Skip to main content
x

लेले, वैजयंती दत्तात्रेय

      वैजयंती दत्तात्रेय लेले ह्या पूर्वाश्रमीच्या प्रभावती विनायक नेने. त्यांचे सर्व शिक्षण नाशिकमध्ये झाले. एन. इ. आय. गर्ल्स हायस्कूल मधून त्या एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी लेडिज टेलरिंग डिप्लोमा हा कोर्स पूर्ण केला. १९५५ मध्ये त्यांचा विवाह नाशिकमधील नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय. ना. लेले ह्यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली.

       त्या काळात नाशिकमध्ये कर्णबधिरांच्या शिक्षणाची कोणतीच सोय नव्हती. अशा मुलांसाठी असणाऱ्या आधुनिक शिक्षण पद्धतींची ओळख करून घ्यावी, त्यांचे श्रवणालेख काढण्याचे तंत्र आत्मसात करता यावे म्हणून डॉ. लेले व वैजयंती लेले इंग्लंडला गेले. तेथे लेस्टर, प्रेस्टन, ब्लॅकबर्ग, लंडन, ड्युसेलडार्फ इत्यादी ठिकाणच्या कर्णबधिर मुलांच्या शाळांना, केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. भारतात परत आल्यानंतर वैजयंतीताईंनी डॉ. लेले यांच्या दवाखान्यात येणाऱ्या प्रा. ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मिळविलेल्या तंत्राचा उपयोग कर्णबधिर मुलांसाठी करण्यास सुरुवात केली. डॉ. लेले यांच्या ‘आदिवासींची श्रवणशक्ती व संबंधित समस्या’ या प्रकल्पात वैजयंतीताई काम करू लागल्या.

      नाशिकमध्ये कर्णबधिर मुले व त्यांचे पालक यांच्यासाठी त्यांनी अनेक शिबिरे घेतली. पालकांच्या विनंतीवरून व डॉ. लेले यांच्या मातोश्री श्रीमती माई लेले यांच्या प्रेरणेने १९७५ मध्ये वैजयंतीताईंनी ‘श्री. माई लेले श्रवणविकास संस्थे’ची स्थापना केली. रचना विद्यालयाच्या एका खोलीत महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या वतीने शाळा सुरू झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या होती सात आणि वैजयंतीताई या एकच शिक्षिका. त्यांनी टीचर ऑफ डेफ ही पदविका मिळविली होतीच. कर्णबधिरांचे शिक्षण म्हणजे त्यासंबंधी लोकशिक्षण, व्यवसाय शिक्षण, संशोधन व ग्रामीण विकासासाठी योजना ह्या व्यापक विचारातून कर्णबधिरांच्या शिक्षणास सुरुवात झाली. नाशिक रोटरी क्लबने गु्रप श्रवण यंत्र, स्पीच ट्रेनर इत्यादी आधुनिक उपकरणांच्या स्वरूपात संस्थेस देणगी दिली. १९७७ मध्ये विद्यालयास सरकारी मान्यता मिळाली. विद्यार्थी संख्या वाढत गेली. १९७९ मध्ये वैजयंतीताईंनी वॉशिंग्टन येथील गॅलोडेट कॉलेजच्या-विश्वविख्यात-संस्थेच्या निमंत्रणावरून अमेरिकेचा दौरा केला. त्यात कर्णबधिरांचे शिक्षण, त्यांच्या समस्यांविषयी लोकशिक्षण, त्यांचे लैंगिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण पद्धती यांचा अभ्यास केला. लॉस एंजल्स येथील जगद्विख्यात ‘जॉन ट्रेसी क्लिनिक’ ला भेट देऊन ‘टपालाद्वारे कर्णबधिरांच्या पालकांच्या साहाय्याने त्यांचे शिक्षण’ या अभ्यासक्रमाची माहिती घेतली.

       विद्यालयाची विद्यार्थी संख्या एकशे चाळीसपर्यंत गेली. प्रशिक्षित शिक्षक नेमले. वैजयंतीताई शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. शाळेत पाचवीपर्यंत शिक्षणाची सोय होती. दृक्श्राव्य साधने, संगीतासाठी वाद्ये, स्लाईड शो, अशा शैक्षणिक साहित्याचा वापर होऊ लागला.

