Skip to main content
x

नाईक, श्रीपाद रामचंद्र

हाराष्ट्रात, विशेषत: धुळे भागात रागसंगीताचा प्रचार-प्रसार करणारे श्रीपाद रामचंद्र तथा बाळासाहेब नाईक यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल येथे वडील रामचंद्र जनार्दन नाईक व आई जानकी या कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे सोन्या-चांदीच्या वस्तूंचे दुकान होते व त्यांना संगीताची आवड असल्याने अनेक कलाकारांच्या मैफली ते घरी करत. यातूनच श्रीपादवर बालवयात संगीताचे संस्कार झाले. वडिलांचे अकाली निधन झाल्याने आत्या तानूबाई यांनी दोघा भावंडांचे पालन केले.

श्रीपादची गायनाची आवड ओळखून त्यांस शालेय शिक्षणाबरोबर धुळ्यातील शंकरबुवांकडे गायनाचेही शिक्षण दिले. नंतर त्यांचे संगीताचे शिक्षण आग्रा घराण्याच्या उ. फैयाझ खाँसाहेबांचे शिष्य व नंदूरबार येथील सूरसिंगार संगीत विद्यालयाचे संचालक पं. श्री.बा. शास्त्री यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने, पंधरा वर्षे झाले. आग्रा घराण्याची गांभीर्यपूर्ण नोमतोम, भरदार ख्याल, रसिली ठुमरी यांवर त्यांचे प्रभुत्व तर होतेच, शिवाय आवाजातील नैसर्गिक गोडवा व फिरत यांमुळे श्रीपाद नाईक नाट्यगीत व भावगीतही उत्तम गात असत.

अंमळनेरला प्रतापशेट यांच्याकडे त्यांची पहिली मैफल झाली व मग नागपूर, इंदूर, मुंबई, पुणे इ. ठिकाणीही त्यांनी मैफली गाजवल्या. आकाशवाणीच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद व जळगाव केंद्रांवरून त्यांचे गायनाचे कार्यक्रम प्रक्षेपित होत असत.

‘सांगीतिक मानसशास्त्र व संगीत शिक्षणाची आधुनिक पद्धती’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९५९ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची ‘संगीताचार्य’ (डॉक्टरेट) ही पदवी प्राप्त केली. मात्र, एक व्रतस्थ संगीत शिक्षक व संगीतविषयक लेखक म्हणून त्यांची खास, खरी ओळख राहिली.

गुरूंच्या आज्ञेने त्यांनी १९४७ साली धुळे येथे ‘आदर्श संगीत विद्यालय’ सुरू केले व शेकडो विद्यार्थ्यांस त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी ‘संगीत अलंकार’, ‘संगीताचार्य’ पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन संगीत क्षेत्रात कार्यरत झाले. बालगंधर्व, भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खाँ, वसंत देसाई, प्रभा अत्रे, व्यंकटेश माडगूळकर, मंत्री रत्नाप्पा कुंभार अशा अनेक ज्येष्ठ कलाकार, साहित्यिक, अधिकारी व्यक्तींना या विद्यालयात त्यांनी वेळोवेळी निमंत्रित केले. संगीताबरोबरच वक्तशीरपणा, स्वच्छता, निर्व्यसनीपणा यांचेही संस्कार केले. त्यांनी स्वत: तीनशेहून अधिक बंदिशींची रचना केली होती.

धुळे जिल्ह्यातील आगाव येथील ट्रेनिंग कॉलेज (१९४० ते १९४३), कमलाबाई कन्या शाळा (१९४३ ते १९७३), विद्यावर्धिनी महाविद्यालय या संस्थांतूनही ते संगीताचे प्राध्यापक व विभागप्रमुख (१९६७ ते १९७५) म्हणून कार्यरत होते. पुणे विद्यापीठाच्या संगीत अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष व अभ्यासक्रम मंडळाच्या विद्वत्सभेचे सदस्य (१९६८ ते १९७३) म्हणून ते कार्यरत होते. बी.ए. पदवीचा संगीतविषयक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती. बहि:शाल शिक्षण मंडळासाठी ठिकठिकाणच्या शाळा व महाविद्यालयांत त्यांनी संगीतविषयक सप्रयोग व्याख्याने दिली.

या अनुभवांतून संगीताच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणपद्धतीवर श्रीपाद नाईक यांनी मूलभूत असे लेखन केले. ‘संगीतविषयक पाठांची टाचणे’ हे पुस्तक अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने प्रकाशित केले व ‘संगीत शिक्षा विशारद’ या पदवीच्या अभ्यासक्रमासाठी हे पाठ्यपुस्तक म्हणून मान्य झाले. ‘सांगीतिक मानसशास्त्र आणि आधुनिक शिक्षणपद्धत’ हे त्यांचे पुस्तक पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाने १९८२ साली प्रकाशित केले. हे लेखन संगीत शिक्षक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व शालेय स्तरावरील प्रत्यक्ष संगीत शिक्षकांना अत्यंत उपयुक्त ठरले. ‘संगीत कला विहार’ या मासिकातही ते सातत्याने अनेक वर्षे लेखन करत असत.

जळगावच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांनी संगीतविषयक प्राथमिक पाठ देणारी ५२ भागांची मालिका दोन वर्षे सादर केली होती. मराठवाडा-विदर्भातील अनेक विद्यालये व महाविद्यालयांतून त्यांनी संगीतावर सप्रयोग व्याख्याने दिली.

संगीत शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या बाळासाहेब नाइकांना १९७३ साली महाराष्ट्र शासनातर्फे ‘आदर्श संगीत शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुधीर फडके यांच्या हस्ते त्यांचा पंचाहत्तरीनिमित्त सत्कार झाला. त्यांच्या सांगीतिक व सांसारिक आयुष्यात त्यांना त्यांच्या पत्नी इंदूताईंची मोलाची साथ लाभली.

त्यांचा मोठा शिष्यवर्ग महाराष्ट्रात पसरलेला आहे, ज्यांत श्री.बा.शास्त्रींच्या कन्या नलिनी रोकडे, राजश्री शाह, सुनीता नांदेडकर, शुभांगी पाटणकर इत्यादींचा समावेश आहे. भावगीत गायिका अनुराधा मराठे याही त्यांच्याच शिष्या होत. धुळे येथेच वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने श्रीपाद नाईक यांचा मृत्यू झाला. त्यांचे स्मारक म्हणून धुळ्यातील महाविद्यालयातील संगीत कक्षास त्यांचे नाव देण्यात आले आहे.

चैतन्य कुंटे

नाईक, श्रीपाद रामचंद्र