Skip to main content
x

मिरासदार, दत्तात्रय मारुती

     दत्तात्रय मारुती मिरासदार यांचा जन्म, बालपण तसेच शालेय शिक्षण पंढरपूर येथे झाले. पुण्याला येऊन त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए., बी.टी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या.

     दै. तरुण भारत, दै. त्रिकाळ या वृत्तपत्रांमध्ये कामही त्यांनी केलेले आहे. १९६१ ते १९६९ या काळात पुण्यातील शाळांमधून अध्यापन, तर पुढे १९७७पर्यंत गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथे मराठी विभाग-प्रमुख हे पद मिरासदार यांनी भूषविले.

     १९५१ साली ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन मासिकातून त्यांची ‘रानमाणूस’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यांचे एकूण २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘माझ्या बापाची पेंड’, ‘विरंगुळा’ या दोन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. याशिवाय ‘भुताचा जन्म’, ‘हसणावळ’, ‘माकडमेवा’, ‘गुदगुल्या’, ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ इ. कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. द.मा.मिरासदार यांच्या निवडक कथांचा संग्रह ‘मिरासदारी’ तसेच ‘निवडक द.मा.’ अशा दोन स्वतंत्र संग्रहांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह कथा-कथनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले.

     ‘सरमिसळ’, ‘गप्पांगण’, ‘बेंडबाजा’, ‘खडे-ओरखडे’ हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह होत. द.मा.मिरासदारांनी ‘सुट्टी आणि इतर एकांकिका’, ‘गाणारा मुलूख’ या कुमारांसाठी दोन नाटिका लिहिल्या आहेत. ‘मी लाडाची मैना’ हे त्यांचे वगनाट्य (१९७५) तसेच ‘सोनियाचा दिवस’ ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. याखेरीज मिरासदारांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद मिरासदारांनी केले .

     द.मा.मिरासदारांनी ग्रामीण विनोदी कथांचे लेखन केले. व्यंकटेश माडगूळकरांनी खेड्यातील दुःख, दारिद्य्र यांच्यासह जगणार्‍या सोशिक माणसांचे जग त्यांच्या कथांमधून उभे केले. परंतु, द.मा.मिरासदार यांनी हास्यकथेच्या अंगाने ग्रामीण कथेला पुढे नेण्याचे काम केले. दारिद्य्र, दुःख घेऊन जगणारी माणसे जिवाला चार घटका विरंगुळा मिळावा म्हणून हसत असणार. माणसाच्या चेहर्‍यावर उमटणारे ‘हास्य’ ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे हे लक्षात घेऊन मिरासदारांनी ग्रामीण जीवनातील हास्य-विनोद शोधण्याचा प्रयत्न कथांमधून केला.

     खेडेगावातल्या माणसांनी आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी गावातल्या चावडीवर, पारावर एकत्र जमून जमवलेला गप्पांचा फड हा खेडेगावातल्या माणसांनी आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी शोधलेला सहज, सोपा मार्ग असतो. या अघळपघळ गप्पांमध्ये माणसाच्या अंगी असलेल्या वात्रटपणा, फाजीलपणा, प्रसंग रंगवून सांगण्याची हौस, अतिशयोक्ती, ग्रामीण इरसाल शिव्या या सर्व गुणांचा मुक्तपणे आविष्कार होत असतो. दुसर्‍याच्या भानगडी जाणून घेण्याची उत्सुकता, चार जणांमध्ये बसून नेहमीपेक्षा वेगळी काहीतरी घटना सांगताना बोलण्याचा खास ढंग, हावभाव, हातवारे या सार्‍याच गोष्टी या शिळोप्याच्या गप्पांमध्ये जिवंतपणा आणतात.

      द.मा.मिरासदार यांना कथालेखनाची प्रेरणा गावातला सुस्त कारभार, गावात जमणार्‍या गप्पांच्या अड्ड्यांमधून मिळाली. मिरासदारांचे वडील व्यवसायाने वकील असल्याने गावातल्या नाना भानगडींचा काथ्याकूट घरी येणारी पत्रकार माणसे करीत असत. त्यामुळे खेडेगावाची नमुनेदार माणसे त्यांना जवळून पाहायला मिळाली. परंतु हा सगळा त्यांच्या कथांना मिळणारा कच्चा माल होता, असे म्हणता येईल.

