Skip to main content
x

खरात, शंकरराव रामराव

     शंकरराव खरातांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी या खेडेगावात झाला. ते हिंदू धर्मातील अस्पृश्य जातीतील. त्यांचे वडील लाकूडफोड्या रामा महार म्हणून गावाला परिचित होते. ग्रामव्यवस्थेतील ते वतनी महार. विषमतेच्या वातावरणाशी सामना करीत, अस्पृश्यतेचे चटके खात कलेश्वराच्या देवळात भरणाऱ्या प्राथमिक शाळेत ते शिकू लागले. येथूनच ते चौथी उत्तीर्ण झाले. त्यानंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण औंध येथे झाले, तर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून बी.ए. झाले. त्यानंतर १९४७-४८ साली वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, वकिली व्यवसायास प्रारंभ केला. याच सुमारास १९५५ साली त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी डॉक्टर .

     शंकरराव खरातांचा वकिलीचा व्यवसाय होता. तो व्यवसाय त्यांनी सामाजिक जाणिवेतूनच निवडला व समाज ऋण म्हणून आयुष्यभर निष्ठापूर्वक जोपासला. दलित जीवनाच्या भयंकर झळा त्यांनी प्रत्यक्ष भोगल्या होत्या. त्या भोगत असतानाच महारांवर लावल्या जाणार्‍या चॅप्टर केसेसमुळे ते हैराण झाले. चॅप्टर केस लढविण्यासाठी  महारांजवळ वकिलास देण्यासाठी पैसा नसायचा; परिणामी महारांचा पराभव अटळ असे. आपल्या बांधवांना या खटल्यांतून न्याय मिळवून देण्याच्या उच्च हेतूने खरातांनी वकिलीची परीक्षा दिली व वकिली व्यवसायास प्रारंभ केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक प्रभावामुळेही त्यांना हा व्यवसाय अधिक महत्त्वाचा वाटला. वकिली करत असताना दलितांप्रमाणे विमुक्त-भटक्या जमातींशीही त्यांचे संबंध आले. त्यांच्यावर लादले जाणारे खोटे गुन्हे व त्यांची आत्यंतिक दैन्यावस्था पाहून ते अत्यल्प मोबदल्यात अथवा विनामूल्य मार्गदर्शन करायचे. त्यामुळे उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास मोठा हातभार लागला व खरातांविषयी त्यांच्या मनात विश्वासाची व आदराची भावना निर्माण झाली. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनपासून ते विमुक्त भटक्यांच्या संघटना व सक्रिय सहभागापर्यंत त्यांची कार्यकक्षा विस्तारत गेली.

     खरातांच्या जीवनविषयक जडण-घडणीत बाबासाहेब त्यांचे  दिव्याप्रमाणे मार्गदर्शक ठरले... त्यामुळेच ते बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणारे एक कार्यकर्ते बनले. उपेक्षित जगाला न्याय मिळवून देण्याच्या व्रतस्थपणातून त्याचा प्रत्यय येतो. विद्यार्थी असतानाच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. वकिली व्यवसायामुळे ती फलद्रूप झाली. याच कालावधीत त्यांनी जबाबदारीची विविध पदेही सांभाळली.

     १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भूमिगत कार्यकर्त्यांना सायक्लोस्टाइल केलेली पत्रके ठरलेल्या खासगी जागी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. १९५४ साली मुंबई, नायगाव येथील पुरंदरे स्टेडिअमवर दलित फेडरेशन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते सहभागी झाले. १९५४ पासून शेडयुल्ड कास्ट फेडरेशनचे ते संघटक कार्यवाह झाले. १९५८-५९ मध्ये ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक, पी.एन. राजभोज यांच्या ‘दलितबंधू’चे ते सहसंपादक झाले. १९५२पासून कामगार चळवळीत त्यांचा प्रवेश झाला. त्याचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम सांभाळले. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ह्या संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य, डायरेक्टर, बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स सिलेक्शन कमिटी, बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष, रेल्वे सर्व्हिस कमिशन, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष पुणे विद्यापीठाचे सदस्य इत्यादी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून १० जानेवारी १९७५ ला मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली.  १९८४ साली जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 

