Skip to main content
x

खोटे, शुभा नंदू

          शुभा नंदू खोटे या अभिनेत्रीने साकारलेली त्यांची प्रतिमा अधिकांश हिंदी चित्रपटविश्वाशी निगडित आहे. मराठीतील सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते नंदू खोटे यांची ती मुलगी. चित्रपटाच्या सुरुवातीपासून अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दुर्गा खोटे याच परिवारातील. शुभा खोटे यांनी मुंबईतल्या सेंट तेरेसा कॉन्व्हेंट स्कूलमधून, विल्सन महाविद्यालयामधून शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन आयुष्यात शुभा खोटे यांनी हौसेखातर नाटकांमधून भूमिका केल्या. पण याच काळात सायकलिंग आणि पोहणे यातही त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. महाविद्यालयीन जीवनातच शुभमंगलया अनंत मानेंच्या चित्रपटाद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. यात सूर्यकांत त्यांचे सहकलाकार होते. हा चित्रपट फारसा चालला नाही, पण त्यामुळेच श्रेष्ठ दिग्दर्शक अमिया चक्रवर्तींचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि त्यानंतर शुभा खोटेंकडे चालून आली ती सीमामधील भूमिका.

दुर्गा खोटेंच्या पावलावर पाऊल ठेवून शुभा खोटेही हिंदी चित्रपटसृष्टीत आल्या त्या अशा. पुढे अर्थातच त्या हिंदीत छान स्थिरावल्या. शुभा खोटेंच्या डोळ्यांमध्ये दडलेल्या सततच्या मिस्कील भावामुळे त्यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारच्या विनोदी स्त्री अभिनेत्रीचा पायंडा निर्माण केला. अमिया चक्रवर्तींच्या देख कबीरा रोयाया चित्रपटातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पेईंग गेस्टचंपाकलीया चित्रपटांमधील भूमिकांमुळे शुभा खोटेंची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. याच सुमारास विनोदी अभिनेता मेहमूदबरोबरच्या भूमिकांमुळे त्यांच्या जोडीचा जमानाच सुरू झाला. ससुराल’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘भरोसाया काही चित्रपटांमधून ही जोडी रसिकांच्या कायम लक्षात राहिली. दीदीया चित्रपटात शुभा खोटे यांना जरा वेगळी भूमिका मिळाली. दीदीमध्ये सुनील दत्त नायक होते. त्यातील तुम मुझे भूल भी जाओहे गाणे पडद्यावर साकार करणाऱ्या शुभा खोटे आजही स्मरणात आहेत. शुभा खोटेंची एक दूजे के लिएमधील भांडखोर स्त्रीची भूमिका लक्षणीय होती. त्यांनी बेनाम’, ‘मिलीया चित्रपटांमधून केलेल्या चरित्रभूमिकाही महत्त्वपूर्ण होत्या.

शुभा खोटे यांचे रानपाखरं’, ‘उमज पडेल तर’, ‘माझा पती करोडपती’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘आधार’, ‘या मालक’, ‘चिमुकला पाहुणाहे काही मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले. त्यांचे वडील नंदू खोटे यांनी या मालकहा चित्रपट निर्माण केला होता. चिमुकला पाहुणाया चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन खुद्द शुभा खोटे यांचेच होते.

सध्या शुभा खोटेंचा एक मुलगा अमेरिकेत असतो, तर दुसरा मुलगा चित्रपटसृष्टीतच ध्वनिमुद्रक म्हणून कार्यरत आहे. कन्या भावना (बलसावर) विनोदी बाजाच्या भूमिका करीत आहेत. शुभा खोटेंचे भाऊ विजू खोटे हे लोकप्रिय विनोदी अभिनेते म्हणून परिचित होतेच.

मोठ्या एकत्रित कुटुंबातील मुक्त, हसतखेळत वातावरणामुळे शुभा खोटे हे जे व्यक्तिमत्त्व तयार झाले, ते त्यांनी तसेच पडद्यावर साकारले.

- जयंत राळेरासकर

खोटे, शुभा नंदू