Skip to main content
x

नाखवा, पांडू गुलाम

आनंद भारती स्वामी

   स्वामी आनंद भारती म्हणजेच पूर्वाश्रमीचे पांडू गुलाम नाखवा यांचा जन्म ठाणे चेंदणी कोळीवाड्यात झाला. महाराजांच्या घरची स्थिती गरिबीची होती. समुद्रसफरी करून मासेमारी करणे हा पिढीजात धंदा होता. पांडूने शिक्षण घेण्यापेक्षा धंद्यात लक्ष घालावे अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे बालवयातच पांडू मच्छिमारी करू लागला. पांडूला बालवयात भगवंताच्या उपासनेत मोठी गोडी होती. नामसंकीर्तनात, ईश्वरभक्तीत तो सदैव लीन असे. ‘भक्ति बिन कोई तर नहीं जावे’ असे त्याचे मत होते. आपल्या मासेमारीच्या धंद्यानिमित्त होडीतून, पडावातून दर्यावर ये-जा करी, तरी त्यांची प्रात:काळी समुद्रस्नान, भजन, प्रार्थना कधीही चुकत नसे.

     परमेश्वराची आराधना माणसाने सदा-सर्वदा केली पाहिजे अशा मताच्या पांडूच्या रूपाने दर्यावर मूर्तिमंत भगवंतच वावरत होता. शरीर धंद्यात गुंतले असले, तरी मन परमेश्वर सेवेत लीन झाले. ते हळूहळू जहाजाचे मुख्य अधिकारी म्हणजेच तांडेल झाले. विसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला; पण ते संसारात रमले नाहीत.

     एकदा पांडू महाराज दूरवरच्या फत्तेमारीस निघाले. जहाज अतिशय खोल समुद्रात होते. अचानक प्रचंड वादळ झाले. प्रचंड लाटा उसळू लागल्या. बघता-बघता जहाज बुडू लागले, समुद्रात जलसमाधी घेण्याची वेळ येऊन ठेपली. इतर खलाशांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न होता. त्यांच्या जीवनाची जबाबदारी महाराजांवर होती. अशा वेळी महाराज पद्मासन घालून ध्यानस्थ बसले. त्यांनी स्वामी समर्थांचा धावा केला. आपले पुढील आयुष्य त्यांनी समर्थांच्या सेवेसाठी अर्पण करण्याची शपथ घेतली. वादळ एकाएकी थांबले. फत्तेमारी सुखरूप पार पडून जहाज सुखरूप परत आले आणि लागलीच महाराजांनी अक्कलकोटला समर्थांच्या दर्शनासाठी प्रयाण केले.

     ‘जया सद्गुरू पावला । धन्य तोचि जगी झाला ।’

     या भावनेने महाराज अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मठामध्ये पोहोचले. त्या वेळी श्री स्वामी समर्थ इतर शिष्यांसमवेत नाम-संकीर्तनात देहभान विसरून गुंग झाले होते. महाराज दरवाजात येताच श्री स्वामी समर्थ समाधीतून एकदम जागे झाले आणि उठून उभे राहिले. पांडू महाराजांनी धावत जाऊन स्वामींचे पाय धरले आणि सद्गदित होऊन म्हणाले, ‘‘महाराज, मला आता संसार नको. आपली सेवा हाच माझा संसार, मला दुसरे काही नको. आपण मला आशीर्वाद द्या.’’ त्यांना स्वामी समर्थांनी पोटाशी धरले. सारे शिष्य हे मनोहर दृश्य विस्मयाने पाहू लागले. समर्थ म्हणाले, ‘‘अरे कोळ्याच्या पोरा, साध्या सागराला एवढा घाबरतोस? तुला तर या दुनियेचा सागर तरून जायचे आहे.’’ समर्थांनी असे म्हणून त्यांना अनुग्रह दिला.

