Skip to main content
x

मालशे, सखाराम गंगाधर

     सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म गांगई, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे झाला. डॉ.स.गं. मालशे यांनी कोकणात राहून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला येऊन राहिले. स्वावलंबनाने शिक्षण पूर्ण करीत असताना प्रारंभी त्यांनी मुंबईतील शाळेत शिक्षक म्हणून काम केले.

     १९४९मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयातून ते एम.ए.झाले व त्याच महाविद्यालयात १९५६पर्यंत आणि पुढे १९६६पर्यंत कीर्ति महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते. प्रा.अ.का.प्रियोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९६१मध्ये पीएच.डी केली. १९६७-१९६८ या कालखंडात ते मुंबई मराठी संशोधन मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत होते आणि पुढे १९६८ ते १९८२ या काळात ते मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते.

     ‘मराठी  संशोधन पत्रिका’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘इये मराठीचिये नगरी’ अशा दर्जेदार संशोधनपर नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी अनेक दुर्मीळ ग्रंथांना व संशोधनपर लेखांना प्रसिद्धी दिली. त्यांचे हे कार्य मोलाचे ठरले. मराठी नाटके, एकोणिसावे शतक, राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य प्र.के.अत्रे हे त्यांच्या आवडीचे विषय होते. सुमारे ६०हून अधिक समीक्षात्मक आणि संशोधनपर लहान-मोठी पुस्तके त्यांच्या नावावर असून त्यांतील काही महत्त्वाच्या व मोजक्या पुस्तकांचा मागोवा घेतला, तरी या क्षेत्रातील त्यांची मोलाची कामगिरी लक्षात येईल.

     या सर्वच लेखनांतून त्यांची ‘ना मूलं लिख्यते किंचित’ ही संशोधनातील निष्ठा पुरेपूर आढळते. कुणाचेही ‘नीट पण झूट’ लेखन त्यांनी कधी सहन केले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी कथा, ललितनिबंध, एकांकिका असे मोजके लेखन केले असले तरी समीक्षक आणि संशोधक म्हणूनच ते महत्त्वाचे लेखक ठरले. त्यांनी समीक्षा, संशोधन, संपादन, अनुवाद, बालसाहित्य, नाटक असे विविधांगी लेखन केले आहे.

     ‘तारतम्य’ (१९८७) असे त्यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे. त्यांच्या लेखनातही हे तारतम्य कधी सुटलेले दिसत नाही. डॉ. मालशे यांचे महत्त्वाचे लेखन पुढीलप्रमाणे सांगता येईल: ‘आवडनिवड’ (१९५९) -लघुकथा, ग्रामीण कादंबरी, आत्मचरित्र, इ. विषयांवरील लेखन; ‘आगळंवेगळं’ (१९८६) - विविध पुस्तकांची परीक्षणे; ‘संतर्पण’(१९८६) - मध्ययुगीन साहित्याची समीक्षा; ‘नीरक्षीर’(१९८९) - नाट्यसमीक्षात्मक लेखन इत्यादी.

     एकोणिसावे शतक हा त्यांच्या अभ्यासामधील आवडीचा भाग होता. या शतकाचा त्यांचा किती गाढा अभ्यास होता, हे त्यांनी या शतकातील जी पुस्तके संपादित केलेली आहेत आणि या पुस्तकांना ज्या प्रस्तावना लिहिल्या आहेत, त्यांवरून लक्षात येते. त्यांतील काही पुस्तके अशी: ‘अव्वल इंग्रजीतील ग्रंथनिर्मितीची नांदी’, ‘दोन पुनर्विवाह प्रकरणे’ (१९७७), ‘शेट माधवदास रघुनाथदासकृत आत्मलिखित पुनर्विवाह चरित्र’ (१९८१), ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’- अनुवाद (१९६०), ‘मुंबई इलाख्यातील इनाम कमिशन खात्यातील गैरइन्साफ’ (१९७८), ‘बॉम्बे असोसिएशनचे दोन अर्ज’ (१९७६), न्या. रानडेकृत ‘मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी’- अनुवाद (१९८१), ‘सत्तावनी उठावाची समकालीन कात्रणे’ (१९७७), ‘छत्रपती प्रतापसिंह यांची लेखी तसबीर’, गोपाळ हरी देशमुखकृत ‘जातिभेद’ (१९७४), विष्णुबुवा ब्रह्मचारीकृत ‘राजनीतिविषयक निबंध’ (१९७५), महात्मा फुलेकृत ‘शेतकर्‍याचा आसूड’ (१९६७), ताराबाई शिंदेकृत ‘स्त्री-पुरुष तुलना’ (१९७५) इत्यादी. याचबरोबर ‘गोविंद नारायण माडगावकर यांचे संकलित वाङ्मय’: भाग १ ते ३ (१९६८) आणि ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ (१९८८) ही सहसंपादनेही महत्त्वाची आहेत.

