Skip to main content
x

मोहम्मद, हुसेन खाँ

सारंगीच्या सुरांचा सात पिढ्यांचा जन्मजात वारसा लाभलेल्या आणि हरियाणाच्या झज्जर घराण्याची परंपरा असलेल्या उ. मोहम्मद हुसेन खाँ यांचा जन्म झज्जर या गावी झाला.

मोहम्मद हुसेन खाँना सारंगी वादनाचे बाळकडू  त्यांचे वडील उ. मुल्लाजी कादरबक्ष यांच्याकडून मिळत गेले, तर गायनाचे शिक्षण त्यांना गुडियानीवाले उ. बशीर खाँ व भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँसाहेब यांच्याकडून प्राप्त झाले. याचबरोबर विचित्रवीणेचे शिक्षण त्यांनी उ.जीरू खाँ व इंदूरचे उ.आबिद हुसेन खाँ यांच्याकडून घेतले.

मोहम्मद हुसेन खाँनी सुरुवातीच्या काळात स्वरांची साधना करीत  सोहराब मोदी यांच्या ‘आर्यसुबोध’ या नाटक कंपनीत वादनाचे काम केले. तसेच हिराबाई बडोदेकर यांच्या नाटक कंपनीत ते नोकरी करत. तेथे   ध्वनिमुद्रण आणि नाटकांना साथसंगत करत असत. बालगंधर्वांबरोबर ते वडिलांसमवेत आणि त्यांच्या पश्चातही सारंगीची साथ करीत असत. नंतर भालजी पेंढारकरांची अरुण सिनेटोन कंपनी, आणि पुण्यातील शालीमार फिल्म कंपनी, नवयुग फिल्म कंपनीत त्यांनी सारंगीवादनाचे काम केले.

पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर इ. ठिकाणी मोहम्मद हुसेन खाँ सारंगीच्या साथीला जात. त्यात प्रामुख्याने पं. बसवराज राजगुरू, गंगूबाई हनगल, सरस्वतीबाई राणे, आजमबाई, छोटा गंधर्व, मा. कृष्णराव फुलंब्रीकर, विनायकराव पटवर्धन, उ.मुश्ताक हुसेन खाँ, उ.नासीर हुसेन खाँ, उस्ताद विलायत हुसेन खाँ या दिग्गजांना त्यांनी सारंगीवर साथ दिली.

मोहम्मद हुसेन खाँनी १९४० साली भालजी पेंढारकर यांच्या हस्ते स्थापन केलेल्या पुण्यातील ‘अरुण म्युझिक क्लास’ या संस्थेमध्ये संगीत विद्यादानाचे कार्य सुरू केले. त्यांचे १९५५ पर्यंत मुंबई आकाशवाणीवर एक दिवस सारंगी वादनाचे, तर दुसर्‍या दिवशी गाण्याचे कार्यक्रम होत असत.

त्यांनी ‘उपज आणि ‘बंदिश’ या दोन पुस्तकांची निर्मिती केली. यात त्यांनी अनेक रागांच्या बंदिशींची रचना केली, तसेच दोन नवीन राग ‘हिंदरंजनी’ आणि ‘शिवकंस’ यांची निर्मिती केली. पं. जितेंद्र अभिषेकी व ज्योत्स्ना भोळे हे राग अत्यंत तन्मयतेने गात असत.

खाँसाहेबांचा त्यांच्या योगदानाबद्दल १९८४ साली अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्या ‘सितार अकॅडमी’तर्फे सन्मान करण्यात आला, तसेच मुंबईच्या ‘सुरसिंगार’ संस्थेतर्फे १९८५ साली गौरविण्यात आले. १९८७ साली पुणे महानगरपालिकेतर्फे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना ‘बालगंधर्व’ पुरस्कार देण्यात आला आणि १९८८ साली पुण्याच्या वेदशास्त्र संस्थेने त्यांचा सन्मान केला.

खाँसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत मधुकर खाडिलकर, मधुकर गोळवलकर, वामनराव गोडबोले, हसुलकर, थोरले चिरंजीव शब्बीर हुसेन खाँ, धाकटे चिरंजीव फैयाज हुसेन खाँ (व्हायोलिन) व अन्वर कुरेशी (गझल गायन) या शिष्यांना कलेमध्ये पारंगत केले.

फैयाज हुसेन खाँ

मोहम्मद, हुसेन खाँ