Skip to main content
x

महाराज, मौनगिरी

जनार्दनस्वामी

      जनार्दनस्वामी यांचा जन्म ललिता पंचमीच्या दिवशी आजोळी, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात टापरगाव येथे झाला. आजोळचे वातावरण भगवद्भक्तीला पोषक होते; पण दहेगावला घरी परतल्यानंतर त्यांना अगदी प्रतिकूल वातावरण मिळाले. पारंपरिक पाटीलकीमुळे गडगंज श्रीमंती होती; पण आध्यात्मिक वातावरण नव्हते. ईश्वरभक्तीचे वेड लागलेला जनार्दन गळ्यात वीणा घालून अभंग गात गावभर फिरू लागला; उपास-तापास, व्रतवैकल्ये करू लागला. घरंदाज कुटुंबातील युवकाने असे वागावे हे नातेवाईकांना नामुष्कीचे वाटू लागले. त्यांचा विरोध इतका टोकाला गेला, की जनार्दनला जिवंत ठेवायचे नाही असा सर्वांनी निश्चय केला.

हिरण्यकशिपूने जसा प्रल्हादाचा छळ केला, अगदी तशाच प्रकारे घरच्यांनी जनार्दनचा सतत छळ केला. मात्र, भगवंताच्या कृपेने तो सर्व अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर पडला. शकुंतलाबाई नावाच्या एका ब्राह्मण स्त्रीने त्याला भाऊ मानून आपल्या घरी आश्रय दिला.

जनार्दनस्वामी नित्यनेमाने पंढरपूरची वारी करू लागले. त्यांना ह.भ.प. लक्ष्मणबुवा वाघोलीकर यांचे मार्गदर्शन मिळू लागले. त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या अभ्यासाचे ते गुरू होते. दहेगावाजवळच असलेल्या गौळवाडीतील एक स्त्री जनार्दनस्वामींची भक्ती करीत असे. तिने स्वामींना आपल्या अंदरसुल गावातील एका ठिकाणी ध्यान-धारणेसाठी जागा उपलब्ध करून दिली. तेथे जनार्दनस्वामी तासन्तास ध्यानधारणा करू लागले. एव्हांना परिसरातील लोकांना त्यांच्यातील आध्यात्मिक शक्तीची कल्पना येऊ लागली. सामान्य लोकांप्रमाणेच तत्कालीन संत-सज्जन त्यांच्या भेटीस येऊ लागले. त्या काळी प्रसिद्ध असलेले नागबाबा म्हणजेच शिवरामगिरी यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी जनार्दनस्वामींना १९६२ साली गुरुमंत्र दिला आणि मौनगिरी हे नाव दिले. त्यांंना बिसायंत्राचे गूढ सांगितले. यंत्रसिद्धीचा मंत्र दिला. गोदावरीच्या संगमात बसून सव्वा लाख वेळा मंत्राचा उच्चार करण्यास सांगितले. त्यानंतर यंत्र जळात सोडून अन्नग्रहण करण्याची सूचना केली. हे अनुष्ठान त्यांनी पूर्ण केले.

मौनगिरी महाराजांनी शिवरामगिरी महाराजांच्या सांगण्यावरून भगवद्गीता, सामवेद, कथा कल्पतरू, रामायण, महाभारताचा समग्र अभ्यास केला. त्यानंतर मौनगिरी महाराजांना एकदा दृष्टान्त झाला. चक्षूंसमोर डोंगर दिसू लागला. जीर्णोद्घार, पिनाकेश्वर, जातेगाव असे शब्द कानांवर आदळू लागले. त्यांच्या दिव्यशक्तीने स्वामी समजून गेले. त्यांनी जातेगाव येथील दुर्गम डोंगरावरील पिनाकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार लोकांना हाताशी घेऊन श्रमदानाने केला. जुन्या मंदिरात काशीहून मागविलेले शिवलिंग अधिष्ठित केले. जयपूर येथून शिवाची मूर्ती आणवली. सप्तनद्यांचे तीर्थ आणले आणि अनेक ब्राह्मणांकरवी प्रतिष्ठापना केली. त्र्यंबक येथील शिखरे गुरुजींची गुरव म्हणून नेमणूक केली.

मौनगिरी महाराज यांनी सामाजिक कार्यही लक्षणीय केले. विविध देवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी त्या- त्या गावातील लोकांना भारतीय संस्कृतीचे आणि आपल्या अनमोल ठेव्यांचे महत्त्व समजावून सांगून केला. यामध्ये त्र्यंबक येथील सिद्धेश्वर मंदिर, वैजापूरचे परिश्वर मंदिर, पंचवटीतील शर्वायेश्वर शिवमंदिर, साकूरचे मौनेश्वर मंदिर, कोपरगाव येथील काशी विश्वेश्वर शिवमंदिर अशा कित्येक मंदिरांचा समावेश आहे. कित्येक नापीक ठिकाणच्या भूमीचा उपयोग मौनगिरी महाराज यांनी आश्रमशाळा, मंदिरे, शेती, फळ-फुलबागा, त्याचप्रमाणे गोशाळा उभ्या करून केला. अहमदनगर, नाशिक, जालना, औरंगाबाद, धमाने, वेरूळ, टुणकी, पुणे इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रवचनांतून, तसेच विधायक कामांमधून लोकसेवा केली व अन्यांस प्रोत्साहित केले.

मौनगिरी महाराजांच्या ठिक-ठिकाणच्या मंदिरे, आश्रमांमधून  अक्षय्यतृतीया, दत्तजयंती, नागपंचमी अशा दिवसांत जप, अनुष्ठाने होतात. त्यांत हजारो शिष्य, भाविक सहभागी होतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रदोष या गीता जयंतीच्या दिवशी त्यांचे नाशिक येथे देहावसान झाले. कोपरगाव येथे बेट या पवित्रस्थानी त्यांच्या पार्थिवाला समाधिस्थ करण्यात आले. याच परिसरात त्यांचे समाधी मंदिरही त्यांच्या शिष्यगणांनी बांधले आहे.

संदीप राऊत

महाराज, मौनगिरी