमधूनही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हिरोया चित्रपटात त्यांनी डॉ. मंदा आमटे यांची महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित कोकणस्थ’ (२०१३) आणि स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘माधुरी’ (२०१८) या चित्रपटांतील आईची भूमिका त्यातील बारकाव्यांनिशी सोनाली कुलकर्णी यांनी ताकदीने साकारून पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

प्रादेशिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून भूमिका, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी चौफेर कामगिरी करणार्‍या सोनाली यांनी दैनिकातून केलेल्या स्तंभलेखनाचे सो कूलहे पुस्तकही प्रसिद्ध आहे. सतत वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासपूर्वक करणार्‍या आणि अभिनयक्षेत्रात नवनवे टप्पे ताकदीने पादाक्रांत करणार्‍या सोनाली त्यांच्या चतुरस्र अशा वेगळेपणासाठी चित्रपटसृष्टीत कायमच ओळखल्या जातील.

- स्वाती प्रभुमिराशी

संदर्भ :
संदर्भ - १) प्रत्यक्ष मुलाखत.