Skip to main content
x

कुंटे, महादेव मोरेश्वर

         साताऱ्याजवळ माहुली गावी गरीब भिक्षुक घराण्यात यांचा जन्म झाला. बारा वर्षांपर्यंतचे आयुष्य उनाडपणात काढून ते कोल्हापुरास पळाले. तेथे मराठी व इंग्लिश शिक्षण घेतले आणि आपले सहाध्यायी (रा.सा.) विठ्ठलराव पाठक, (रा..) बाबाजीराव सामंत यांच्याबरोबर पुढील अभ्यासाकरता मुंबईला आले. पण जवळची पुंजी लवकरच संपल्याने यांना परत जावे लागले. १८५९ मध्ये ते पुन्हा मुंबईला गेले आणि मॅट्रिक झाले व १८६४ साली बी.. झाले. सिंधमधील कराची हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी त्यांची नेमणूक झाली. तिथल्या दोन वर्षांच्या वास्तव्यात ते सिंधीचे वाकबगार पंडित झाले. सिंधीचे मॅट्रिकचे परीक्षक म्हणूनही  त्यांनी काम केले. त्यानंतर ते कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक झाले. तेथे चार वर्षांत संस्कृतचे अध्ययन करून ते व्याकरण, अलंकार, न्याय वगैरे शास्त्रांत निष्णात झाले. तेथेच यांनी तत्कालीन राजाराम छत्रपतींच्या मृत्युविलापाचे काव्य केले (१८७१). तेथेच राजा शिवाजी’, ‘मनही काव्ये लिहून प्रसिद्ध केली. त्यानंतर १८७१ साली त्यांची नेमणूक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून झाली. पुण्याला नेमणूक झाल्यापासून मधल्या दोन वर्षांखेरीज (१८७९-८०) ते सोळा वर्षे पुण्यालाच राहिले. मधल्या दोन वर्षांपैकी सहा महिने मुंबईला एल्फिस्टनमध्ये संस्कृतचे प्राध्यापक व पुढे अहमदाबाद महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य या पदावर त्यांची नेमणूक झाली. यापूर्वीच त्यांनी मीमांसाशास्त्राचा अभ्यास केला. आपल्या ज्ञानाचा फायदा षड्दर्शनचिंतनिका’ (१८७७) या मासिकाद्वारे लोकांना देण्यास यांनी सुरुवात केली. त्यात हे इंग्लिश व मराठी अशा दोन्ही भाषांत लिहीत. त्यावरून त्यांचे शास्त्रांतील नैपुण्य सहज दिसून येते.

इटलीच्या विद्वत्परिषदेकडून आर्य लोकांच्या हिंदुस्थानातील सुधारणाक्रमांचा इतिहासलिहिणार्यास बक्षीस देण्याचे प्रसिद्ध झाले, तेव्हा ते बक्षीस मिळवण्याच्या हेतूने कुंटेंनी व्हिसिसिट्यूडस् ऑफ आर्यन् सिव्हिलिझेशन इन इंडिया’ (आर्यसंस्कृतीची स्थित्यंतरे) या नावाचे एक मोठे पुस्तक लिहून ते रोम येथे पाठवले आणि ते बक्षीस मिळवले. कुंटे यांच्या विद्वत्तेची व शोधक बुद्धीची ओळख पटवण्यास हे पुस्तक पुरेसे आहे.

त्यांनी मुंबईला जाण्यापूर्वी ऋषिनावाचे इंग्लिश काव्य केले. त्याची इंग्लिश कवींनीही स्तुती केली. १८७६-७७ साली दुष्काळ पडला, त्याला अनुसरून त्यांनी फॅमिश्ड व्हिलेजया नावाचे इंग्लिश काव्य करून प्रसिद्ध केले. त्यांनी हिंदुस्थानभर प्रवास केला होता. १८७८ पर्यंत ते पुण्यातील प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते व अध्वर्यू होते. पण यांचे मतान्तर होता होता ते पूर्ण वारकरी सांप्रदायाचे बनले. ते शेवटी रोज एक तास चाळ बांधून हातात चिपळ्या व वीणा घेऊन घाम निघेपर्यंत भजन करत.

त्यांचे लक्ष औद्योगिक गोष्टीकडेही गेल्यामुळे त्यांनी सूर्यशलाकानावाचा शिसपेन्सिलीचा कारखाना काढला. त्यात काही वर्षे घालवल्यावर त्यांचे लक्ष संगीतशास्त्राकडे वेधले गेले. त्याचाही खोल व्यासंग केल्यावर भारतीय संगीत श्रेष्ठ असल्याची त्यांची खात्री झाली. गायन समाजाचे काम ते मोठ्या आस्थेने करत. शेवटच्या काळात त्यांचे लक्ष भूगर्भशास्त्राकडे वेधले होते. पुणे नगरपरिषदेचे ते सभासद व अध्यक्ष होते. त्यांना अनेक भाषा येत आणि त्या भाषांत ते मोठे रसाळ वक्तृत्व करू शकत. थोडक्याच दिवसांत परकी भाषा तिच्यातील सफाईदार रचनेसह आत्मसात करणे हा त्यांचा मोठा गुण होय. मराठी भाषेतील त्यांचे वक्तृत्व निःसंशय मेजवानीसारखे असे. त्यांचे भाषण साधे पण विविध माहितीने भरलेले, रसाळ पण विस्तृत असे. ग्रंथांप्रमाणे भाषणे जतन करण्याची कला आपल्याकडे नव्हती याबद्दल चुटपूट लागल्याशिवाय राहत नाही. त्या वेळच्या पंडिती वळणांतील विद्वानांत त्यांच्या शिवाजीवगैरे काव्याची आणि त्यातील नव्या साध्या मराठी वळणाची टरच उडवण्यात आली. संस्कृत शब्दांचा व अलंकारांचा सोस सोडून, अस्सल व्यावहारिक भाषेत काव्य करण्याची प्रथा पाडून नवीन युगाच्या प्रवर्तकत्वाचा मान यांनी आपल्याकडे घेतला आहे. इंग्लिश वळणावरची कविता त्यांच्यानंतर सुरू झाली.

संपादित

कुंटे, महादेव मोरेश्वर