     अशा विविध सामाजिक कार्यांशी निगडित असतानाच त्यांचा व्यासंगही वाढत गेला. तथाकथित लेखकांच्या दलित जीवनावरील कथा-कादंबर्‍या वाचनात येऊ लागल्या; पण त्या उपर्‍या, कृत्रिम अनुभवांवर आधारित असल्याचे जाणवू लागले. म्हणून आपणच आपले अनुभव लोकांपुढे मांडण्याचा निर्धार त्यांनी केला. या जाणिवेतूनच खरातांनी लेखन सुरू केले व १९५६-५७ च्या ‘नवयुग’ दिवाळी अंकात ‘सतूची पडीत जमीन’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. तर  १९५७-५८च्या दिवाळी अंकात ‘माणुसकीची हाक’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची साहित्यसाधना अखंडपणे चालू राहिली. प्रतिनिधित्वाच्या काळात आचार्य अत्रे ह्यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले. आचार्य अत्रेंच्या प्रोत्साहनाने अंकुरलेल्या साहित्यबीजाचा आता वटवृक्ष झाला व कथा, कादंबरी, वैचारिक, सामाजिक, ललित, समीक्षात्मक, चरित्रात्मक, आत्मकथनात्मक, ऐतिहासिक अशा बहुरूपी फळाफुलांनी तो बहरत राहिला. 

      शंकरराव खरात सर्वार्थाने उपेक्षितांच्या वेदनेचे भाष्यकार होते. त्यासाठीच त्यांची प्रतिभा फुलली, बहरली. त्यामुळे मराठी कथा समृद्ध करण्याचे मोठे श्रेय त्यांना आहे. ‘बारा बलुतेदार’ हा त्यांचा कथासंग्रह १९५९ साली प्रसिद्ध झाला. या कालावधीत ग्रामीण साहित्याची चळवळ बहरू लागली होती. माडगूळकरादिक कथा-कादंबरीकार ग्रामीण जीवनाचे चित्रण करीत होते. मराठी प्रतिभावंतांना नवे आकाश गवसल्याची साक्ष पटत होती. पण सारे आकाश अजून त्यात प्रतिबिंबित झाले नव्हते. गावगाड्यातील गावकुसाबाहेरील व उघड्या आकाशाखालील पठारी जीवन अजून त्यापासून कोसो अंतरावर होते. जे होते ते लेखनपूर्व आत्मनिष्ठेच्या अभावाचे अपत्य. काही महत्त्वाची नावे सोडल्यास बहुतांश लेखन असेच. पण याच सुमारास खरात, अण्णाभाऊ, गाडगीळ, माडगूळकर, गोखले यांसारख्या काही समकालीन लेखकांनी मराठी वाङ्मयाचा कायाकल्प करून टाकला. अण्णाभाऊंनी व खरातांनी तर आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून लेखन-प्रपंच सुरू केला नि ग्रामीण कथेला खर्‍या अर्थाने व्याप्तीचे वेध लागले.

     १९५९ पासून १९८७ पर्यंत खरातांचे अकरा कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. ते सर्वच उपेक्षितांच्या जीवनाला, त्यांच्या  अन्यायाला, वेदनेला, गुन्हेगारीला अन् गुन्हेगारी प्रवृत्तीला हात घालतात. त्यांच्या वेदनेचे अंतरंग उलगडण्याचे यशस्वी प्रयत्न करतात.

     समाजव्यवस्थेचे बळी ठरलेले गाव कामगार, त्यांची अवस्था, परंपरेच्या जाचाखाली चिरडले जात असताना नि दारिद्य्राचा शाप भोगताना भुईसपाट झालेल्या तरीही परिस्थितीला शरण जाऊन अंधारवाटेचे निमूट बळी झालेल्या मानव समूहांच्या या कथा आहेत. त्या साकार करताना भयाणभूत वास्तवाचा प्रत्यय आपल्याला येतो. खरात आपली मते पात्रांवर लादत नाहीत. त्यांना बोलू देतात, मन मोकळे करू देतात. तशी कथा खुलत जाते आणि फुलत जाते. परिणामी कथेची आशयघनता शब्दागणिक वाढत जाऊन आगळ्या वेदनांच्या अनुभवाने वाचक भारावून जातो. ही कथा मनाला सारखी टोचणी लावते. बेचैन करते. या संदर्भात डॉ. इंदुमती शेवडे म्हणतात, “त्यांची कथा संदेश देते. विदारक भाष्य करते. ती नेटकी, आटोपशीर व एकेरी बांधणीची असते, मथळ्यापासून अखेरपर्यंतचे संवाद सुटसुटीत व नेमके असतात व एकूणच कथा कलात्मक असते.” तर वा.ल कुळकर्णी यांनी खरातांच्या कथेवर प्रकाश टाकताना म्हटले आहे की, “खरातांच्या कथेेत प्रामाणिकपणा आहे, वास्तवाची विलक्षण कदर आहे, वर्णनाचा बारकावा आहे, अनुभूतीची धार आहे.”

