Skip to main content
x

मोकाशी, दिगंबर बाळकृष्ण

     दिगंबर मोकाशींचा जन्म रायगड जिल्ह्यात उरण येथे झाला. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी खासगी संस्थेतून अभियांत्रिकीमधील पदविका घेतली. पुढे चरितार्था-साठी त्यांनी पुण्यात रेडिओ रिपेअरिंगचे दुकान सुरू केले.

     दि.बां.चे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रसन्न होते. सरळ, सात्त्विक स्वभाव, शांत, संथ, अल्पसंतोषी, अजातशत्रू असे दि.बा.आयुष्याचा एकूणच अर्थ उमगलेले असे व्यक्तिमत्त्व होते.

     १९४१ सालापासून ते नियमित लेखन करू लागले. १९४१ ते १९८१सालापर्यंत त्यांनी १४०च्यावर कथा लिहिल्या. त्यांचे एकूण अकरा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी ‘कथामोहिनी’ (१९५३), ‘लामणदिवा’ (१९४७), ‘आमोद सुनासि आले’ (१९६०), ‘वणवा’ (१९६५), ‘चापलूस’ (१९७४), ‘एक हजार गाई’ (१९७५), ‘आदिकथा’ (१९७६), ‘माउली’ (१९७६), ‘तू आणि मी’ (१९७५), ‘जरा जाऊन येतो’ (१९८७) हे काही आहेत.

     त्यांनी ‘स्थलयात्रा’ (१९५८), ‘पुरुषास सर्व गुन्हे माफ’ (१९७१), ‘देव चालले’ (१९६१), ‘आनंदओवरी’ (१९७४), ‘वात्स्यायन’ (१९७८) या कादंबर्‍या लिहिल्या. त्यांपैकी ‘आनंदओवरी’ व ‘वात्स्यायन’ या चरित्रात्मक कादंबर्‍या असून अनुक्रमे संत तुकाराम आणि वात्स्यायन यांचे भावजीवन त्यांत रेखाटलेले आहे.

     ‘पालखी’ (१९६४), ‘अठरा लक्ष पावले’ (१९७१) ही प्रवासवर्णनात्मक पुस्तके आहेत. वेगळ्या दृष्टिकोनातून, नवीन तंत्रातून लिहिलेली ही पुस्तके समाजजीवनाचा शोध घेणारी आहेत. वारकर्‍यांसोबत त्यांनी चालत प्रवास केला आणि पंढरपूर गाठले. ‘अठरा लक्ष पावले’ हे त्या अनुभवावर आधारलेले आहे.

      ‘गुपित’, ‘जगाच्या कोलांट्या’, ‘अंधारदरी’ ही मुलांसाठी लिहिलेली पुस्तके असून हे बालवाङ्मय अद्भुत, विनोदी, रोजच्या जीवनातील प्रसंगांतून रेखाटलेले असून सुसंस्कार करणारे आहे. मराठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या संस्कार वाचनमालेत त्यांच्या बालकांसाठीच्या कथा समाविष्ट करण्यांत आलेल्या आहेत.

     दि.बां.ना शास्त्रीय विषयावर पुस्तके लिहायलाही आवडत. रेडिओ दुरुस्तीवरील त्यांचे पुस्तक, ‘यंत्र व तंत्र’ व ‘जमीन आपली आई’ ही विज्ञानविषयक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. विज्ञानकथेतही त्यांनी अल्पशी कामगिरी बजावली आहे. विज्ञानकथा, कुमारकथा, प्रवासवर्णन, कादंबरी इ. विविध वाङ्मयप्रकार हाताळूनही दि.बा.अभिजात कथाकार म्हणूनच अधिक ओळखले जातात.

