Skip to main content
x

मेस्त्री, बाबूराव कृष्णराव

चतुरस्र कलावंत

चित्रकार, शिल्पकार, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक, तसेच कुशल तंत्रज्ञ व यंत्रविशारद अशा हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कलाकार बाबूराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णराव मेस्त्री यांचा पेशा लोहारकाम, सुतारकाम हा असला तरी चित्रकला, देवादिकांच्या दगडी व संगमरवरी मूर्ती घडविणे, हस्तिदंती कोरीवकाम अशा अनेक प्रकारच्या कलाकुसरींत त्यांनी उत्तम प्रावीण्य मिळवले होते. बाबूरावांना वडिलांकडूनच कलेचा वारसा व कलानिर्मितीचे प्राथमिक धडे मिळाले. तसेच त्यांचे आतेभाऊ आनंदराव पेंटर यांच्या संगतीत तैलरंगचित्रण, छायाचित्रण, चित्रपट माध्यम यांविषयी त्यांना आकर्षण व अनिवार ओढ निर्माण झाली. त्यांचा विवाह १९२७ मध्ये तानीबाई यांच्याशी झाला.

बाबूरावांचे शालेय शिक्षण मराठी चौथी-पाचवीपर्यंतच झाले. कलेचे रीतसर औपचारिक शिक्षण त्यांना लाभले नाही. मात्र त्यांनी स्वाध्यायाने, स्वप्रयत्नांनी व स्वानुभवाच्या बळावर चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा विविध कला व माध्यम-तंत्रे यांवर विलक्षण प्रभुत्व मिळवले. आनंदरावांच्या साथीने त्यांनी तैलचित्रे व नाटकांचे पडदे रंगवून सुरुवातीच्या काळात अर्थार्जन केले. त्यांनी ‘ललितकलादर्श’, ‘किर्लोस्कर’ या नाटक कंपन्यांसाठी, तसेच बालगंधर्वांच्या नाटकांसाठी नेपथ्याच्या सजावटीचे कलात्मक पडदे रंगविले. त्यांतील त्यांनी चितारलेले, खर्‍याचा आभास निर्माण करणारे दृश्य-देखावे (सीनसिनरी) अप्रतिम होते. त्यामुळे त्यांना कलाक्षेत्रात मानमान्यता व लोकप्रियता लाभत गेली व ते ‘पेंटर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. नेपथ्याच्या पडद्यांबरोबरच ते नाटकांतील पात्रांच्या वेशभूषा, पादत्राणे व आभूषणे यांची रेखाटनेही काढून देत असत.

चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शन यांबरोबरच चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेले एक कलापूर्ण योगदान म्हणजे, त्यांनी चित्रपटांच्या जाहिरातींसाठी तयार केलेली भव्य कलात्मक छापील भित्तिपत्रके (पोस्टर्स) व  चित्रफलक (बॅनर्स). त्यांची नाटकांचे पडदे रंगविण्याची कला इथे कामी आली. ‘सैरंध्री’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी त्यांनी जलरंगातील कापडी चित्रफलक तयार करून ते पुण्याच्या ‘आर्यन’ चित्रपटगृहात लावले होते. ‘सिंहगड’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी १० फूट ु २० फूट लांबी-रुंदीची भव्य भित्तिपत्रके तयार केली. ही मोठ्या आकाराची भव्य व कलात्मक भित्तिपत्रके पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळत असे.

चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडेच जाते. त्यांनी पन्नास फूट उंचीच्या घटोत्कच राक्षसाच्या पोस्टरने ‘मायाबाजार’ या चित्रपटाची जाहिरात केली होती. लोकमान्य टिळकांनी ‘सैरंध्री’ हा मूकपट पाहून ८ फेबु्रवारी १९२० रोजी सुवर्णपदक देऊन बाबूराव पेंटरांचा सत्कार केला व त्यांना ‘सिनेमा केसरी’ ही पदवी बहाल केली.

एका मूकपटाच्या जलरंगातील चित्रफलकासाठी त्यांचा सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्राचार्य सॉलोमन यांनी सत्कार केला होता. ‘त्यांची ही भव्य कलात्मक भित्तिपत्रके व चित्रफलक म्यूझियममध्ये ठेवण्याच्या योग्यतेची म्हणजे संग्रहालयीन स्थायी कलामूल्य असलेली आहेत’, असा अभिप्राय त्या काळी जाणकारांनी व्यक्त केला होता. त्यांनी ना.सी. फडके यांच्या ‘जादूगार’, ‘दौलत’, ‘अटकेपार’, ‘गुजगोष्टी’ इत्यादी पुस्तकांसाठी रंगीत मुखपृष्ठे केली. तीदेखील त्यांच्या चित्रकलेचे उत्कृष्ट नमुने ठरली. या मोहक व आकर्षक रंगीत मुखपृष्ठांनी कादंबर्‍यांच्या लोकप्रियतेत भरच घातली.