       इतर सामान्य शाळांसारखेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गणेशोत्सव, दहीहंडी, रक्षाबंधन असे कार्यक्रम होऊ लागले. सांस्कृतिक कार्यक्रमांतून मुलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे प्रयत्न स्वत: वैजयंतीताईंच्या नियोजनातून होऊ लागले. विविध स्पर्धांमध्ये मुले भाग घेऊन पारितोषिके मिळवू लागली. कलागुणांचा शोध घेण्याच्या हेतूने चित्रे, भेटकार्डे, स्टिकर्स तयार करण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यातून निधिसंकलनही होऊ लागले. वैजयंतीताईंनी स्वत: शिवणकामाचा डिप्लोमा घेतलेला असल्याने त्या शिवणकाम, कटिंग शिकवीत. त्यांना संगीताची जाण असल्याने त्या माध्यमातून शिक्षणात गोडी निर्माण करण्याचे प्रयत्नही होत होते. सहलींचा उपयोग नव्या अनुभूतीतून नवीन भाषासमृद्धीसाठी करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. सूर्यनमस्कार, योगाच्या शिक्षणातून विद्यार्थी शारीरिक व मानसिक दृष्ट्या आरोग्य मिळवू लागले. शिशुगटातील मुलांसाठी शाळापूर्व भाषा शिक्षण उपक्रम त्यांनी सुरू केला. बुद्ध्यांक अधिक असणाऱ्यांसाठी वाचनाची आवड व त्यातून संभाषणास उद्युक्त करण्याची योजना आखली. आज खाद्यपदार्थांची दुकाने, ग्राहक पेठ यांचा अनुभव ही मुले घेतात. साबण, फिनेल सारख्या वस्तूही तयार करतात.

       १९७९ मध्ये नाशिकला राज्यस्तरीय कर्णबधिरांच्या शिक्षकांचे शिबीर स्वत: वैजयंतीताईंनी घेतले.  एन.सी.ई.आर.टी. दिल्ली या संस्थेने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत संशोधन प्रकल्प सादर केले. या सर्व शैक्षणिक कार्यासाठी लायन्स क्लब, नाशिक नागरिक शिक्षक गौरव समिती अशा संस्थांच्या वतीने वैजयंतीताईंचा आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने अंध, मतिमंद मुलांबरोबरही कार्यक्रम करण्याची वेगळी योजना वैजयंतीताईंनी आखली, ती आजही प्रत्यक्षात येते. पालक मेळावे घेतले जातात. राज्यस्तरीय ‘ओष्ठवाचन स्पर्धा’ हा आणखी एक उपक्रम. १९८१ मध्ये वैजयंतीताईंनी ‘डॉक्टर, बाळ बोलत नाही!’ हा दूरदर्शन चित्रपट तयार केला. कर्णबधिरांचे निदान व शिक्षण ह्या विषयावरील मराठीतील हा पहिला चित्रपट. ‘चंद्रावरील ससा’ व ‘गंगामाय-गंगामाय’ या नाटिका त्यांनी लिहिल्या व सादर केल्या.

       आज वैजयंतीताईंच्या प्रयत्नातून नाशिकच्या मध्यवर्ती भागात सात हजार चौरस फुटांच्या जागेत माई लेले श्रवण विकास विद्यालयाची सुसज्ज इमारत उभी आहे. वर्गखोल्यांची रचना वेगळी असून प्रत्येक वर्गात आठ मुले बसतात. कर्णबधिर मुलांच्या गरजांचा विचार करून बांधलेली ही महाराष्ट्रातील एकमेव इमारत आहे. पाचवीपासूनच्या शिक्षणाची सोय रचना विद्यालयात आहे. एस. एस. सी. परीक्षेला आजपर्यंत पस्तीस मुले बसली व उत्तीर्ण झाली. अनेकजण सर्वसामान्य माणसाचे स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगत आहेत. कर्णबधिरांच्या शाळेसाठी विशेष शिक्षण प्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम सुरू करावा अशी वैजयंतीताईंची इच्छा आता पूर्ण झाली आहे.

      या महाविद्यालयास दिल्लीच्या भारतीय विकलांग पुनर्वसन संस्थेची मान्यता आहे. जलतरण तलाव, जिमखाना, वसतिगृह, शेतकीप्रधान अभ्यासक्रम, बागकाम शिक्षण या योजना वैजयंतीताईंसमोर होत्या. त्यातील काही प्रत्यक्षात आल्या आहेत.

- प्रा. सुहासिनी पटेल

लेले, वैजयंती दत्तात्रेय