मोरे, शेषराव बापुराव
शिक्षणाची परंपरा नसलेल्या एका वतनदार पोलीस पाटलाच्या कुटुंबात विचारवंत शेषराव मोरे यांचा जन्म झाला. नांदेडपासून सव्वाशे कि.मी.वर असलेले जांब हे त्यांचे जन्मगाव. इतिहास व सामाजिक विषयाची शालेय जीवनापासून आवड. मात्र इतरांच्या आग्रहामुळे त्यांना विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर व पुढे प्राध्यापक व्हावे लागले. वीस वर्षे ही शासकीय सेवा केल्यानंतर त्यांनी १९९४मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. सेवेत असताना सामाजिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना आठ-दहा तासच मिळत. आता भरपूर वेळ मिळू लागला. शालेय जीवनापासूनच वडिलांच्या प्रचंड धाकामुळे सतत अभ्यासात व्यग्र राहण्याची व गंभीर विषयावर विचार करण्याची सवय लागल्यामुळे खेळ, चित्रपट, दूरदर्शन, करमणूक व इतर गप्पागोष्टी वर्ज्य होत्या.
ज्या विषयावर ग्रंथलेखन करायचे आहे, त्या विषयावरील अधिकात अधिक ग्रंथसंग्रह करण्याची त्यांची पद्धत आहे. ‘काश्मीर’वर लिहिण्यासाठी त्यांनी पुणे-मुंबईसहित जम्मू व दिल्लीतील सर्व विद्यापीठांतून दोनशेपेक्षा अधिक ग्रंथ मिळवले होते. १८५७च्या उठावासंबंधीही एवढेच ग्रंथ मिळवले. इस्लामवर व इस्लामच्या इतिहासावर सध्या त्यांच्याकडे दोन हजारांपेक्षाही अधिक ग्रंथ आहेत. ग्रंथ लेखनविषयावरील निवडक सहा-सात हजार ग्रंथांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. यासाठी वडिलोपार्जित सर्व शेतजमीन त्यांनी विकून टाकली.
ग्रंथविषय निवडण्याचा त्यांचा एक विशिष्ट दृष्टीकोन आहे. तो विषय राष्ट्रीय वा सामाजिकदृष्ट्या आजच्याकरिता महत्त्वाचा असला पाहिजे. त्या विषयासंबंधी विचारवंतांनी व अभ्यासकांनी मांडलेली वा समाजात प्रचलित असलेली मते त्यांच्या दृष्टीने चुकीची असली पाहिजेत. विशेषतः अशा स्वरूपाच्या विषयासंबंधात मांडल्या जाणार्या विसंगतीची चिकित्सा व स्पष्टीकरण हे त्यांच्या लेखनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. यामुळे प्रचलित लोकप्रिय मतांपेक्षा वेगळे निष्कर्ष मांडणारे त्यांचे सर्व ग्रंथ समाजमनासाठी धक्कादायक ठरले. सावरकर एकाच वेळी प्रखर बुद्धिवादी व जाज्वल्य हिंदुत्ववादी कसे? या प्रथमदर्शनीच दिसणार्या विसंगतीच्या अभ्यासातून ‘सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास’ (इ.स. १९८८) या पहिल्याच ५६० पानी ग्रंथाचा जन्म झाला. सावरकरांनी आज वागण्यासाठी बुद्धिवाद, तर हिंदूंच्या न्याय हक्कांसाठी व हिंदूंचे एकत्व घडवण्यासाठी हिंदुत्व मांडले, हा त्यांचा ग्रंथनिष्कर्ष नवीन होता. सावरकरांच्या क्रांतिकारक समाजकारणाचे सत्य स्वरूप मांडून, त्यांच्या विरोधकांनी व अनुयायांनीही त्याचा कसा विपर्यास केला हे त्यांनी ‘सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास’ (इ.स. १९९२) या ७०० पानी ग्रंथात सप्रमाण मांडले आहे. या दोन्ही ग्रंथांनी सावरकरांकडे व हिंदुत्वाकडेही पाहण्याची नवी दृष्टी दिली. यासंबंधात दोन विद्वानांनी दिलेले पुढील अभिप्राय उल्लेखनीय ठरतील. ‘सावरकरांकडे इतक्या बुद्धिपूर्वक कुणी पाहिले नसेल’ - डॉ. द.न. गोखले; ‘त्यांनी खरे सावरकर उजेडात आणले’ - डॉ. स.ह. देशपांडे (‘दुसर्या पिढीचे आत्मकथन’ (इ.स. २००८, पृ. ४५).