बाबूरावांची चित्रकला व शिल्पकला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होत्या; कारण त्यांचा मूळ पिंड कलावंताचा होता. त्यांच्या रेखाचित्रांची (स्केचेस) एक वेगळी लकब होती. मोजक्या व सहज ओघवत्या रेषांनी प्रमाणशीर रेखाटन करून काही हव्या त्या ठिकाणीच ते शेडिंग करीत असत.

त्यांनी रंगविलेल्या चित्रांमध्ये व्यक्तिचित्रे, अनेक व्यक्ती असलेली रचनाचित्रे, देवादिकांची व पौराणिक चित्रे आणि अतिशय कमी प्रमाणात निसर्गचित्रे यांचा समावेश होतो. एकंदरीत त्यांची चित्रे बघताना जाणवते ते पराकोटीचे तांत्रिक कौशल्य, सुबकता व तजेलदारपणा. राजा रविवर्मा यांच्याप्रमाणेच त्यांच्या चित्रांत भारतीय विषय व पाश्‍चिमात्य तंत्र यांचा सुंदर मिलाफ आढळतो. परंतु रंगछटांचे वजन अजिबात ढळू न देता, सफाईदार रंगलेपन करून समोरच्या व्यक्तीमधून एक कल्पनारम्य प्रतिमा उभी करणे ही बाबूरावांची खासियत होती. सौम्य रंगछटा, रेषांचा डौल, संपूर्ण चित्राचे उठावमूल्याधारित (टोनल व्हॅल्यू) विभाजन करून त्या अनुषंगाने कुंचल्याच्या नाजूक व सफाईदार स्पर्शाने केलेले रंगलेपन व एक आकार सहजपणे दुसर्‍या आकारात मिसळून टाकणे ही त्यांच्या चित्रकामाची वैशिष्ट्ये होत.

त्यांच्या रचनाचित्रांमध्ये वास्तववादातून निर्माण केलेला काव्यात्म गूढ भाव जाणवतो. मानवी स्वरूपातील देवदेवता रंगविताना त्यांच्यातील ‘अमानवी-दैवी’ अवयव पार्श्‍वभूमीत विरून जावेत व केवळ देवदेवतांची ओळख पटण्यापुरतेच ते दृश्यरूप व्हावेत अशी रंगरचना बाबूरावांनी केलेली आढळते. त्यांनी फार थोडी निसर्गचित्रे रंंगविली; परंतु त्यांमध्ये परिप्रेक्ष्याचा (पर्स्पेक्टिव्ह) त्यांचा अभ्यास दिसून येतो. ‘श्रीदत्तात्रेय’, ‘लक्ष्मी’, ‘विश्‍ववंदिनी सरस्वती’, ‘राधाकृष्ण’, ‘विश्‍वमोहिनी’, ‘रूपगर्विता’, ‘पाणवठ्यावर’, ‘जलवाहिनी’, ‘वटपूजा’, ‘मंदिराकडे’ ही त्यांची काही प्रसिद्ध चित्रे होत.

बाबूरावांनी माती व ब्राँझ या माध्यमांत शिल्पनिर्मिती केली. ब्राँझचे पुतळे तयार करण्यासाठी त्यांनी ओतकामाची भट्टी स्वतः तयार केली. भव्यता, प्रमाणबद्धता, आकृतीचा रेखीव सुबकपणा व कलाकुसर ही त्यांच्या शिल्पनिर्मितीची लक्षणीय वैशिष्ट्ये होती. आठ-दहा फुटांचे पुतळे ते सहजपणे तयार करीत असत. ‘शिवाजी महाराज’, ‘महात्मा गांधी’ व विशेषत्वाने ‘महात्मा फुले’ यांचा अर्धपुतळा ही त्यांची शिल्पे प्रसिद्ध आहेत. अनेकविध कलामाध्यमांत बाबूराव अखेरपर्यंत सातत्याने निर्मिती करत राहिले. कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांचे चिरंजीव रवींद्र मेस्त्री यांनी घराण्यातील कलेचा वारसा निष्ठेने जोपासला.

- एस.डी. इनामदार

संदर्भ :
१. भिडे, ग.रं.; गजबर, बाबा; ‘कलामहर्षी बाबूराव पेेंटर’, ‘कोल्हापूर १९७८’ मधील लेख. २. सडवेलकर, बाबूराव; ‘मुंबई सकाळ’ विशेषांक; २९ जून १९८९. ३. बालगंधर्वांनी बाबूराव पेंटरांबद्दल लिहिलेला लेख.