नारखेडे, भास्कर निवृत्ती
भास्कर निवृत्ती नारखेडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन एम.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. त्यांनी पुढे कृषी विषयामध्ये संशोधन करून पीएच.डी. ही पदवीही मिळवली. नोकरीचा संपूर्ण सेवाकाल शेतीमधील संशोधन करावयाचे या हेतूनेच कृषिअधिकारी कृषी संशोधन केंद्र मु.पो. निफाड, साहाय्यक प्राध्यापक या पदावर कापूस-पैदासकार केंद्र आणि करडई-पैदासकार केंद्र येथे काम केले. म.फु.कृ.वि.त वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख या पदावर काम करून ते निवृत्त झाले. १९९८मध्ये म.फु.कृ.वि.त ज्वारी-पैदासकार या पदावर असताना त्यांना मध्यम व भारी जमिनीसाठी एस.पी.व्ही. १३५९-फुले यशोदा हा उन्नत वाण विकसित करण्यात यश मिळाले.
हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यासाठी नारखेडे यांनी सी.एस.व्ही.२१६ आर. फुले माऊली हा वाण २००२ मध्ये निर्माण करण्यात यश मिळवले. संपूर्ण भारतामधील प्रत्येक शेतकऱ्याला भारतभरामधील ज्वारीच्या स्थानिक वाणांची एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध व्हावी यासाठी संपूर्ण भारतभर प्रवास करून ज्वारीच्या ९७० स्थानिक वाणांची तपशीलवार माहिती जमवली आणि ती माहिती नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक्स रीसर्च, नवी दिल्ली येथे उपलब्ध करून ठेवली आहे. या संशोधन कार्याची दखल घेऊन हरी ओम आश्रम ट्रस्ट आणि भा.कृ.अ..प., नवी दिल्ली यांचा पीक सुधारणांतर्गतचा १९९९-२००० चा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल मा. अलेक्झांडर यांच्या हस्ते नारखेडे यांना मिळाला. याच कार्यासाठीचा ‘बळीराजा’ मासिकातर्फे देण्यात येणारा २००२ चा कै. अण्णासाहेब शिंदे कृषी संशोधन द्वितीय पुरस्कारही त्यांना मिळाला.