Skip to main content
x

नेरुरकर, रमेश जनार्दन

           मेश जनार्दन नेरुरकर यांचा जन्म गिरगाव (मुंबई) येथे झाला. ते मुंबईच्या विल्सन हायस्कूलमधून १९४७मध्ये मॅट्रिक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून १९५१मध्ये बी. एस्सी.(कृषी) पदवी परीक्षा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी तीन वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून सातारा जिल्ह्यात कराड व पाटण येथे काम केले. त्यांनी एक वर्ष सावंतवाडी तालुक्यात शेती केली. त्यांनी १९५५ पासून ५ वर्षे बिहारमधील कृषी खात्यात संशोधन साहाय्यक व विस्तार अधिकारी असा अनुभव घेतला. त्यांची १९६० मध्ये आरे कॉलनीतील दुग्धविकास संस्थेत कृषी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाकडून निवड झाली व १९६४ पर्यंत ते तेथे कार्यरत होते. १९६४ मध्ये अमरावती येथे दुग्धशाळा व्यवस्थापक व १९६५ नंतर पाच वर्षे ते नागपूर दुग्धशाळेचे प्रमुख होते. या काळात दूध संकलन ८०० वरून ४०,००० लीटरपर्यंत वाढले. १९७० मध्ये ते सोलापूरच्या दुग्धशाळेचे प्रमुख झाले व तीन वर्षांत त्यांनी ५०० वरून २०,००० लीटरपर्यंत दूध संकलन केले. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध संकलन करून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाची गोडी लावली.

           १९७३ पासून मराठवाड्यात औरंगाबाद येथे दुग्धशाळा प्रमुख व १९७५ मध्ये मराठवाडा विकास निगमतर्फे दुग्धविकास कार्य केले. एकात्मिक ग्राम विकास प्रकल्प राबवून खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड व औरंगाबाद तालुक्यांत महाराष्ट्र व सेंट्रल बँकेच्या मदतीने ८०० थारपराकर दुधाळ गायींचे वाटप अल्पभूधारक शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांनी दुधाच्या पैशातून बँकांचे ९७% कर्ज फेडले. अनेक ठिकाणी दुग्धशाळेच्या इमारती, शीतकरणासाठी बर्फाचा कारखाना बायफबरोबर करार करून ८० गावांत संकरित गो-पैदासीचे कार्य केले. त्यांनी १९७७ मध्ये कुर्ला मातृ दुग्धशाळेत महाव्यवस्थापक पदावर उल्लेखनीय कार्य केले. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात कर्मचारी उपलब्ध नसताना सतत ५७ दिवस दुग्धशाळा विनानुकसान चालवली. १९७९ पासून १९८१ पर्यंत प्रादेशिक दुग्धशाळा अधिकारी नागपूर या पदावरून विदर्भ, मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांचे दुग्धविकास नियोजन, शीतकेंद्रांची उभारणी, जातिवंत म्हशींचे वाटप, दुग्धशाळा व दूध भुकटी कारखाना उभारणी इ. अनेक कामे केली. १९८१ नंतर तीन वर्षे मुंबई मुख्यालयात दुग्धविकास विस्तार अधिकारी या पदावर बढती मिळून अनेक महत्त्वाची कामे केली. मिरज दुग्ध-भुकटी प्रकल्प, धुळे-दिल्ली, धुळे-सुरत, नगर-मुंबई रेल्वे टँकर दूध वाहतूक इ. प्रकल्प कार्यान्वित केले. शेवटी १६ महिने शासनातर्फे प्रतिनियुक्तीवर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघाचा महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले. संघाचा ४ कोटींचा तोटा भरून काढून १४ कोटी फायदा करून दिला. शिरोळ व गडहिंग्लज येथे नवीन दुग्धशाळा शीतकरण केंद्र, कोल्हापूर येथे दूध भुकटी कारखाना इ. नवीन प्रकल्प राबवून संघ ऊर्जितावस्थेत आणताना शेतकऱ्यास दुधाचा दर लीटरला १ रुपयाने वाढवून देऊन उत्पादकांचा दुवा घेतला. १९८९ मध्ये निवृत्तीनंतर ६ खासगी दुग्धशाळांना धुळे, ठाणे, वारणा, कोल्हापूर, गोवा इ. ठिकाणी मार्गदर्शन करून दुग्ध व्यवसायांना व शेतकऱ्यांना मदत केली. विदर्भातील मेळघाट, अहेरी, गडचिरोलीसह सर्व जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यात सर्वत्र शेतकरी व आदिवासींच्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय रुजवण्याच्या त्यांच्या ध्यासामुळे ते शेतकऱ्यांच्या प्रेमाला व आदराला पात्र ठरले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

नेरुरकर, रमेश जनार्दन