Skip to main content
x

खाँ, अल्ला

अल्लारखाँ

        उ. अल्लारखाँ यांचा जन्म जम्मू प्रदेशातील फगवाल नामक छोट्या खेड्यात झाला. आपल्या सात भावंडांत ज्येष्ठ असणाऱ्या उ.अल्लारखाँ यांचे व्यक्तिमत्त्व बालपणापासूनच वेगळे होते. लहानपणी ते प्रवासी संगीत नाटक कंपन्यांचे प्रयोग बघत आणि त्यांत वाजणाऱ्या तबल्यात रमत असत. वयाच्या अकराव्या वर्षी ते लाहोरला आले. तिथे पंजाब घराण्याचे खलिफा उ. मियाँ कादरबक्ष यांच्याकडून त्यांनी तबल्यातील पंजाब घराण्याचे रीतसर शिक्षण घेतले.
लवकरच उ.अल्लारखाँ उत्तम तबलावादक म्हणून नावाजले जाऊ लागले आणि त्यांना लाहोर नभोवाणी केंद्रावर तबला कलाकार म्हणून नोकरी मिळाली. तिथून त्यांची दिल्लीला बदली झाली आणि दिल्लीहून १९४५ च्या आसपास ते मुंबईला आले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांची कर्मभूमी ही मुंबईच राहिली.
उ. अल्लारखाँ यांनी पतियाळा घराण्याचे श्रेष्ठ गायक उ. आशिक अली खाँ यांच्याकडून संगीताचेही सखोल शिक्षण घेतले होते. ते गायन आणि तबलावादन या दोन्ही कला पेश करीत असत. त्यांच्या कल्पक स्वरविलासाचा सुरुवातीला त्यांच्यावर अधिक अंमल होता असे जाणवते. ते हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणूनही यशस्वी झाले. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या पंचवीसेक चित्रपटांतील ‘माँ-बाप’, ‘घर की लाज’, ‘सबक’, ‘सती अनसूया’, ‘खानदान’ आदी चित्रपटांनी रौप्यमहोत्सवापर्यंत मजल मारली. संगीत दिग्दर्शन कार्यात ते जरी यशस्वी होत होते, तरी त्यांचे मन तबलावादनात गुंतले होते आणि त्यांनी तबलावादनावर लक्ष केंद्रित करायचे ठरविले.
तबल्यावरील कठोर रियाज, प्रतिभा, नवनिर्मिती, गायनकलेचे ज्ञान या गुणांमुळे आपल्या समकालीन ज्येष्ठ तबलावादकांमध्ये चतुरस्र तबलावादक म्हणून त्यांनी तरुणपणीच एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. कंठसंगीताची साथ, वाद्यसंगीताची साथ, कथक नृत्याची साथ आणि एकल तबलावादन या चारही शाखांमध्ये उ. अल्लारखाँ अत्यंत निपुणपणे आणि समर्थपणे आपली कला सादर करीत असत. त्यामुळे स्वदेशात आणि परदेशांत त्यांना दिगंत कीर्ती प्राप्त झाली.
उ. अल्लारखाँ यांचा बहुतांश तबला हा स्वनिर्मित होता. त्यांची पेशकार संकल्पना संपूर्णपणे स्वनिर्मित होती. ‘पेशकार’ शब्दाची फोड ते ‘पेंच काटना’ अशीही करत असत आणि म्हणून त्यांचा पेशकार हा पेच निर्माण करणारा आणि पेच काटणारा असा होत असे.
केवळ त्रितालच नव्हे, तर अन्य तालांतही आकर्षक रूपसौष्ठवाचे कायदे त्यांनी बांधले आहेत, जे आजचे तबल्याचे विद्यार्थीसुद्धा वाजवतात.
उ. अल्लारखाँ यांनी अत्यंत आकर्षक अशा लयबंधांचे अनेक छंद (चलने) बांधले, ज्या छंदांची नंतर ते रव (रेले) करीत असत. संपूर्ण संगीतात ‘तिहाई’ हा प्रकार प्रस्तुत होतच असतो. परंतु उ. अल्लारखाँ निर्मित ‘तिहाई’ हा एक नवनिर्मितीचा अनोखा यशस्वी प्रयोग होता. विविध शब्दांच्या, आकारांच्या आणि विशेष म्हणजे विविध विरामकालांच्या आकर्षक तिहाईंची निर्मिती, ते प्रत्येक तालात करीत असत. गत तुकड्यांमध्येही त्यांची निर्मिती ही बहुमोल अशीच होती. दुपल्ली, त्रिपल्ली,
