Skip to main content
x

मंगळवेढेकर (जोशी) ,दामोदर काशिनाथ

दामुअण्णा जोशी

दामोदर काशिनाथ ऊर्फ दामूअण्णा जोशी यांचा जन्म मंगळवेढ्याला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव काशिनाथ जनार्दन जोशी होते. पं.दत्तोपंतांचे हे कनिष्ठ बंधू असल्यामुळे पंढरपूर येथे स्थापन झालेल्या धर्मार्थ महाराष्ट्र संगीत विद्यालयात पं. दत्तोपंत जोशी- मंगळवेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दामोदर जोशी  मृदंग, तबला, जलतरंग इत्यादी वाद्ये शिकले. पं. दामूअण्णांनी विद्यालयासाठी भरपूर काबाडकष्ट घेतले. विद्यालयाची झाडलोट करणे, जमीन सारवणे, रंग देणे अशी कामे त्यांना करावी लागत असत.
भल्या पहाटे मृदंगाचा रियाज सुरू व्हायचा तो सकाळी संपायचा. सकाळी नऊच्या सुमारास नवीन ताल, बोल, रचना यांची प्रात्यक्षिके चालायची. बसविलेले बोल दुपारच्या भोजनानंतर पुन्हा चारच्या सुमारास वाजवून दाखवावे लागत. रात्री वेगळा रियाज करावा लागे. एका तपाच्या, बारा वर्षांच्या शिक्षणानंतर त्यांनी नाव कमविण्यासाठी पुणे गाठले. पुण्यात प्रभात फिल्म कंपनीमध्ये त्यांनी वादक-कलाकार म्हणून नोकरी केली. मायामच्छिंद्र, अमृतमंथन इ. चित्रपटांतील पार्श्वसंगीतात त्यांनी मृदंग, तबला, जलतरंग यांची साथ दिली.
पं.दत्तोपंतांच्या सांगण्यावरून त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘स्टाफ आर्टिस्ट’ म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी दरम्यान त्यांना आकाशवाणी केंद्रांवर धृपद गायकांच्या मृदंगसाथीसाठी जावे लागले. त्यांनी अनेक गायक कलाकारांना, तसेच वादकांना साथ केली. पुणे आकाशवाणी केंद्रावर एखाद्या कलाकाराच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली वेळेची अवधी भरून काढण्यासाठी त्यांनी मृदंगवादन, जलतरंगवादनही केले.
जलद बोल टिपेच्या आवाजात स्वर कमी-अधिक करून उंचावण्याची त्यांची लकब विशेष म्हणता येईल. मुखबाजी ही त्यांची खासियत होती. आकाशवाणीच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तबला, मृदंगाचे शिक्षण देणे चालू ठेवले. पं. भीमसेन जोशी यांचे ते अतिशय आवडते तबला साथीदार म्हणून सर्व पुणेकर त्यांना ओळखत असत. मनमिळाऊ स्वभावामुळे कलाकार मंडळीत ते प्रसिद्ध होते. अनेक धृपद गायकांना मृदंगाची, तर शास्त्रीय गायनाला त्यांनी तबल्याची साथ दिली. प्रदीर्घ आजारानंतर ते कालवश झाले.

नरसिंह जोशी - मंगळवेढेकर

मंगळवेढेकर (जोशी) ,दामोदर काशिनाथ