Skip to main content
x

मंगळवेढेकर, सीताराम महाराज

     अक्कलकोट स्वामींच्या शिष्यांपैकी एक सीताराम महाराज मंगळवेढेकर यांचा जन्म सातारा शहरामध्ये शके १७७४ मध्ये रामनवमीच्या पावन दिनी झाला. बालपणीच त्यांचे मातृछत्र हरपले आणि या पोरकेपणात सावत्र आईचा छळ त्यांच्या नशिबी आला. त्यांच्या वडिलांचे नाव विनायक ऊर्फ बापू होते, तर सावत्र आईचे नाव होते रंगूबाई. सावत्र आईच्या जाचाबद्दल छोट्या सीतारामाने वडिलांकडे मन मोकळे केले. तेव्हा त्यास आईशी पटत नसेल तर घर सोडून जा,’ अशी पितृ आज्ञा झाली. अखेर घर सोडून सीताराम भटकत भटकत पंढरपुरास आला व विठ्ठलाला साकडे घालून, धरणे धरून बसला. काही दिवसांतच सीतारामाला विठ्ठलाचा दृष्टान्त झाला व अक्कलकोटला जाण्याचा संकेत मिळाला. श्री विठ्ठलाच्या दृष्टान्तानंतर सीताराम अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांना भेटला. स्वामींनी सीतारामाला श्रीराम जय राम जयजय रामअसा नामजप करण्यास सांगितले.

छोट्या सीतारामाला त्यांनी सीताराम महाराजसंबोधल्यामुळे हेच नाव पुढे सर्वत्र प्रचलित झाले. काही काळ अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या सहवासात राहून पुढे सीताराम महाराज स्वामींची आज्ञा घेऊन भ्रमण करीत संत दामाजीपंतांच्या मंगळवेढे गावी आले. मंगळवेढे येथील वास्तव्यात त्यांच्या योगशक्तीच्या कथा सर्वदूर पसरल्या, भक्तमंडळींचा ओघ वाढत गेला. त्यांना सीताराम महाराज मंगळवेढेकरअशा नावाने लोक ओळखू लागले. पण या उपाधीपासून सुटका करून घेण्यासाठी ते एके दिवशी कोणालाही न सांगता, अचानक मंगळवेढे सोडून निघून गेले.

पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाचे सेवाधारी बाळकोबा परिचारक यांच्या घरी सीताराम महाराज मंगळवेढेकर राहिले. आपल्या योगीपणाची-सिद्धीची-फारशी वाच्यता होऊ नये म्हणून ते सदैव वेडे चाळे करीत, विदेही अवस्थेतच एका कोपर्यात पडून राहत. स्वत:शीच तासन्तास बोलत, ‘वेडा सीत्या, वेडा सीत्याम्हणून स्वत:लाच संबोधत. बाळकोबांच्या घरी चारीठाव स्वयंपाक होत असतानासुद्धा सीताराम महाराज फक्त पिठले-भाकरीच खात असत.

त्यांना वाचासिद्धी प्राप्त होती. ते शक्तिपाताने अनेकांची दुखणी दूर करीत असत, पण लहरीनुसार. लोक त्यांच्या दर्शनार्थ परिचारक वाड्यात गर्दी करून त्यांच्या दर्शनाची संधी घेत. विठ्ठलाच्या पहाटेच्या पूजेला वेळेवर उठवले नाही म्हणून संतापून एका मामलेदारांनी बायकोच्या थोबाडीत मारली आणि देवदर्शन उरकून, सीताराम महाराजांचे दर्शन घेण्यास ते आले होते. सीताराम महाराजांनी मामलेदाराच्या थोबाडीत मारली आणि ते बायकोला मारताय व देवदेव करतायम्हणत तेथून निघून गेले. ब्रिटिश काळातील या घटनेने सर्व जण हादरून गेले. पण मामलेदारांना महाराजांच्या त्रिकाल ज्ञानित्वाचे दर्शन घडले. महाराजांनी दिलेला मार त्यांनी कृपाप्रसादच मानला. ब्रिटिशकाळात पुण्याप्रमाणेच पंढरपुरातही प्लेगची साथ आली व त्या काळात गाव खाली करण्यास ब्रिटिश सैनिकांनी सर्वांना भाग पाडले. बाळकोबा परिचारक परिवार घेऊन पंढरपुराहून १०-१२ किलोमीटरवर असलेल्या खर्डी गावातील आपल्या शेतात गेले. तेव्हा सीताराम महाराजही त्यांच्या परिवारासमवेत खर्डीला गेले आणि मग अखेरपर्यंत खर्डीतच राहिले.

सीताराम महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशी शके १८२५ (.. १९०३) रोजी खर्डी येथेच योगसमाधी घेतली. दरवर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला खर्डीत पुण्यतिथी उत्सव होतो व मोठी यात्रा भरते.

 - विद्याधर ताठे

 

संदर्भ :
१.  दासगणू विरचित आख्यान. २. दाणाईत; ‘सीताराम महाराज चरित्र’. 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].