Skip to main content
x

लिमये, प्रभाकर पुरुषोत्तम

     शिक्षणाबाबत लक्षणीय जागृती हा महाराष्ट्राचा, गेली अनेक दशकांपासूनचा, गुणधर्म आहे. मात्र राज्यातल्या शिक्षण प्रसारात बऱ्याच त्रुटी जाणवतात. यातली एक आहे ती शिक्षणापासून आजही वंचित राहिलेल्या समाज घटकांना, त्यांच्या दैनंदिन जीवनसरणीच्या गरजांनुसार, शिक्षणसुविधा पुरवण्याची! म्हणूनच प्रभाकर लिमये यांची १०० दिवसांची शाळा संकल्पना ही शासनासाठीही पथदर्शी ठरली.

     राज्यातल्या भटक्या कामगार वर्गातले कुटुंब फक्त रोजंदारीवर गुजराण करत. जिथे रोजगार मिळेल तिथे स्थलांतर करणे. हा त्यांच्या जीवनशैलीचा स्थायीभाव ठरतो. सर्वसाधारण शेतमजूर, ऊसतोडणी मजूर, खाण कामगार, वीट भट्टी मजूर, बांधकाम कामगार आणि इतर भटके मजूर हे प्रामुख्याने या वर्गात येतात. रोजंदारी चक्रात वर्षातले काही दिवस मोकळे असतात. शिक्षण धोरणानुसार या मोकळ्या वेळात मजुरांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही. पर्याय म्हणून या मुलांना प्रस्थापित इयत्ता पद्धतीच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे १०० दिवसांच्या शाळेचे मुख्य ध्येय आहे. प्रस्थापित शैक्षणिक अभ्यासक्रमच या शाळेत शिकवला जातो. फरक आहे तो त्याच्या पूर्ततेत शंभर दिवसांच्या शाळेतील मुलांना हा अभ्यासक्रम वेळेची सोय आणि क्षमता यांनुसार केव्हाही पुरा करण्याचे स्वातंत्र्य मिळते.

      प्रभाकर लिमयांचा जन्म कोकणात रायगड जिल्ह्यातल्या पाली इथे झाला. याच परिसरातले डोंगरमाथ्यावरचे, अति दुर्गम आणि छोटसे, पडसरे हे लिमये कुटंबांचे वास्तव्याचे परंपरागत ठिकाण. खोतांच्या वतनदार घराणे असल्याने सुखवस्तु कुटुंब; पुरूषोत्तम आणि उषा हे प्रभाकर लिमयांचे आई - वडिल. वडील भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या १९४२ च्या चळवळीतले स्वातंत्र्यसैनिक. लिमये कुटुंब राष्ट्रीय आणि पुरोगामी विचारांनी भारलेले असल्याने प्रभाकर लिमयांवर तेच संस्कार झाले.

      त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात तर माध्यमिक शिक्षण पाली आणि पुणे इथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यातल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालय  आणि फर्गसन  महाविद्यालयामध्ये झाले, तर बी.एड. ची पदवी त्यांनी टिळक शैक्षणिक महाविद्यालयातून घेतली. बी.एस्सी., बी.ए., बी.एड्, ही त्याची एकूण शैक्षणिक पात्रता. नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे इथे सहशिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर बावळोलीच्या आदिवासी शाळेचे मुख्याध्यापक झाले. एकूण ३४ वर्षांच्या शिक्षक सेवेनंतर लिमये पुण्याच्या आदर्श शिक्षणसंस्था संचालित शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून २००१ ला निवृत्त झाले.

       शंभर दिवसांची शाळा या संकल्पनेचा उगम एका छोट्या घटनेतून झाला. लिमये आपल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला घेेऊन एकदा कॉफीसाठी उपहारगृहात गेले. तिथे जवळपास त्यांच्या मुलाच्या वयाचाच मुलगा, आताच्या भाषेत बालमजूर, ऑर्डर घ्यायला आला. लिमये यांच्या मनात विचार आला की, हा मुलगा शिक्षणापासून वंचित का राहावा? प्रश्‍नाचे उत्तर  शोधतांना आजच्या शालेय शिक्षण पद्धतीचा विचार अपरिहार्य होता. जून ते मार्च या शैक्षणिक वर्षांच्या वेळापत्रकानुसार शाळेत मुलांची दैनंदिन हजेरी अनिवार्य असते. भटक्या वर्गातली मुले अशी हजेरी लावू शकत नाहीत; कारण शालेय वर्ष हे जून - नोव्हेंबर या शेती हंगामाला समांतर असते. नोव्हेंबरनंतरचा वेळ मोकळा असला तरी या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही. हा मोकळा वेळ १०० दिवसांचा असतो. असा निष्कर्ष लिमये यांनी काढला आणि १०० दिवसांची शाळा या शिक्षणक्षेत्रात मूलभूत तसेच नाविन्यपूर्ण ठरलेल्या प्रकल्पाने आकार घेतला.