     शंकरराव खरात विद्यार्थी असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी झपाटले गेले. पुढे त्यांचा प्रदीर्घ सहवासही त्यांना लाभला. त्यामुळे खरातांची वाङ्मयीन जाण परिपक्व बनली. परिणामी फक्त गावकुसाबाहेरील अस्पृश्यांची व्यथा चितारीत न बसता गाव शिवेपलीकडे गुन्हेेगार व भटक्या जमातींचे जीवनही साकार करू लागले. बारा बलुतेदारांच्या जीवनाचा वेध घेताना मांग, महार, रामोशी, कुंभार, चांभार, कोळी, परीट, न्हावी, सुतार, लोहार सोनार, गुरव या ग्रामसंस्थेशी बांधलेल्या; पाटील, पांडे, सवर्ण या उच्चवर्णीयांच्या जाचाने त्रस्त झालेल्या; दारिद्रय, अंधश्रद्धा अज्ञान, अशिक्षितपणा यांनी नखशिखांत नागविलेल्या मानवसमाजाप्रमाणेच उचल्या, वैदू, माकडवाला, बेलदार, कैकाडी, मांगगारुडी, भामटी, गारुडी, पारधी अशा कितीतरी उपेक्षित गुन्हेगार जातींच्या वेदनेला ते मूर्तरूप देतात. स्वातंत्र्य मिळाले, प्रत्येकाला प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्या; तरी आजही अनेक जीव प्रगतीपासून दूरच आहेत. त्यांच्या भाळावर कोरलेला गुन्हेगारीचा शिक्का अजूनही पुसला गेला नाही. कुटुंबाची वाताहत, तुरुंगाच्या वार्‍या, पोलिसी अत्याचाराने येणारे अपंगत्व, बायका-मुलांचा आक्रोश हे सारे खरातांच्या कथेत ओतप्रोत भरले आहे. त्यांची वेदना शब्दबद्ध करताना खरातांची लेखणी गतिमान होत जाते व ती विलक्षण तेजाने तळपत असल्याची साक्ष पटते. अन्यायग्रस्त दलितांच्या व भटक्या स्त्री यांच्या त्यांनी चितारलेल्या जीवन संघर्षाने तर वाचक मंत्रमुग्ध होतो. लाचारगती जीवनामुळे शरीरविक्रय करणारी व त्याच्याविरुद्ध संघर्ष करत पुढे जाणारी प्रौढा नि कुस्करल्या जाणार्‍या अगतिक कळ्या म्हणजे वाचकांना सुन्न करणारी कथा. पण खरातांचा संयम ढळत नाही. त्यांच्या कथेत कुठेही उघडे-नागडे चित्रण नाही. अतिरंजित संवाद नाहीत. शिवराळपणा नाही की आक्रस्ताळेपणा नाही. अधूनमधून विद्रोहाच्या ठिणग्या उठतात पण त्यांचा प्रत्यय सररास येत नाही. खरातांच्या संयमी व्यक्तिमत्त्वाचा तो प्रभाव असावा.

     ग्रामीण साहित्याची चळवळ भरभराटीत असतानाच खरातांनी लेखनकार्यास प्रारंभ केला. याच दरम्यान म्हणजे  १९६० च्या सुमारास दलित साहित्याची चळवळही नावारूपास आली. डॉ. आंबेडकरांच्या युयुत्सू विचारातून प्रेरणा घेऊन दलित साहित्य उदय पावले. त्याच्या दैदीप्यमान रूपाने मराठी विश्व चकित झाले. त्यातील आकांताने आणि विद्रोहाने तर मराठी साहित्याला नावीन्य बहाल केले. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करीत मराठी साहित्याच्या विचारपीठावर ते रुजू झाले व उपेक्षितांच्या अनुभवांना साद घालू लागले. या वाङ्मयीन चळवळीपासून स्फूर्ती घेऊन उपेक्षित जगातील अनेक लेखक आपले विदारक अनुभव अभिव्यक्त करू लागले.