  फर्माइशी चक्रदार आणि कमाली चक्रदार या बंदिश प्रकारांमध्ये त्यांनी अनेक सुंदर बंदिशी, अनेक तालांमध्ये बांधल्या.
उ. अल्लारखाँ यांनी पं. रविशंकरजींना जवळजवळ तीस वर्षे साथसंगत केली. अल्लारखाँ यांनी अत्यंत परिश्रमाने एक अनोखे, आकर्षक आणि अद्भुत असे संगीताचे नवे तंत्र निर्माण केले. वाद्यसंगीताच्या साथसंगतीचे हे तंत्र तबलावादन कलेतील उ. अल्लारखाँ यांचे एक महत्त्वपूर्ण योगदानच म्हणता येईल.
पं.रविशंकर आणि कधीकधी सरोदवादक उ.अली अकबर खाँ यांच्याबरोबर उ.अल्लारखाँ संगत करीत असताना, ते आपल्या वादनात ‘सवाल-जवाब’ पद्धतीचे प्रस्तुतीकरण करीत असत. हा ‘सवाल-जवाब’ खूपच उत्स्फूर्त, कलापूर्ण आणि चैतन्यकारक असा होत असल्यामुळे तो अत्यंत लोकप्रिय तर झालाच होता; पण त्या पद्धतीचे अनुकरण आज सर्वत्र होत असलेले पाहावयास मिळते. पुढे आपले पुत्र आणि शिष्य उ. झाकीर हुसेन यांच्याबरोबर त्यांनी युगल तबलावादनाचे (जुगलबंदी) असंख्य कार्यक्रम जगभरात सादर करून अमर्याद लोकप्रियता प्राप्त केली.
लयीचे सूक्ष्म विभाजन करणे आणि त्यामध्ये शब्दबंधाचे प्रयोग करणे यात त्यांचे मन रमत असे. सरळसोट लयीमध्ये वादन करण्यात त्यांना विशेष रस नव्हता. लय व लयकारीची विविध रूपे आणि अनोख्या लयीत बांधल्या जात असलेल्या विविध बंदिशी यांचा ते आस्वाद घेत असत. त्यावर अविरतपणे मनन व चिंतन करीत असत आणि या प्रक्रियेत त्यांची कायम तंद्री लागलेली असे. यातूनच त्यांच्याकडून नवनवीन बंदिशी निर्माण होत गेल्या. नवनवे चलनात्मक छंद निर्माण होत गेले. त्यांची ही निर्मितीची क्रिया त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत चालूच राहिली होती.
उ. अल्लारखाँ यांच्या विचारांवर त्यांचे गुरू उ. मियाँ कादरबक्ष यांचा विशेष पगडा असणे स्वाभाविकच होते. पण असेही म्हणतात की त्यांच्यावर दिल्ली घराण्याचे उ. नथ्थू खाँसाहेब यांचाही प्रभाव होता.
वादक आणि रचनाकार म्हणून ते जेवढे मोठे होते, तितकेच ते गुरू म्हणूनही मोठे होते. आपल्या मुलांना आणि शिष्यांना त्यांनी दुर्मीळ अशी पंजाब घराण्याची शास्त्रोक्त तालीम गुरू-शिष्य पद्धतीने दिली. आपल्या विद्येचा लाभ तबल्याच्या सर्व उत्सुक विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांनी १९८५ साली ‘उ. अल्लारखाँ इन्स्टिट्यूट ऑफ म्यूझिक’ ही संस्था मुंबईत स्थापन करून तेथे विद्यादानाचे काम केले. त्यांचे सुपुत्र आणि शिष्य, उ. झाकीर हुसेन हे वडिलांकडून मिळालेली विद्या आणि असामान्य वादनप्रभुत्व यांच्या जोरावर तबलावादक म्हणून विश्वविख्यात झाले आहेत. उ. अल्लारखाँ यांचे अन्य सुपुत्र फजल कुरेशी आणि तौफिक कुरेशी यांनाही त्यांनी तबल्याची दीक्षा दिली.
 
उ. अल्लारखाँ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार (१९७७), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८२), ‘इंडो-अमेरिकन अचीव्हमेंट’ पुरस्कार,  ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले.

सुधीर माईणकर

खाँ, अल्ला