     लहानपणापासून त्यांना वाचनाचे वेड होते. नाथ माधवांच्या कादंबर्‍या, प्रिन्स बिस्मार्कचे चरित्र अशा वाचनातून स्वतः लेखन करावे ही ऊर्मी त्यांच्यात निर्माण झाली. लहानपणी मोरोपंतांच्या आर्यांचे पाठांतर वडिलांनी करून घेतल्याने लेखनबीज मनात रुजले. स्वातंत्र्यलढ्यातला किंचितसा सहभाग, शिक्षणानंतर वाट्याला आलेली बेकारी, भुकेल्या स्थितीत केलेली भ्रमंती यांतून लेखन हाच आधार बनला. ‘अनंता’ ही पहिली कथा निर्मिली गेली. परंतु, पुढे स्वतःच्या आयुष्यावर, त्यातील समस्यांवर ते लेखन करीत राहिले नाहीत. भोवतालचे केलेले निरीक्षण, त्यातून केलेल्या नोंदी, खेड्यापाड्यांत, मुंबईत केलेला प्रवास, वेगवेगळ्या स्थळी अनुभवलेल्या, पाहिलेल्या आगळ्या-वेगळ्या गोष्टी यांतून केलेली टिपणे व कोऽहम या कोड्याने त्यांच्यातील कलाकार आकारत गेला. मी कोण ?, मी इथे का?, माझ्या जगण्याचा हेतू काय?, आयुष्याचा खेळ कशासाठी ? अशा विचारांतून लेखनाला सखोलता, व्यापकता येत गेली. कथा प्रगल्भ, जीवनदर्शी बनली. त्यांच्या बहुसंख्य कथा या प्रथमपुरुषी एकवचनी आहेत. सरळ, साधी कथा, संयत भाषा, अनलंकृतता व ओघवता प्रवाह; घटना सौम्य रोजच्या आयुष्यातले प्रसंग पण खटकेबाज प्रवाही संवाद, विषयाला हात घालणारी सुरुवात यांमुळे त्यांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण झाल्या आहेत.

     आपल्या कथालेखनाबद्दल ते म्हणतात, “कथा हा उत्स्फूर्त वाङ्मयप्रकार आहे. संतांच्या अभंगांइतकाच जीवनाच्या गाभ्यावर बाण मारणारा” त्यांच्या मते, कथेमधून व्यक्तिरेखा, त्यांच्या जीवनाचे ठोकताळे, आणि सौंदर्यलक्षणे सांगितलेली असतात. कथेचा परिणाम वाचकावर होण्यासाठी व्यक्तीमध्ये जास्त एकाग्रता, जास्त संवेदनक्षमतेची गरज असते.

     त्यांच्या कथांत, एका बाजूने खेड्यापाड्यांतील अंधश्रद्धांविषयी टीकाटिप्पणी टाळून, मार्मिक चित्रे रेखाटलेली दिसतात. दुसर्‍या बाजूने विज्ञानातील अतिप्रगत शोधांमुळे मानवी जीवनात काय घडू शकेल याची स्वप्ने ते रंगवितात. जगापलीकडच्या कहाण्या लिहिण्यातही त्यांची लेखणी रमते. विज्ञानकथा हा शब्द रूढ होण्याअगोदर ‘रेडिओची’ गोष्ट’, ‘शाश्वती’, ‘ग्रहयोग’सारख्या विश्वाबाहेरची वस्ती, ग्रहमाला, अंतराळ वगैरे शास्त्रीय अस्तर असलेल्या कथा त्यांनी लिहिल्या.

    अरविंद गोखल्यांच्या मते, ‘दि.बा.साध्या प्रसंगातून, प्रमेयातून अत्यंत वाचनीय, विचारांना झोका देणारी कथा लिहितात. प्रांजळ मनाचे जगाच्या व्यवहाराकडे कुतूहलाने आस्थेने पाहणारे असे हे कलावंताचे लेखन आहे. दि.बां.ची कथा ‘घट्ट विणलेली गोळीबंद’ कथा असते.

     माणूस साप्ताहिकातून दि.बां.नी ‘संध्याकाळचे पुणे’ हे चालविलेले सदरही त्यांच्या सुरेख शैलीने अत्यंत लोकप्रिय ठरले होते.

     कथेच्या वाढ व विकासात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अशी दि.बां.ची कथा आहे. त्यांचे समकालीन कथाकार तर त्यांच्या शैलीला मानतातच; पण पुढच्या पिढीतल्या लेखकांपैकी विजय तेंडूलकरांसारख्या चतुरस्र लेखकालाही दि.बां.ची कथा भुरळ घालते.

     - प्रा. संध्या टेंबेे

मोकाशी, दिगंबर बाळकृष्ण