Skip to main content
x

मॅन, हॅरॉल्ड एच.

         हॅरॉल्ड एच. मॅन हे पुणे येथील कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. त्यांचे शिक्षण डी.एस्सी.पर्यंत झाले होते. ते कृषि-रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. मुंबई प्रांत सरकारने कृषि-रसायनशास्त्रज्ञाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली होती. महाविद्यालयाच्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची पायाभरणी मॅन हॅरॉल्ड यांच्या कार्यकाळातच झाली होती.

         डॉ. मॅन यांचे १९०७च्या उत्तरार्धात पुणे येथे आगमन झाले. पुण्यात १९०८मध्ये महाविद्यालय साकारले. आधी ते ‘कॉलेज ऑफ सायन्स’ (नंतरचे अभियांत्रिकी महाविद्यालय)शी जोडलेले होते. तेव्हा खडकी येथील काही बंगल्यांत कृषी महाविद्यालय थाटले गेले. प्रत्यक्ष शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी जमीन खरेदी करण्यात आली. गणेशखिंड येथील बागेत उद्यानविद्येचे प्रशिक्षण दिले जात असे. विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित होती. सरकारी शिष्यवृत्ती आणि पदवीनंतर महसूल खात्यात नोकरी मिळण्याची हमी दिल्यामुळेच यातील बहुतेक विद्यार्थी महाविद्यालयात दाखल झाले होते.

         महाविद्यालयाने अल्पावधीतच मोठे नाव कमावले. ब्रह्मदेश आणि श्रीलंका येथूनही शिक्षणासाठी या महाविद्यालयात विद्यार्थी येऊ लागले. सुरुवातीच्या काळातील या महाविद्यालयाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे कृषी विषयातील पदवीधरांना प्रशिक्षण देणारे केंद्र एवढीच त्याची ओळख नसून येथील प्राध्यापक वर्गापैकी बहुतेक सर्वच जण कोणत्या ना कोणत्या संशोधन कार्यात गुंतलेले असत. महाविद्यालयाला जेव्हा सुटी पडत असे, तेव्हा संशोधन करण्यासाठीच मोकळा वेळ मिळाला आहे, अशी सर्वांची भावना होत असे. अशा वातावरणामुळे स्वाभाविकच विद्यार्थ्यांचाही संशोधनाकडे सतत वाढता कल राहिला. डॉ. मॅन यांनी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग तसेच अन्य महत्त्वाच्या विभागांच्या उभारणीत सक्रिय योगदान दिले. त्यांची दूरदृष्टी आणि सततचा प्रयास यामुळे या महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडण्यास मोठी मदत झाली. भारतातील वैज्ञानिक क्षितिजावर कृषी महाविद्यालयाचे नाव डॉ. मॅन यांच्या निरलस सेवेमुळे झळाळू लागले. त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून १९०८ ते १९१८ अशी अकरा वर्षे कामकाज सांभाळले.

- संपादित

मॅन, हॅरॉल्ड एच.