‘काश्मीर : एक शापित नंदनवन’ (इ.स. १९९५) हा त्यांचा ग्रंथ अशाच प्रकारे एक राष्ट्रीय विसंगतीचा शोध घेणारा आहे. मुस्लीम प्रश्न सोडवण्यासाठी आपण फाळणी करतो, परंतु पाकिस्तानला लागून असलेला मुस्लीम काश्मीर भारतात ठेवून घेतो या विसंगतीची व काश्मीरच्या मूळ समस्येची खरी कहाणी सांगणारा हा ग्रंथ आहे. काश्मीर प्रश्न हा मूलत: मुस्लीम प्रश्न असून एकूण भारतीय मुस्लीम प्रश्न- एवढेच नव्हे, तर जागतिक मुस्लीम प्रश्न सोडवण्यावर त्याची सोडवणूक अवलंबून आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
हिंदू धर्माचा गौरव करणारे व हिंदू संघटनेेचे राष्ट्रीय महत्त्व सांगणारे डॉ. आंबेडकर इ.स. १९३५नंतर नेमके याविरुद्ध का बोलू लागले? त्यांच्या विचारात व धोरणात कशी परिवर्तने होत गेली, याची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी त्यांनी ‘डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास’ (इ.स. १९९८) हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाच्या मूळ नावात ‘परिवर्तने’ असा शब्द होता; पण ग्रंथ स्फोटक वाटू नये, म्हणून नंतर नाव बदलण्यात आले व त्याचमुळे हा बहुमोल ग्रंथ बहुतांशी दुर्लक्षित झाला, असे म्हणावे लागेल. इस्लाम शांतता, अहिंसा, संयम, सहिष्णुता, बंधुता अशा मानवी मूल्यांची शिकवण देतो, त्याचप्रमाणे आक्रमकता, जिहाद, तलवार यांचीही शिकवण देतो, असे कुराणाचेच आधार देऊन सांगितले जाते. यातील विसंगतीचा शोध घेण्यासाठी मूळ इस्लामचा सखोल अभ्यास व त्यातून निष्पन्न झालेला ‘मुस्लीम मनाचा शोध’ (इ.स. २०००) हा ७८४ पानी ग्रंथ म्हणजे मोरे यांनी हिंदूंना दिलेली एक देणगी मानावी लागेल. पैगंबरांच्या अनुयायांची संख्या अल्प असताना मक्का-काळात यातील पहिल्या प्रकारची, तर सामर्थ्य वाढल्यानंतरच्या मदिना-काळात दुसर्या प्रकारची शिकवण कुराणात आली आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. अल्लाचा संदेश (म्हणजे इस्लाम) न मानणार्यांना अल्लाच्या पृथ्वीवर राहण्याचा हक्क नाही, हे इस्लामी तत्त्वही त्यांनी स्पष्ट करून सांगितले आहे. या ग्रंथाचे इंग्लिश भाषांतर खीश्ररा चरज्ञशी षि ींहश र्चीीश्रळा चळवि (२००४) या नावाने प्रसिद्ध झाले आहे. पाच मुस्लीम पंडितांनी ६१ पानी प्रस्तावना लिहून या ग्रंथाचा पुरस्कार केला आहे.
इस्लामप्रमाणे ‘इस्लामचा इतिहास’ लिहिण्याचे ठरवून त्यांनी ‘प्रेषितांनंतरचे चार आदर्श खलिफा’ (अर्थात इस्लामचा सुवर्णकाळ) (इ.स. २००६) हा ६५६ पानी ग्रंथ लिहिला. या चार खलिफांना (अबू बकर, उमर, उस्मान व अली यांनी) इस्लाममध्ये प्रेषितांच्या खालोखाल प्रमाण व श्रद्धेय मानले जाते. या खलिफांच्या काळाप्रमाणे आदर्श इस्लामी राज्य स्थापन करण्याची आकांक्षा सर्व काळातील मुसलमान बाळगून असतात. या खलिफांच्या काळातच (इ.स. ६३२-६६१) पर्शियाचे पूर्ण पर्शियन व अर्धे रोमन साम्राज्य नष्ट होऊन तेथे इस्लामी राज्य कसे स्थापन झाले, याचा रोमहर्षक, रक्तलांछित व उद्बोधक इतिहास या ग्रंथात आहे. १९४७च्या स्वातंत्र्यासाठी हिंदू-मुस्लीम ऐक्य झाले नाही, मात्र तोच इंग्रज शत्रू असताना १८५७च्या उठावात ते ऐक्य कसे झाले, या विसंगतीच्या अभ्यासावरून ‘१८५७चा जिहाद’ (इ.स.२००७) हा ग्रंथ जन्मास आला. ‘मुस्लीम साम्राज्याची पुनःस्थापना करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला हा जिहाद होता’ हा डॉ. आंबेडकरांनी १९४० साली मांडलेला निष्कर्ष पुराव्यांनी सिद्ध करणारा हा ग्रंथ आहे. मूलतः हा उठाव परकीयांविरुद्ध नव्हता, तर काफिरांविरुद्ध होता; ब्रिटिशांपूर्वी तो शिखांविरुद्ध व मराठ्यांविरुद्ध झाला होता. काफिरांच्या राज्यावर (यात सेक्युलर राज्यही आले.) मुसलमान निष्ठा ठेवू शकतात काय? हा मूलभूत प्रश्न या उठावाशी संबंधित आहे. (या ग्रंथाचे इंग्लिश भाषांतर ’ढहश १८५७ गळहरवि’ नुकतेच दिल्लीच्या मानस पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.) त्याच्या पुढील (२०१२) ग्रंथ म्हणजे ‘काँग्रेसने व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा होय.
अप्रिय पण सत्य व हितकारक लिहिणे हा त्यांचा पिंडच आहे. ‘अप्रिय पण..’ या नावाने त्यांनी तीन वर्षे सामना दैनिकात स्तंभलेखन केले, ते त्याच नावाने दोन ग्रंथ भागात प्रसिद्ध झाले आहे. ‘विचार कलह’ या नावानेही त्यांचे दोन ग्रंथ भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनीही कलह माजवलाच आहे. शेषराव मोरे काही वर्षे म. रा. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. ते म.रा. दर्शनिका मंडळाचेही सदस्य होते. त्यांच्या चार ग्रंथांना राज्य शासनाचे ग्रंथ-पुरस्कार मिळाले आहेत. नांदेडकरांनी त्यांना ‘नांदेडभूषण’ पुरस्कार देऊन गौरवले आहे. २०१५च्या अंदमान येथे भरलेल्या ४थ्या विश्वमराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.