माईणकर, सुधीर विष्णुपंत
सुधीर विष्णुपंत माईणकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. सुधीर यांचे वडील हे त्या काळी संगीत क्षेत्रात एक जाणकार रसिक म्हणून ओळखले जात. ते स्वत: गायक होते व ते तबलाही वाजवत असत. उस्ताद अमीर हुसेन, उस्ताद इनाम अली, उस्ताद हमदू खाँ, पं. सामताप्रसाद, उस्ताद अकबर हुसेन अशा अनेक घराणेदार वादकांचा तबला सुधीर यांनी लहानपणी त्यांच्या घरीच होणार्या मैफलीत ऐकला. आपल्या तबलावादक मित्रांबरोबर लहान वयातच त्यांनी अनेक मैफली ऐकल्या. यातूनच त्यांची नजर बनत गेली.
सुधीर माईणकरांनी तबलावादनाचे प्रारंभिक धडे आपल्या वडिलांजवळ गिरवले. त्यानंतर त्यांनी दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध कलाकार पं. मारुतीराव कीर यांच्याकडे काही काळ तालीम घेतली. पुढे त्यांनी दिल्ली घराण्याचे खलिफा उस्ताद इनाम अली खाँ यांचा गंडा बांधला. खाँसाहेबांच्या तालमीमध्ये सुधीर यांच्यावर तबल्याच्या पारंपरिक विचारांबरोबर उस्ताद नत्थू खाँ यांच्या सौंदर्यवादी विचारांचाही संस्कार झाला.
याच दरम्यान आयुर्विम्यातील नोकरीत त्यांना पदोन्नती मिळून त्यांची बदली बडोद्याला झाली. बडोद्यात उस्ताद हबीबुद्दीन खाँसाहेबांचे शिष्य प्रो.सुधीरकुमार सक्सेना यांच्याकडे त्यांनी अजराडा घराण्याची तालीम जवळजवळ सात वर्षे घेतली. तेथून मुंबईला परतल्यावर उस्ताद थिरकवा खाँसाहेबांचे शिष्य पं. भिडेसाहेब यांच्याकडेही त्यांनी काही काळ मार्गदर्शन घेतले. तबला वादनात अशी प्रगती होत असतानाच आपल्यातील कार्यक्षमतेच्या जोरावर आयुर्विम्याच्या नोकरीतही त्यांना सतत बढती मिळत गेली आणि कारकिर्दीच्या अखेरीस ते तेथून वरिष्ठ प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. याच काळात विमा अधिकार्यांच्या मार्गदर्शनासाठी आयुर्विमा प्रशिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तबलावादन क्षेत्रात सुधीर माईणकरांनी रचनाकार, शास्त्रकार, गुरू, लेखक, समीक्षक अशा विविध स्तरांवर मौलिक कामगिरी केली .
दिल्ली,अजराडा घराण्यातील खाली-भरी, पूरक/विरोधी नादतत्त्व यांबरोबरच लघुकाल गणित, यति-विराम, छंद इ.अनेक सौंदर्यतत्त्वांचा सुरेख उपयोग करून पेशकार व कायदा यांच्या विस्तारक्रिया त्यांनी अधिक कलात्मक केल्या.
घराणेदार विस्तारक्रिया कशी असते हे अभ्यासकांना कळण्यासाठी त्यांनी ‘तबला वादन में विस्तार क्रिया’ या नावाची एक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली . त्यांनी तबला वादनातील सर्व प्रकारच्या रचनांचा, भाषेतील स्वर-व्यंजन, वाक्यरचना, यती, गण, अलंकार व वृत्त या संकल्पनांच्या पार्श्वभूमीवर अभ्यास केला . यातूनच पुढे त्यांनी छंद-वृत्त व अलंकार यांवर आधारित बंदिशींची निर्मिती केली आणि एका सर्वस्वी नवीन विषयाचा तबलावादन क्षेत्रात उदय झाला. विविध छंद आणि त्यांतून निर्माण होणारे नवनवीन शब्दबंध यांच्या योजनेतून भाषाप्रधान तबल्याला सुधीर माईणकरांनी एक वेगळाच आयाम प्राप्त करून दिला .
सुधीर यांनी कायदा, पेशकार, लय-लयकारी, इ. व्याख्या अधिक सुस्पष्टपणे तयार केल्या. त्यांनी तालाचे दशप्राण, लिपी, घराणी व इतिहास अशा जुन्या विषयांकडे आधुनिक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला . त्यांनी पूरक आणि विरोधी नादसंगती, भाषेतील वृत्तांवर आधारित बंदिशी, गेस्टॉल्टचा बोधनक्रियेतील विचार आणि तबलावादन असे पूर्णपणे नवीन विषय मांडले. आपले हे विचार आणि संशोधन भावी पिढीला उपयुक्त ठरावे यासाठी सुधीर माईणकरांनी ‘तबला वादन कला और शास्त्र’ आणि ‘ तबला वादन में निहित सौंदर्य’ या हिंदी, तर ‘Aesthetics of Tabla’ या इंग्रजी अशा तीन ग्रंथांची निर्मिती केली.
भारतातील अनेक विद्यापीठे, तसेच एन.सी.पी.ए. यासारख्या मान्यवर संस्था डॉ. माईणकरांना विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी वेळोवेळी बोलावत असत. मुंबई, पुणे, लखनौ, बनारस, कोल्हापूर अशा अनेक विद्यापीठांमध्ये, तसेच गांधर्व महाविद्यालयासारख्या मान्यवर संस्थांमध्ये त्यांनी अभ्यासक्रमाच्या आखणीपासून ते परीक्षा घेण्यापर्यंत आणि विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, व्याख्याने यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी फार मोठे योगदान दिले आहे याखेरीज त्यांनी गुरु-शिष्य परंपरेनेही काही निवडक विद्यार्थ्यांना तालीम दिली आहे.
तबलावादन क्षेत्रात त्यांनी हे जे कार्य केले आहे, त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यांपैकी ‘तबला वादन कला और शास्त्र’ या ग्रंथासाठी हिंदी साहित्य अकादमीचा ‘होमी जहांगीर भाभा’ पुरस्कार, स्वर साधना समिती, मुंबईतर्फे ‘स्वर साधना रत्न’ पुरस्कार, ‘श्रीमती विजया जोशी साहित्य संगीत कला’ पुरस्कार, ओंकार संगीत सभा, म्युझिक फोरमचा उत्कृष्ट संशोधनासाठीचा पुरस्कार, इ. महत्त्वाचे होत.