      एकोणिसाव्या शतकासंबंधित आणखी दोन महत्त्वाची पुस्तके म्हणजे ‘विधवाविवाह चळवळ १८०० ते १९००’ (१९७८) आणि ‘गतशतक शोधिताना’ (१९८९).

     एकोणिसाव्या शतकाशी संबंधित सर्वच पुस्तकांमधून त्यांनी घेतलेला त्या शतकाचा वेध समग्र, परिपूर्ण आणि त्या शतकाची बारकाव्यानिशी ओळख करून देणारा आहे. ‘एकोणिसाव्या शतकाचा चालता-बोलता कोश’ असे त्यांचे वर्णन केले तर ते अतिशयोक्त ठरणार नाही.

     त्यांनी केलेल्या अनुवादांच्या निवडीमधून त्यांची अभ्यासू, चिकित्सक वृत्ती दिसते. उदा. रेने वेलेककृत ‘थिअरी ऑफ लिटरेचर’चे ‘साहित्यसिद्धान्त’ हे भाषांतर (१९८२), यूजिन ओमीलच्या ‘स्ट्रेंज इंटरल्यूड’ या नाटकाचा ‘सुख पाहता’ हा अनुवाद (१९६९), जॅक शॉफर या लेखकाच्या लघुकथांचा ‘सुखाची सुरुवात’ हा अनुवाद (१९५६) इत्यादी.

     ‘गडकरी सर्वस्व’ (१९८४) हे गडकर्‍यांवरील अत्रे  यांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन, ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर’ (१९८३) हे अत्रेलिखित सावरकरांवरील लेखांचे संपादन, सावरकर आत्मचरित्र ‘माझ्या आठवणी: भगूर’ (१९७२) व ‘माझ्या आठवणी : नाशिक, (१९७३) ही संपादने, ‘सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता’ (१९६९) आणि अत्रे यांची ‘झेंडूची फुले’ (१९७२), ‘अध्यापक अत्रे’ (१९८५), ‘हुंदके’ (१९८९) ही सर्व संपादनेही महत्त्वाची आहेत. एकूण सर्वच संपादने डॉ.मालशे यांची सखोल, मार्मिक दृष्टी दर्शविणारी आहेत.

     संशोधनशास्त्र हे डॉ.मालशे यांच्या अभ्यासाचे खास क्षेत्र. ‘शोधनिबंधाची लेखनपद्धती’ (१९७०) हे छोटेखानी पुस्तक संशोधनक्षेत्रात पाऊल टाकणार्‍या संशोधकांना उत्तम मार्गदर्शनपर, असे आहे.‘केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित’ (१९६६) ही केशवसुतांच्या हस्तलिखिताची पुढील काळातील मुद्रित आवृत्त्यांशी तुलना करून सिद्ध केलेली संहिता संशोधनाचा एक उत्तम नमुना आहे. ‘साहित्याभ्यासाची शैलीलक्ष्यी पद्धत’ (१९८१) हे पुस्तकही आधुनिक सैद्धान्तिक विवेचनामुळे महत्त्वाचे ठरते.

     ‘भाषाविज्ञान: वर्णनात्मक आणि ऐतिहासिक’ (१९८२) आणि ‘भाषाविज्ञानपरिचय’ (१९८५) ही सहसंपादने डॉ.मालशे यांच्या अभ्यासाचा वेगळा पैलू दाखविणारी आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’, खंड दुसरा, भाग १ व २ (१९८२) हे संपादनही डॉ.मालशे यांचे संपादनकौशल्य दाखविणारे आहे.

     संशोधनपर नियतकालिकांचे दर्जेदार विशेषांक काढणे हे संपादकापुढे एक आव्हान असते. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा ‘श्री.कृ.कोल्हटकर विशेषांक’ (१९७१) आणि ‘साहित्यसम्राट न.चिं.केळकर विशेषांक’ (१९७२) पाहिले की हे आव्हान डॉ.मालशे यांनी समर्थपणे पेलले आहे, हे लक्षात येते.

     डॉ.मालशे यांच्या लेखनाचा आणखी एक पैलू म्हणजे ‘काझीचा न्याय’ (१९६४), ‘ऊस घरातला गुरगुर्‍या’ (१९७७), ‘चतुर गणपतराय’ (१९७७), ‘जादूचा ढोल’ (१९७७) इ. रूपांतरित बाल-लोककथा होत.

     - डॉ. नंदा आपटे

मालशे, सखाराम गंगाधर