Skip to main content
x

खोत, चंद्रकांत गणपत

     चंद्रकांत खोत यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून ते एम. ए. झाले. १९६० नंतरच्या ‘लघुनियतकालिके’च्या चळवळीतून खोत वाचकांसमोर आले. पाश्चात्त्य संगीतात बिटल्स ग्रुपने बंड केले, त्याप्रमाणे मराठी साहित्यात ‘लिटल मॅगेझिन’वाल्यांनी बंड केले.

      १९९३ साली प्रकाशित झालेल्या ‘बिंब-प्रतिबिंब’ कादंबरीत त्यांनी स्वतःच्या लेखन-प्रवासाचे उल्लेखनीय टप्पे नमूद केले आहेत. त्यात त्यांचे स्वतःचेही प्रतिबिंब स्पष्ट उमटले आहे. ‘मूलतः कवी’ असलेले खोत म्हणतात, “माझी लढाई माझ्याशीच आहे. ही लढाई कधीही संपू नये असं मला वाटतं.” त्यांनी कथाही लिहिल्या, कादंबर्‍याही लिहिल्या. खोतांच्या शब्दांत, “कथाकार म्हणून मला फारसं कुणी ओळखत नाही. कादंबरीकार म्हणून लोक मला थोडंफार ओळखतात, झालं.” चाकोरीबाहेरचे लेखनच त्यांना अधिक भावते. त्यामुळे त्यांची पहिली कादंबरी ‘उभयान्वयी अव्यय’ खूप गाजली. काहींना ती विकृत, काहींना अश्लील वाटली तर काहींना ती तशी वाटली नाही. दि.के.बेडेकर, पं.महादेवशास्त्री जोशी, पु.ल.देशपांडे यांनी खोतांच्या लिखाणाला दाद दिली. कुरुंदकरांनी म्हटले, “तुमच्या साहित्यातलं हे वळण वेगळं आहे.” त्यांनी १९७७ साली ‘उभयान्वयी अव्यय’ ही कादंबरी लिहिली व १९९३ मध्ये ‘बिंब-प्रतिबिंब’. दोन्हींमध्ये बर्‍याच वर्षांचा काळ लोटला. दोन्ही कादंबर्‍यांचे विषय भिन्न, तरी दोन्ही चाकोरीबाहेरच्या. अवघ्या दीन-दलितांसाठी तळमळत राहिलेले ‘विवेकानंद’, हा विषय त्यांनी ‘बिंब-प्रतिबिंब’मध्ये घेतला. या कादंबरीचे नाव त्यांना ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील ‘उटूनि दोन्ही आरसे’ या ओवीवरून सुचले.

     खोत स्पष्ट शब्दांत लिहितात, ‘एवढेच सांगतो ‘बिंब-प्रतिबिंब’ ही विवेकानंदांच्या जीवनकार्यावरील आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. हळूच सांगतो: ‘बिंब-प्रतिबिंब’ ही अनोखी कादंबरी मी लिहिली नाही. ‘तुमची सुखाची कल्पना काय?’ असा जर कुणी मला प्रश्न विचारला, तर मी उत्तर देईन.... ‘बिंब-प्रतिबिंब’ या कादंबरीची निर्मिती!’

     समीक्षेविषयी ते परखडपणे म्हणतात, “समीक्षेत असायला हवं ते हे की, लेखकानं जो विषय हाताळला तो किती समर्थपणे हाताळला? त्यानं विषयाला किती न्याय दिला? त्याची ती कृती किती खोलवर वाचकाच्या मनाला जाऊन भिडली. हे जर मान्य केलं तर ‘उभयान्वयी अव्यय’ आणि ‘बिंब-प्रतिबिंब’ यांची समीक्षा करायला बसताना मार्ग स्वच्छ होतात.”

     ‘मर्तिक’ (१९६९), ‘अपभ्रंश’ (१९७३) हे कवितासंग्रह; ‘बिनधास्त’ (१९७२), ‘दुरेघी’ (पूर्वी लिहिलेल्या दोन लघु कादंबर्‍यांचे एक पुस्तक, १९८१) ही चंद्रकांत खोत यांची महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा.

     ‘अबकडई’ या दिवाळी अंकाचे त्यांनी काही वर्ष  संपादन केले. 

- वि. ग. जोशी

खोत, चंद्रकांत गणपत