     प्रत्यक्ष पाहिलेले, ऐकलेले काही प्रसंग, भेटलेली नमुनेदार माणसे यांना मिरासदारांच्या कथेत नवे रूप लाभले. त्यांचे कथालेखन स्वतंत्र वळणाने घडत गेले प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा आधार घेऊन, एक नवीनच मध्यवर्ती घटना घेऊन मिरासदारांनी कथा लिहिल्या. या मध्यवर्ती घटनेशी एकरूप झालेला भोवतालचा परिसर, कथेतली माणसे, वातावरणनिर्मिती यांच्या एकत्र परिणामातून संपूर्णपणे नवीन ग्रामीण कथा मिरासदारांनी लिहिली. त्यांच्या कथेत असणारी मुख्य घटना, त्या घटनेमध्ये सहभागी असणारी माणसे, त्यांचे विशिष्ट असे स्वभाव, त्या स्वभावांमुळे घडणारे गमतीदार प्रसंग, माणसांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावांतून व्यक्त होणार्‍या मानवी वृत्ती, प्रवृत्ती, यांचे चित्रण केलेले दिसते. द.मा.मिरासदारांच्या ग्रामीण विनोदी कथांमध्ये त्यांच्या स्वतंत्र कल्पनाशक्तीमधून जन्माला आलेले प्रसंग कथेमध्ये विनोद उत्पन्न करतात. कथेतल्या एखाद्या पात्राची होणारी फजिती, साक्षीदार असणारी दुसरी पात्रे त्या माणसाच्या फजितीला हसतात. हसताहसता आपणही इतरांच्या दृष्टीने कसे आणि कधी हास्यास्पद झालो, हे माणसांच्या लक्षात येत नाही. मिरासदारांच्या कथांमध्ये एका व्यक्तीकडून पसरत जाणारी हास्याची लाट कथेमध्ये जिवंतपणा आणते. ‘बापाची पेंड’, ‘नव्याण्णवबादची सफर’ यांसारख्या त्यांच्या कथा त्या दृष्टीने वाचण्यासारख्या आहेत.

     अतिशयोक्ती, उपहास, स्थानांतर, प्रसंगनिष्ठ विनोद, स्वभावनिष्ठ विनोदही सर्व विनोदी लेखनाची वैशिष्ट्ये त्यांच्या कथांमध्ये आढळतात. त्यांच्या कथेतला प्रसंग सहजगतीने उलगडत जातो. त्यात नाट्यमयता, दृश्यमयता, कथेला नवी कलाटणी देणारा प्रसंग, त्यातील अनपेक्षितपणा कथेच्या निवेदनातून जपलेला असतो. कथेचे निवेदन रंजक, वाचकाच्या मनातील कुतूहल जागे ठेवणारे, अधूनमधून मार्मिक टिप्पणी करणारे, आटोपशीर असे असते.

     ग्रामीण कथेचे निवेदन प्रमाणभाषेत, तर संवाद खास ग्रामीण बोलीभाषेतले असतात. या संवादांमध्ये बोलीभाषेतले खास ठेवणीतले, इरसाल (‘निवडक’ या अर्थाने) शब्द, शब्द उच्चारणातला ठसका, बोलीभाषेतल्या म्हणी-वाक्प्रचार आणि पात्रांशी एकरूप झालेली भाषा हे सारे गुण आढळतात. मिरासदारांनी ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी घेऊन व्यक्त होणार्‍या माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तींचा आविष्कार मनोरंजन करणार्‍या ग्रामीण विनोदी कथांचे लेखन करताना रंजकतेने मांडला . 

     पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ह्या संमेलनात त्यांनी सांगितलेली 'भुताची गोष्ट' रसिकांची दाद मिळवून गेली.

     अशा ह्या  विनोदाच्या बादशहाचे वयाच्या ९४ व्या वर्षी वार्धक्यामुळे पुण्यात निधन झाले .

     - प्रा. रूपाली शिंदे

मिरासदार, दत्तात्रय मारुती