Skip to main content
x

नायगावकर, अशोक वसंत

     अशोक वसंत नायगावकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला. तेथे आणि मनमाड येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. वाईच्या किसनवीर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांना ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये नोकरी लागली. तेथे इमानेइ-तबारे एकतीस वर्षे काम करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. नोकरीत असल्यापासूनच ते कवी म्हणून मान्यता पावलेले होते.

नायगावकरांचे नंतरचे सारे आयुष्य शहरात गेले असले, तरी त्यांच्यातला ‘गावाकडचा माणूस’ त्या झुपकेबाज मिश्यांसह ‘मी तुम्हांला सांगतो...’ या वाक्यातून अजूनही तसाच वास करून आहे. मराठीत विनोदी कविता तशी कमीच आणि जी आहे ती प्राधान्याने विडंबन काव्याकडे झुकलेली. या पार्श्वभूमीवर नायगावकरांनी स्वत:ची स्वतंत्र अशी शैली जोपासत समाजातील विसंगतींवर उपरोधिक भाष्य करणारी कविता लिहिली आणि भाष्यासह सादरीकरणाच्याही वैविध्यपूर्ण शैलीने ती लोकप्रिय केली.

त्यांचा ‘वाटेेवरच्या कविता’ (१९९२) हा संग्रह प्रसिद्ध असून ‘कवितांच्या गावा जावे’ या समकालीन मराठी कवींच्या महेश केळूसकर संपादित संग्रहात नायगावकरांच्या पंधरा कवितांचा समावेश आहे.

सजगता आणि सामाजिकता हा कवीचा आणि खास करून व्यंगकवीचा प्राण असतो. नायगावकरांनी त्याचा वापर नेमकेपणाने करून उपहास, उपरोध यांच्या साहाय्याने समाजाच्या जाणिवा वेधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. ‘कवितांच्या गावा जावे’, ‘हृदयधारा’ इत्यादी कार्यक्रमांतून आणि श्राव्यमाध्यमातून त्यांची कविता मराठी माणसापर्यंत सर्वदूर पोहोचली आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘हास्यरंग’ पुरवणीच्या संपादनात त्यांचे सहकार्य असून त्यातून त्यांनी विनोदी गद्यलेखनही विपुल केले आहे. ‘प्रिय लालूस’, ‘अनंत अपराधी’ या नावांनी त्यांनी लिहिलेली पत्रे ललित आणि विनोद यांचे मनोहारी मिश्रण आहे. रविवार ‘लोकसत्ता’मधून ‘काकाचा कट्टा’ सदरातून नायगावकर काका वाचकांच्या प्रश्नांना मार्मिक, मिस्कील आणि तिरकस उत्तरे देतात.

नायगावकरांना त्यांच्या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा कविवर्य केशवसुत पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) ह्या संस्थेचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. या तीन प्रतिष्ठित पुरस्कारांसह त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. भारतीय ज्ञानपीठाच्या ‘भारतीय कविताऐं’ या संग्रहात नायगावकरांच्या कवितांची दोन वेळा निवड झाली असून अखिल भारतीय व अन्य मराठी साहित्य संमेलनांत त्यांनी अध्यक्ष, सूत्रसंचालक व काव्यवाचक या नात्यांनी अनेक वेळा भाग घेतला आहे. झी मराठी वाहिनीच्या ‘हास्यसम्राट’ मालिकेत परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.

अशोक नायगावकरांनी आपल्या उपरोधिक शैलीचा वापर सामाजिक आशय व्यक्त करण्यासाठी जाणकारीने केला आहे.

- मधू नेने

नायगावकर, अशोक वसंत