Skip to main content
x

खाँ, मंजी

यपूर-अत्रौली घराण्याचे अध्वर्यू अल्लादियाखाँ साहेबांच्या तीन पुत्रांपैकी मधले पुत्र मंजी खाँ होते. तिघांपैकी मधले म्हणून मंजी खाँ हे नाव पडले. त्यांचे मूळ नाव बद्रुद्दीन होते. बालवयापासूनच संगीताचे पायाशुद्ध व खास गायकीचे शिक्षण, धृपद गायकीची तालीम मंजी खाँनी आपले चुलते हैदर खाँ यांच्याकडून घेतली.

अल्लादिया खाँसाहेब १८९५ साली आपल्या दोन मुलांना घेऊन कोल्हापूरला आले. त्यांना शाहू महाराजांचा आश्रय मिळाला. मंजी खाँचे बालपणापासूनचे आयुष्य कोल्हापुरात व नंतर मुंबईत गेले. कोल्हापुरातच त्यांना रहिमत खाँचे गाणे ऐकण्याची संधी मिळाली. हे गाणे त्यांना आवडले व त्यांच्या गायकीवर त्याचा परिणामही झाला. त्यांच्या गायनात रहिमत खाँची गायकी दिसायला लागली. अल्लादिया खाँसाहेबांना ही बाब पसंत नव्हती. त्यामुळे त्या दोघांत वितुष्ट आले. याचाच परिणाम म्हणून ऐन उमेदीत मंजी खाँनी गाणे सोडून दिले होते. त्यांनी सात वर्षे कोल्हापूर दरबारात जंगल अधिकारी म्हणून नोकरी केली. बापूसाहेब कागलकर या हितचिंतकाने मोठ्या प्रयासाने त्यांचे मन वळवून त्यांना पुन्हा गायनाकरिता प्रवृत्त केले. शाहू महाराजांनी त्यांच्याकरिता संगीत अधीक्षक (म्युझिक सुपरिन्टेंडंट) या हुद्द्याची जागादेखील निर्माण केली.

मंजी खाँ यांचा आवाज अत्यंत निकोप, मधुर, सुरेल व भावपूर्ण होता. त्यांच्यापाशी घराण्याचा वृथा अभिमान  नव्हता. त्यामुळेच आपल्या घराण्याच्या गायकीव्यतिरिक्त इतर घराण्यांच्या गायकीचे विशेषही आपल्या गायनात ते सहजपणे अंतर्भूत करत होते. रहिमत खाँच्या प्रभावाबरोबरच नत्थन खाँ आग्रेवाले यांचेही काही विशेष त्यांच्या गायनात दिसून येत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धृपद-धमार, ख्याल, होरी या प्रकारांबरोबरच मराठी पदे व ठुमरीही ते रसिलेपणाने व भावपूर्ण गायचे.

गोविंदराव टेंबे लिखित ‘गानमहर्षी अल्लादिया खाँचे चरित्र’ या पुस्तकात ‘मंजी खाँ हे गायन क्षेत्रातील विवेकानंद होते’ असे म्हटले आहे. अल्लादिया खाँची सामान्य श्रोत्यांना आकलन न होणारी बिकट व पेचदार अशी गायकी अगदी सामान्य श्रोत्यांनादेखील आकर्षक वाटेल अशा ढंगांनी, निरनिराळ्या रूपांत, अगदी सहजपणे मांडून त्या गायकीला त्यांनी लोकप्रिय केले. मंजी खाँ काही दिवस कलकत्त्यात राहिले होते. तिथे त्यांच्यावर पूरब अंगाच्या ठुमरीचे संस्कारही झाले. हा रंगदेखील त्यांच्या गाण्यात होता.

सुरुवातीला कोल्हापूर व नंतर मुंबईत म्हणजेच महाराष्ट्रातच त्यांचे आयुष्य गेले असल्यामुळे मराठी भाषेवर त्यांचे मातृभाषेइतकेच प्रेम होते. त्यामुळे मराठी कवींची ‘ऐकव तव मधुबोल’सारखी पदे ते अत्यंत भावपूर्ण रितीने गात असत. त्यांनी १९३० ते १९३५ च्या दरम्यान आपल्या सुमधुर गायनाने मुंबईकरांची मने जिंकली होती. अत्यंत रसिकवृत्तीचा, स्वच्छ मनाचा व दिलदार गायक म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंजी खाँचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी निधन झाले. पं. मल्लिकार्जुन मन्सुरांना त्यांची चांगली तालीम मिळाली होती.

माधव इमारते

खाँ, मंजी