Skip to main content
x

नवरे, शंकर नारायण

      पल्या लेखनातून मानवी मनाचा आणि दैनंदिन जीवनाचा वेध घेणार्‍या शंकर नारायण नवरे यांनी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले. ते शासकीय अधिकारी होते. महाराष्ट्र शासनाच्या ‘भाषा उपसंचालक’ या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कथा, कादंबरी, ललित लेखन, नाटक या सर्व प्रकारचे लेखन करणार्‍या शंकर नवरे यांनी दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट आणि वृत्तपत्रे यांसाठी लेखन केले. जीवनातील नाट्यमय, मानवी संबंधांतील हृदयाचा ठाव घेणारे रंजनपर लेखन, ही नवर्‍यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत.

त्यांचे ‘तिळा उघड’, ‘बेला’, ‘शहाणी सकाळ’, ‘बिलोरी’, ‘मार्जिनाच्या फुल्या’, ‘कस्तुरी’, ‘पाऊस’ आदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘सर्वोत्कृष्ट शंन्ना’ हा कथासंग्रह त्यांच्या निवडक कथांचा परामर्श घेतो.

त्यांनी ‘सुरुंग’, ‘दिवसेंदिवस’, ‘आनंदाचं झाड’ आदी कादंबर्‍यांचे लेखन केले. तसेच त्यांचे वृत्तपत्रांतून ललित लेखन प्रसिद्ध झाले, ते ‘कवडसे’ (महाराष्ट्र टाइम्स), ‘ऊनसावल्या’ (सकाळ), ‘ओलीसुकी’ (लोकसत्ता) या संग्रहांतून वाचकांसमोर आले.

‘चार एकांकिका’, ‘आणखी चार एकांकिका’, ‘खेळीमेळी’ या एकांकिकांचे लेखन त्यांनी केले. आकाशवाणीसाठी ‘ययाती’, ‘उपहार’, ‘विप्रदास’, ‘महानंदा’ इत्यादी श्रुतिकांचे लेखन त्यांनी केले. तसेच ‘प्रपंच’ मालिकेतल्या सुरुवातीच्या काही भागांचे लेखनही केले. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘शहाणी सकाळ’, ‘निंबोणीचं झाड’, ‘शब्द आकाश’ या नाटिकांचे, ‘नो प्रॉब्लेम’, ‘ग्रॅन्ड रिडक्शन सेल’, ‘दोन घडीचा डाव’, ‘दिनमान’, ‘राजाराणी संसारगाणी’, ‘नूपुर’ या मालिकांचे आणि ‘उद्याची गोष्ट‘, ‘काटा रुते कुणाला’, ‘पाठलाग’, ‘संकेत’ आदी टेलिफिल्म्सचे लेखन त्यांनी केले.

त्यांचे अन्य संकीर्ण लेखन म्हणजे ‘अघळपघळ’, ‘असे विख्यात संशोधक असे त्यांचे शोध’, ‘आगबोटीची कूळकथा’ तसेच ‘निकोला टेस्लाचे चरित्र’ ही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. अनेक चित्रपटांचे कथा-पटकथा-संवाद त्यांनी लिहिले. त्यांतील काही चित्रपट म्हणजे ‘घरकुल’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘कळत-नकळत’, ‘जन्मदाता’, ‘निवडुंग’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथं मी’, ‘एक उनाड दिवस’, ‘बिरबल माय ब्रदर’ (इंग्रजी) आणि ‘असंभव’ (हिंदी) हे होत.

नवरे यांचे नाट्यलेखनही विपुल आहे. एकूण ३१ नाटके त्यांनी लिहिली. त्यांपैकी गाजलेली महत्त्वाची नाटके ‘एक असतो राजा’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘ग्रॅन्ड रिडक्शन सेल’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गुंतता हृदय हे’, ‘गहिरे रंग’, ‘देवदास’ ही होत. ‘गुंतता हृदय हे’ हे जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवर आधारित होते. त्यांच्या ‘शहाणी सकाळ’ या कथासंग्रहास आणि ‘कवडसे’ या लेखसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. अल्फा मराठी पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, नाट्यदर्पणाचा नाट्यगौरव पुरस्कार, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती समितीचा साहित्य सेवा पुरस्कार, गदिमा पुरस्कार, पुलोत्सव २००९ चा जीवन गौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. २००४ साली झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

नवरे हे कथा, कादंबरी, नाटक आणि ललित लेखन या सर्वच क्षेत्रांतील सिद्धहस्त व्यक्तिमत्त्व आहे. जीवनाकडे डोळसपणे पाहून, खेळकर शैलीत घेतलेला जीवनाचा वेध हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. दैनंदिन जीवनातले अनुभव त्यातून व्यक्त होतात. विविध नात्यांचे आणि भावभावनांचे चित्रण त्यातून घडते. निरीक्षणाला चिंतनाची जोड मिळाली असल्याने या लेखनाला परिणामकारकता प्राप्त होते. आयुष्यातल्या कितीतरी लहान-सहान प्रसंगांवर, हकिकतींवर आधारित त्यांचे लेखन वाचकांच्या पसंतीस उतरले. कथांची शैली रंजक व सर्वसामान्य वाचकांना खिळवून ठेवणारी असल्याने ते वाचकप्रिय लेखक आहेत असे म्हणता येईल. त्यांच्या नाटकांतले संवाद सुटसुटीत, प्रासादिक, प्रसन्न शैलीतले आहेत. नाटकांचे विषय प्रामुख्याने कौटुंबिक आहेत. तर काही सामाजिक विषयांना स्पर्श करणारे आहेत. हलके- फुलके विनोद त्यांच्या काही नाटकांचा स्थायीभाव आहे. नाट्यलेखनाला कथालेखन, कादंबरी-ललितलेखन, नाट्यलेखन, चित्रपट कथालेखन अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे.

- डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर

नवरे, शंकर नारायण