      दलित साहित्याच्या जन्मापूर्वीच खरातांच्या लेखन-प्रवासास प्रारंभ झाला होता. त्यामुळे ग्रामीण व प्रादेशिक साहित्याशी त्यांच्या साहित्याची तुलना होऊ लागली. तसेच अस्पृश्य वर्गातील व आंबेडकरी प्रभावातील असल्यामुळे दलित साहित्याशीही त्यांचे नाते जोडले गेले. पण खरातांनी समीक्षकांना संभ्रमात टाकले. कारण कुण्या एका प्रवाहाशी त्यांचे साहित्य बांधील राहिले नाही. ग्रामीण कथेचा बाज राखीत, दलित साहित्याच्या कथा विस्तारत त्यांचे साहित्य सर्वार्थाने आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ लागले. त्यामुळे ‘या दोन्ही वाङ्मयीन प्रवाहांशी समन्वय साधून त्यांच्यातील दुवा सांधण्याची मौलिक कामगिरी खरातांनी केली.’ या विधानाची साक्ष त्यांची कथा पटविते.

     नवयुग १९५७-५८ च्या दिवाळी अंकात त्यांची ‘माणुसकीची हाक’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि खरातांच्या कादंबरी लेखनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांचे कादंबरी लेखन अव्याहत सुरू होते. त्यांच्या कादंबर्‍यांचे विषयही उपेक्षित समाज, भटके, गुन्हेगार, झोपडपट्टी व वकिली व्यवसाय ह्यांवर आधारित असेच आहेत. आजपर्यंत त्यांच्या दहा कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत व विपुल कादंबरीलेखन त्यांनी केले.

     १९८१ साली खरातांचे ‘तराळ-अंतराळ’ हे स्वकथन प्रसिद्ध झाले; तेव्हा त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली होती. साठ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवांचा हा आलेख. अस्पृश्य जीवनाच्या अनुभवजन्य चित्रणापासून सामाजिक जीवनापर्यंत आणि प्रगतीच्या व मानसन्मानाच्या अत्युच्चपदावर पोहोचेपर्यंतच्या, वाचकांना बेचैन करणार्‍या प्रवासाचा तो शब्दरूप आविष्कार! बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन प्रकाशाच्या वाटेने निघालेल्या मानवसमूहाची काहाणी! स्वतःची जीवनकथा सांगता-सांगता आपल्या समाजाचीच, अस्पृश्य जीवनाचीच कथा त्यांनी सांगितली. परिणामी ती ‘स्टोरी ऑफ दी अनटचेबल्स’ झाली. याचा प्रत्यय प्रस्तुत स्वकथनातून तर येतोच; पण एक अस्पृश्य-तरळाचा पोर संधी मिळाल्यास कुलगुरुपदाच्या अंतराळापर्यंत झेपावू शकतो, याचीही ती कहाणी आहे. म्हणूनच ‘तराळ-अंतराळ’ने मराठी विश्वात प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केले; व विविध पुरस्कारांनी त्याचा गौरव केला. समीक्षकांनीही त्याचे भरघोस स्वागत केले. ‘तराळ-अंतराळ’मधून सुटलेले दुवे सांधण्याचा प्रयत्न म्हणजे १९८९ साली प्रसिद्ध झालेले ‘जागल्या’ हे पुस्तक होय.

     खरातांनी विपुल वाङ्मय-निर्मिती केली. त्यांचे चरित्रबंधात्मक लिखाण म्हणजे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात’ (१९८२), ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा’ (१९८७) हे ग्रंथ होत.  बाबासाहेबांचे युयुत्सू व्यक्तिमत्त्व, त्यांची समाजनिष्ठा, समता-स्वातंत्र्य मूल्यावरील विश्वास, त्यांचे मानव-मुक्तीचे प्रयत्न यांचा वेध यातून घेतला आहे. तर ‘अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर’, ‘आज इथं उद्या तिथं’, ‘दलित साहित्याचे वेगळेपण’, ‘महारांचा इतिहास’, ‘भटक्या-विमुक्त जमाती व त्यांचे प्रश्‍न’ असे दर्जेदार वैचारिक लेखनही त्यांनी केले. यामागे सखोल अनुभवांचा आधार आहे, सामाजिक तळमळ आहे. त्या तळमळीतून व आंबेडकरी निष्ठेतून बाबासाहेबांच्या पत्रांचे संपादनही त्यांनी केले. 

     १९८४ साली संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खरात यांनी भूषविले आहे. 

     असे हे विविध आयामी व्यक्तिमत्त्व, अनुभवी कार्यकर्ता, सच्चा आंबेडकरवादी प्रतिभावंत, संयमशील कलाकृतीचा सर्जक. ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक बहुपैलू, साहित्यिक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ता’ अशा शब्दांत रा.ग.जाधवांनी त्यांचा उचित गौरव केला. अशा उपेक्षितांच्या वेदनांचा हा भाष्यकार वृद्धापकाळाने ९ एप्रिल २००१ रोजी कालवश झाला.

- डॉ. वासुदेव डहाके

खरात, शंकरराव रामराव