       नियमित शालेय अभ्यासक्रमाचे पहिले सत्र जून ते नोव्हेंबर असते. याउलट नोव्हेंबर ते फेबु्रवारी हा १०० दिवसांचा कालावधी शेतमजुरांच्या मुलांचा मोकळा वेळ असतो हे लक्षात घेऊन त्याच काळात प्रभाकर लिमयांचा पडसरेचेेे गावी पहिली ते पाचवी वर्गासाठी शाळा भरवायचा निर्णय झाला. पडसरेच भौगोलिक स्थान अति दुर्गम या वर्गात मोडणारे आहे.

      लिमये यांनी रीतसर नोंदणी करुन श्री बल्लाळेश्‍वर प्रतिष्ठान नावाने संस्था स्थापन झाली. शिक्षकांनी सलग १०० दिवस पडसऱ्याला जाऊन शिकवणे केवळ अशक्य होते. त्यासाठी गटा-गटाने जाण्याचे वेळापत्रक तयार झाले. वर्षभरासाठी अशा १३२ शिक्षकांचे ३३ गट याप्रमाणे नोव्हेंबर १९८१ ते १९८६ असा पाच वर्षाचा कार्यक्रम आखण्यात आला.

      या प्रकल्पातला शिक्षकांचा सहभाग हा नुसताच मानधनाशिवाय नाही तर स्वखर्चाने अपेक्षित होता. योजनेने आकार घेतल्यावर मनुष्यबळासाठी पुण्यातल्या निरनिराळ्या शाळामध्ये जाऊन शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले. प्रकल्प पाचऐवजी सहा वर्ष चालला. एकूण ४० शाळांतील ४०० महिला-पुरुष शिक्षकांनी योगदान दिले. यात महिलांचे प्रमाण ८५ टक्के होते.

      पुस्तकी अभ्यासाशिवाय पडसरे शाळेतील मुलांवर स्वच्छता, व्यायाम, प्रार्थना, खेळ, गाणी, गोष्टी, परवचे, पाढे असे बाल्यसुलभ संस्कार व्हावे अशी कल्पना अंमलात आली. यासाठी रविवार ते रविवार असे ८ दिवस नियमित शाळेतल्या सातवी - आठवीच्या मुलांनी गटा-गटाने स्वखर्चाने सहभाग घेतला. यात त्या मुलांची स्वतःची शाळा काही दिवस चुकणे अपरिहार्य होते. हा चुकलेला अभ्यास भरुन काढण्याच्या निश्‍चयाने पाच वर्षात पुण्यातल्या ५०० मुलांनी १०० दिवसांच्या शाळेला आपले योगदान दिले.

      शंभर दिवसांची शाळा या अभिनव कल्पनेच्या मूर्त स्वरुपाला आर्थिक आधार दिला तो पुण्यातल्या निवडक दानशूर उद्योजकांनी!

       पुण्याहून येणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या निवास आणि भोजनाची जबाबदारी पडसरेच्या ग्रामस्थांनी पूर्ण पाच वर्ष आनंदाने स्वीकारली. परतीच्या प्रवासात जागा मिळेल याची काळजी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली.

      ऊसतोडणी कामगार यांनाही कामासाठी हंगामाप्रमाणे मुला-बाळांसह सतत स्थलांतर करावे लागते. शेतमजुरांच्या मुलांसाठीचा १०० दिवस शाळेचा प्रयोग या ऊसतोडणी मजूरांच्या मुलांसाठीही करावयाचा निर्णय श्री बल्लाळेश्‍वर प्रतिष्ठानने घेतला. साखर शाळा या नावाने १९८५ ला सुरु झालेला हा प्रकल्प आजही ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या प्रगती गटातर्फे सुरु आहे. याबरोबर खाण कामगारांसाठी भोंगा शाळा, बांधकाम कामगारांसाठी बांधकाम, तर वीट भट्टी कामगारांसाठी वीटभट्टी शाळा हे उपक्रम काही स्वयंसेवी संस्था विकसित करत आहेत.

       श्री लिमयांची शाळा सहा वर्षे सुरू होती. याच काळात शाळेला शासनाची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न झाले. त्यानंतर १९९० च्या सुमारास या शाळेचा दाखला नियमित शाळांमध्ये स्वीकारण्याची मान्यता शासनाकडून मिळाली. याचा फायदा मुलांना पुढील शिक्षणासाठी झाला. काही वर्षातच शासनाने प्रशासकीय तरतूद करुन पर्यायी शाळांना मान्यता दिली. आज महाराष्ट्रात असलेले मुक्त विद्यापीठ हे लिमये सरांच्या १०० दिवस शाळेचे 'विस्तारलेले’ रूप आहे.

       शिक्षणात नाविन्य (इन्होवेशन इन एज्युकेशन) या विषयावर राष्ट्रीय शिक्षण परिषद एन.सी.ई.आर.टी दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धा घेते. या स्पर्धेत प्रभाकर लिमये यांनी सलग तीन वर्ष पारितोषिके मिळवली आहेत. शंभर दिवसांची शाळा या उपक्रमावर त्यांच्या मुलाखती आणि व्याख्याने राज्यभर आयोजित झाली आहेत. युनिसेफ या संयुक्त राष्ट्र संघटनेने १०० दिवस शाळा प्रकल्पाचा सखोल अभ्यास करुन अहवाल तयार केला आहे.

      - सुधाकर कुलकर्णी

लिमये, प्रभाकर पुरुषोत्तम