निंबकर, बनबिहारी विष्णू
धनगर समाज आणि समाजातील सर्व थरांमधील शेळी व मेंढीपालन करणाऱ्या सर्वांच्या उन्नतीसाठी शेळ्या व मेंढ्यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास करून या समाजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे बनबिहारी विष्णू निंबकर यांचा जन्म मडगाव-गोवा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाची सुरुवात भारतात झाली, पण पुढचे शालेय शिक्षण त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया राज्यातील जॉर्ज स्कूलमध्ये घेतले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी न्यू जर्सी येथील रुटगर्स महाविद्यालयात घेतले. याच महाविद्यालयामधून बी.एस्सी. (कृषी) पदवी १९५१मध्ये संपादन केली. त्यांनी १९५६मध्ये अमेरिका येथील अॅरिझोना विद्यापीठातून एम.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. मातृभूमीच्या ओढीने १९५७च्या सुमारास भारतामध्ये परतल्यावर त्यांनी प्रथम महाराष्ट्रामधील फलटण येथील १०० एकर जमीन कसण्यास घेतली. या संपूर्ण जमिनीत दलदल असून बाभूळ वा तत्सम वनस्पती तेथे माजल्या होत्या. त्यामुळे त्यांनी प्रथम अनेक चर काढून जमिनीमधील पाण्याचा निचरा करून ती लागवडीयोग्य केली. फलटण येथे शेती करत असताना त्यांनी परिसरातील अल्पभूधारक शेतकरी, सालकरी गडी, शेतमजूर, धनगर इ. लोकांच्या समस्यांचा अभ्यास केला. सहा वर्षे सातत्याने परिसरामधील शेती व शेतकरी जीवन, पावसाने सतत हुलकावणी देण्याचे भागामधील जीवनमान, येणाऱ्या सततच्या दुष्काळ छायेमुळे होणारी सर्वांची परवड याचाही अभ्यास केला. उत्तम वाणाची व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही, या विचाराने त्यांनी १९६८मध्ये निंबकर कृषी संशोधन संस्था व १९७१ मध्ये निंबकर सीड्स प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. या दोन्ही संस्थांमुळे शेतकऱ्यांनी शेतात उभे राहिलेले पीक पाहिले व त्यांना वाणाची खात्री पटली. या बियाणे हमीमुळे जवळजवळ ३५ ते ४० वर्षे शेतकऱ्यांना दोन्ही संस्थांचा लाभ झाला. निंबकरांनी उत्तम शेती उत्पन्नासाठी कापूस, सूर्यफूल, करडई, ज्वारी, मका इ. पिकांच्या विविध जाती निर्माण केल्या. या जाती निर्माण करताना कोरडवाहू व अल्पसिंचन गटामधील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने विचार केला गेला. या निर्माण केलेल्या बियाण्यांचा सर्व भारतभर प्रसार व खप वाढला. ‘शेळी ही गरिबाघरची गाय’ आहे, या महात्मा गांधींचे ब्रीदवाक्य हे सातत्याने परिसरातील लोकांचे जीवनशैलीचा अभ्यास करताना कायम लक्षात होते. दारात उत्तम शेळी असेल, तर गृहिणी मीठमिरचीचा खर्च वाचवू शकते व पैदासीच्या विक्रीमधून चार पैसे बाजूला टाकू शकते या सिद्धान्तानुसार त्यांनी शेळीच्या व मेंढीच्या विविध जातींचा सातत्याने अभ्यास केला. उत्तम दूध देणारी, उत्तम पैदास देणारी व कोरडवाहू शेतकऱ्याच्या दारामध्ये अल्पखर्चात सहजगत्या सांभाळता येईल अशी जात निर्माण करण्यासाठी १९९० मध्ये निंबकर कृषी संशोधन संस्थेमध्ये स्वतंत्र पशु-संवर्धन विभागाची स्थापना झाली.
निंबकरांचा शेती व शेळी-मेंढीपालनाबाबतचा अभ्यास, संशोधन व यशस्वी प्रयोग याची सरकारने दखल घेतली व १९८८ मध्ये शेळी व मेंढीपालनामधील समस्या व उपाय या आयोगावर अध्यक्षपद नेमले. या आयोगाच्या अभ्यासातून १४ डिसेंबर १९८९ रोजी महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती झाली. या संस्थेमध्ये सर्व सरकारी व निमसरकारी संशोधकांचा समावेश केला गेला. दक्षिण आफ्रिकेमधील ‘बोअर’ या जातीची शेळ्यांमध्ये आदर्श वाण म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. भारतात १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारच्या आर्थिक सहकार्याने बोअर शेळ्यांचे भ्रूण व वीर्यमात्रा आणल्या. या भ्रूणांचे रोपण स्थानिक ‘सिरोही’ शेळ्यांमध्ये करून १९९४ च्या सुमारास संस्थेचा पहिला बोअर शेळ्यांचा कळप निर्माण केला.
दुधाळ शेळीसाठी ‘सानेन’ जातीच्या शेळ्यांचा प्रसारही केला गेला. याच कार्याचा पुढील टप्पा म्हणून सीरिया या देशामधून दूध व मांस दोन्हींसाठी उपयुक्त अशा ‘दमास्कस’ शेळ्यांचे गोठित वीर्य तयार करून आणण्यात आले. मेंढीने जर शेळीप्रमाणे जुळ्या पिल्लांना जन्म दिला तर आपोआप मेंढीपालकांचे जीवनमान उंचावेल हा साधा विचार घेऊन निंबकरांनी मेंढीच्या जातींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगालमधील सुंदरबन प्रदेशातील ‘गरोळ’ जातीची मेंढी जुळ्या पिल्लांना जन्म देते, हे त्यांना समजले. पुढे या जातीच्या मेंढ्यांचा जनुकीय अभ्यास करण्यावर भर देण्यात आला. तसेच या प्रयोगामधील एक महत्त्वाचे यश म्हणजे स्थानिक दख्खनी मेंढीशी संकर करून नवीन ‘नारी सुवर्णा’ ही जुळ्या पिल्लांना जन्म देणारी जात निर्माण केली गेली.
निंबकर यांचे शेतीमधील महत्त्वपूर्ण संशोधनाचे अनेक लेख, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाले आहेत. निंबकर हे कृषी संशोधन संस्था, निंबकर सीड्स प्रा.लि., संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी विभागाचे संचालकपद, ‘मॅफको’चे अध्यक्ष व महाराष्ट्र शेळी व मेंढी आयोगाचे अध्यक्ष ही पदेही सजगपणे भूषवली आहेत. निंबकर यांचे कृषी क्षेत्रामधील अमूल्य संशोधनात्मक योगदान व तळमळ यांची दखल घेऊन केंद्र सरकारने २००६चा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. निंबकर कृषी संशोधन संस्था ही कृषी संशोधक व अभ्यासक यांच्यासाठी ‘कृषी पंढरी आहे.’