     समर्थांच्या आज्ञेनुसार ते ठाण्याला परत आले आणि त्यांनी आपले कार्य सुरू केले. महाराजांनाही इतर साधु-संतांप्रमाणे प्रथम निंदा, टवाळी, अपकीर्ती सहन करावी लागली; पण महाराज अत्यंत मृदू आणि कृपाळू होते. त्यांनी हे सारे निमूटपणे सहन केले; परंतु हळूहळू त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येऊन अनेक लोक त्यांच्या भजनी रंगू लागले. ठाण्याला औदुंबराखाली चालणार्‍या भजन-कीर्तनात सारे रंगून जात. त्यांनी लोकांना अनेक दृष्टान्त दिले. स्वामी समर्थांची आठवण झाली की ते लगेच अक्कलकोटची वाट धरत. समर्थांची भेट घेऊन तृप्त होत आणि परत येऊन नव्या शक्तीनिशी कामाला लागत. त्यांच्याबरोबर त्यांचे ठाण्यातील शिष्यही अक्कलकोटला जाऊन यायचे. १८६६ साली सुमारे २,५०० रु. खर्च करून स्वामी समर्थांच्या पादुका ठाण्याला सध्याचे दत्तमंदिर आहे तेथे आणून पांडूबुवांनी मठ बांधला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली. त्या वेळी स्वामींनी ‘ये आनंद लेव व भारती हो जाव’ असे उद्गार काढले व यापुढे भगवी वस्त्रे परिधान कर असे सांगितले. पुढे हळूहळू त्यांचे ‘आनंद भारती’ हे नाव रूढ झाले.

     ते मठातच राहू लागले. पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष स्वामी समर्थच या ठिकाणी वास करतात, अशी त्यांची धारणा होती. महाराजांचा शिष्य परिवारही खूप वाढला होता. भोळेभाबडे कोळी, ठाणकर, पाटील, हिराजी मेस्त्री, केरबा सहानी, मॅजिस्ट्रेट साहेब गोविंदराव गाडगीळ, बापूजी बदलापूरकर, तसेच त्यांचे पट्टशिष्य श्री गोपाळराव विद्वांस असा शिष्यपरिवार होता. विद्वांस हे मूळ कोकणातले; पण व्यवसायामुळे पुण्याला असत. त्यांनी ‘गुरुलीलामृत’ नावाने महाराजांचे चरित्र लिहिले आहे. समाजातील सर्व थरांतील म्हणजे कोळी, भंडारी, आगरी, ब्राह्मण, सुतार, तेली सर्व मंडळी महाराजांचे भाविक भक्त होते. महाराजांचे आपल्या भक्तांवर जिवापाड प्रेम होते.

     श्री आनंद भारती महाराज ‘मोक्षाय व जनहिताय’ तब्बल सत्तर वर्षांचे जीवन जगले. इ.स. १९०१ मध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला, सोमवारी रात्री स्वामी समाधिस्थ झाले. कोळी समाज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर चंपाषष्ठीस मोठा उत्सव साजरा करतो. महाराजांच्या मार्गदर्शनाने जीवनदिशा मिळालेल्या ठाणे येथील कोळी समाजाने चेंदणी, कोळीवाडा येथे ‘श्री आनंद भारती समाज’ या नावाची भव्य इमारत बांधून त्यांचे दिव्य स्मारक उभारले आहे. महाराजांचे अखंड सेवेचे व्रत ही संस्था सध्याही चालवत असून आनंद भारती समाजातर्फे भजन, पुस्तकालय, व्यायामशाळा, क्रिकेट, पतपेढी, महिला विकास अशी कार्ये सतत चालू आहेत.

     प्रतिवर्षी या समाजातर्फे दर चंपाषष्ठीस आनंद भारती महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. श्री आनंद भारती स्वामींची समाधी श्री लक्ष्मी नारायण मंदिर, नौपाडा, गावदेवी मंदिराजवळ आहे.

— संपादक मंडळ

नाखवा, पांडू गुलाम