Skip to main content
x

नाईक, सतीश काशिनाथ

            दृश्यकलेतील चित्र, शिल्प व उपयोजित कलेसंदर्भात ‘चिन्ह’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध करणारे धडपड्या व्यक्तिमत्त्वाचे सतीश काशिनाथ नाईक दृश्यकलेतील विविध विषय लोकांपर्यंत पोहोचविणारे एक कार्यकर्ते आहेत. अनेक संस्थांसाठी त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले असून प्रसंगी पदरमोड करूनही ते कलाविषयक प्रकाशने करीत असतात.

            सतीश काशिनाथ नाईक यांच्या आईंचे नाव कमल असून त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुक्तानंद हायस्कूल, चेंबूर येथे झाले. त्यानंतर कलाविषयक शिक्षणासाठी त्यांनी १९७५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेश घेतला. पेंटिंग आणि इंटीरिअर डिझाइन या दोन विषयांतील पदविका १९८१ साली मिळवून ते पत्रकारितेत शिरले.

            शैक्षणिक काळात त्यांच्या असे लक्षात आले, की मराठी भाषेत चित्रशिल्पकलाविषयक लेखन अत्यल्प आहे. हे लक्षात आल्यावर त्यांनी श्रीराम खाडिलकर यांच्यासमवेत ‘वेध’ या कलाविषयक अनियतकालि-काची निर्मिती केली. सतीश नाईक १९७४ ते १९८० या काळात प्रायोगिक रंगभूमी व ‘उन्मेष’, ‘अनिकेत’ या नाट्यसंस्थांच्या नाट्यनिर्मितीत सहभागी होते.

            ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसमूहाच्या ‘साप्ताहिक लोकप्रभा’मध्ये उपसंपादक म्हणून नाईक यांनी काम केले. याच काळात त्यांनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे कार्यकारिणी सदस्य, ‘आर्टिस्ट सेंटर’चे सहसचिव पद आणि ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या कार्यकारिणीवरही सदस्य म्हणून काम केले. आर्टिस्ट सेंटरतर्फे व दिल्लीच्या ‘ललित कला अकादमी’च्या सहकार्याने त्यांनी महाराष्ट्रात कार्यशाळांचे आयोजन केले. माळशेज (१९९१), जव्हार (१९९३), मुरुड-जंजिरा (१९९३), हरिहरेश्‍वर (१९९४) या ठिकाणी झालेल्या कार्यशाळांमध्ये शंभरपेक्षा जास्त नवोदित कलावंत सहभागी झाले होते.

            महाराष्ट्रातील कलावंत, कलाविषयक कार्य करणार्‍या संस्था, स्पर्धात्मक प्रदर्शने व शिष्यवृत्त्या यांची माहिती सहजपणे एकत्रितरीत्या उपलब्ध नसते असे लक्षात आल्यावर, सतीश नाईक यांनी १९८५ मध्ये ‘आर्टिस्ट डिरेक्टरी’ प्रकाशित केली.

            नाईक यांनी १९८७ पासून ‘चिन्ह’ हा फक्त ‘दृश्यकले’ला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. वेगळेपणामुळे ‘चिन्ह’ या अंकाचा गौरव व स्वागत अनेक ठिकाणी झाले. यानंतर १९८८ व ८९ या वर्षी प्रसिद्ध झालेल्या ‘चिन्ह’मधून अनेक मान्यवर व नवोदित लेखकांचे लेख, अनुभव, मुलाखती यांतून दृश्यकलाजगताची ओळख सामान्य वाचकांना झाली.

            आर्थिक अडचणींमुळे ‘चिन्ह’चे प्रकाशन १९९० च्या दशकात झाले नाही व एका तपानंतर २००१ पासून पुन्हा ‘चिन्ह’चे दिवाळी अंक प्रसिद्ध होऊ लागले. यातील २००३ चा दिवाळी अंक ‘भास्कर कुलकर्णी विशेषांक’ व २००६ चा ‘गायतोंडे विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला. यानंतरचा २००९ चा ‘काला बाजार’ हा विशेषांक कलाशिक्षण क्षेत्रातील दुरवस्था आणि १५० वर्षे साजरी करणार्‍या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट व कलासंचालनालयातील भ्रष्टाचार व सरकारी अनास्था उघडकीस आणणारा होता.

            या सर्वांतून सतीश नाईक व त्यांच्या सहकार्‍यांची कलाशिक्षणाबद्दलची तळमळ आणि ही परिस्थिती बदलण्याचा ध्यास दिसून येतो. याच वर्षी १९८७-८८-८९ या ‘चिन्ह’च्या तीन दिवाळी अंकांमधील निवडक लेखांचे ‘निवडक चिन्ह’ हे पुस्तकही प्रकाशित झाले.

            या सर्व खटाटोपातून नाईक यांनी, आर्थिकदृष्ट्या काय मिळाले याचा कधीच हिशेब केला नाही. लेखकांनीही या प्रयत्नाकडे एक चळवळ म्हणून पाहिले व दृश्यकला क्षेत्रात काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न म्हणून कोणतीही अपेक्षा न करता आपले योगदान दिले. त्यामुळेच आज ‘चिन्ह’ ही ‘कला-चळवळ’ म्हणून उभी राहील अशी आशा सर्व संबंधितांना वाटत आहे.

            सतीश नाईक यांचा विवाह १९८३ मध्ये उपयोजित कलाकार नीता राजे यांच्याशी झाला व तेव्हापासून त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नीचाही सहभाग आहे. त्यांना १९८३ व १९८४ या वर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात पुरस्कार आहे. त्यांची स्वत:ची एकल व समूह प्रदर्शने मुंबईत व देशात अनेक ठिकाणी झाली आहेत. याशिवाय त्यांना नाट्यविषयक लेखनासाठी १९८०, १९८२, १९८६ या वर्षी ‘नाट्यदर्पण’ व ‘कलासरगम’-ठाणे या संस्थांचा पुरस्कारही मिळाला आहे.

            - शिरीष मिठबावकर

नाईक, सतीश काशिनाथ