Skip to main content
x

नेरकर, योगेंद्र शंकर

       योगेंद्र शंकर नेरकर यांनी १९६४ मध्ये पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. (कृषी) पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत विद्यापीठात दुसरा क्रमांकाने मिळवली. त्यांनी १९६६ मध्ये नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तून पदव्युत्तर पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत आणि याच संस्थेतून उत्पत्तिशास्त्र विषयात पीएच.डी. ही पदवी १९७० मध्ये प्राप्त केली.

       डॉ. नेरकर ८ एप्रिल १९९६ ते १३ मे १९९९ या तीन वर्षांच्या कालावधीत म.फु.कृ.वि.चे कुलगुरू होते. त्यांनी पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या १७ व पीएच.डी. परीक्षेच्या १३ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे १२५ संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील तांत्रिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी लोह खनिजाची कमतरता असलेल्या पठारी प्रदेशात अपेक्षित उत्पन्न देणाऱ्या बुटक्या सुवासिक ‘प्रभावती’ व ‘सुगंधा’ या भाताच्या जाती विकसित केल्या. रानभेंडीमधील विषाणू प्रतिकारशक्तीचा गुणधर्म परावर्तित करून त्यांनी ‘परभणी क्रांती’ ही भेंडीची जात विकसित केली. आशिया व आफ्रिका या खंडांमधील भूप्रदेशात झालेल्या भेंडी लागवडीतील उत्क्रांतीविषयी त्यांनी पेशी उत्पत्तीशास्त्रावर आधारित महत्त्वपूर्ण काम केले. अधिक उत्पन्न देणाऱ्या तुरीच्या जातीसाठी लागवड पद्धतीवर आधारित निवड पद्धत विकसित केली. दख्खनच्या पठारी भागातील जिरायती भूभागावर अपेक्षित उत्पन्न देणारी वाटाण्याची फुले विकास ही जात विकसित केली. त्यांनी भारतात प्रथमच पुवंध्य परागकोश असलेल्या करडीच्या वंशावळीबाबत संशोधन केले. त्यांनी प्रामुख्याने संकरित कापसाच्या, अनुवंशिक व जातीनिहाय शुद्धता निश्चित करण्यासाठी बियाणातील प्रथिने व इतर घटक द्रव्यांचा वापर असलेल्या चाचण्या विकसित केल्या. ऊस, भात, डाळी इ.मध्ये अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी रोप व परागकोश यांच्या पेशीसमूहाच्या उपयोगाबाबत संशोधन केले. भातातील परागकोश पेशीसमूहाचा उपयोग करून पठारी प्रदेशासाठी बासमतीसारख्या भाताची जात विकसित केली व ए.सीआर. ४०१ या उपजातीचे बियाणे प्रायोगिक तत्त्वावर पुरवण्याचे काम केले.

       डॉ. नेरकर यांना महाराष्ट्र शासनाने राज्याची कृषी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेल्या बहुमोल संशोधनासाठी सुवर्णपदक व रोख यांचा समावेश असलेला कृषिभूषण पुरस्कार प्रदान केला. पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने डॉ. नेरकर यांच्या कृषीविषयक संशोधनातील योगदानाबद्दल पुरस्कार दिला.

       नवी दिल्ली येथील भारतीय उत्पत्तिशास्त्र व वनस्पति-प्रजनन संघटनेतर्फे डॉ. नेरकर यांना संघटनेच्या नियतकालिकात १९८४-८५ या द्वैवार्षिक कालावधीत प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट संशोधनपर लेखासाठी पुरस्कार देऊन गौरवले. डॉ. नेरकर यांनी लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यात भाग घेतला होता.

- संपादित

नेरकर, योगेंद्र शंकर