Skip to main content
x

ओगले, माधवी मधुसूदन

     माधवी ओगले यांचा जन्म १३ एप्रिल १९५४ रोजी  झाला. त्यांचे वडील वसंत मनोहर हे रिझर्व्ह बँकेत अधिकारी आणि आई वसुधा शाळेत शिक्षिका होत्या. डॉ. मधुसूदन ओगले यांच्याशी २६ नोव्हेंबर १९७८ या दिवशी त्यांचा विवाह झाला. डॉ. ओगले हे स्वत: निष्णात रेडिओलॉजिस्ट होते. सौदी अरेबियाकडून त्यांना तेथे नोकरीचा प्रस्ताव आला आणि त्यांनी तो स्वीकारला. त्या निमित्ताने माधवी ओगले यांचे सौदीला वर्षातून दोन वेळा जाणेयेणे सुरू झाले.

      माधवी उच्चशिक्षित असूनही संसारिक जबाबदाऱ्या असल्याने त्यांनी विवाहानंतर नोकरी केली नाही. मुले थोडी मोठी झाल्यावर विद्याज्योती शाळेमध्ये त्या हिशेब तपासण्यासाठी जात असत. तिथेच त्यांची ओळख पद्माताईं गोडबोले यांच्याशी झाली. पद्माताईंनी अध्ययन अक्षमता या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. परदेशात त्यांनी विशेष शिक्षणाच्या शाळेत काम केले होते. त्यांना पुण्यात तशी शाळा काढायची होती. पद्माताई व माधवी या दोघींनी प्रयत्न करून ७ जणांचा ट्रस्ट करून १ जून १९९० मध्ये प्रिझम फाउण्डेशन ही संस्था स्थापन केली. प्रथम या संस्थेची गतीमंद मुलांच्या विशेष शिक्षणासाठी फिनिक्स ही शाळा सुरू केली.  पुण्यात अशा प्रकारची ही पहिलीच शाळा ठरली. शाळेची शैक्षणिक बाजू पद्माताईंनी सांभाळली व संस्थेची खजिनदार या नात्याने आर्थिक व्यवहार माधवी ओगले यांनी बघितले. पहिल्या वर्षातल्या अनुभवानंतर बहुविकलांगत्व असलेल्या मुलांकरिता म्हणून लगेचच दुसर्‍या वर्षी लार्क शाळेची स्थापना झाली. दोन्ही शाळा व्यवस्थित चालू झाल्या. शिक्षक वाढले. विद्यार्थी वाढले. १९९५ मध्ये इंडियन लॉ सोसायटीची एक मोकळी जागा ९९ वर्षाच्या भाडेकरारावर मिळाली. जागेवर तात्पुरत्या ८ खोल्या बांधून सकाळी फिनिक्स व दुपारी लार्क असा प्रवास सुरू झाला. संस्थेचा अंक निघू लागला. समाजसेवा म्हणून अनेक चांगल्या व्यक्ती संस्थेशी जोडल्या गेल्या. शाळांना मदत मिळू लागली. देणग्या जमा होऊ लागल्या. मुले वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेऊ लागली. पुढची पायरी म्हणून संस्था पालक व शिक्षकांसाठी कार्यशाळा घेऊ लागली.

     विशेष शिक्षणाविषयी कोणत्याही प्रकारचे शिक्षण माधवी यांनी घेतले नव्हते म्हणून चेन्नईला एक महिना राहून एक कोर्स पूर्ण केला. फिनिक्स आणि लार्क शाळेतील मुले शिक्षण घेऊन बाहेर पडू लागली. पण काही मुले त्यांच्या मर्यादेमुळे काही करू शकत नसत म्हणून माधवी यांना वाटले की प्रिझमच्या छत्राखाली १८ ते २५ वयोगटाच्या मुलांसाठी तिसरी शाळा काढली पाहिजे जिथे त्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. त्यांची ही कल्पना विश्‍वस्तांना मान्य झाली आणि ७ जुलै १९९८ रोजी ‘प्रिझम पूर्वव्यावसायिक शाळा’ या नावाची तिसरी शाळा स्थापन झाली. या शाळेत मुख्याध्यापक म्हणून माधवी यांनी ३ वर्षे काम पाहिले. ही व्यावसायिक शिक्षण देणारी शाळा असली तरी या मुलांसाठी शाळेत सर्व कार्यक्रम आणि स्पर्धा व्हायच्या. त्यांची सहल निघायची व स्नेहसंमेलनपण व्हायचे. पालकांसाठी कार्यशाळा व्हायच्या.

     वेळोवेळी मुलांचे व पालकांचे समुपदेशन व्हायचे. या शाळेत कॅनिंग, चक्की व बेकरी विभाग चालू केले गेले. त्यासाठी मोठमोठी यंत्रसामग्री आणली गेली. दुसर्‍या विभागात फाईल्स तयार करणे, स्क्रिनप्रिंटींग, पाकिटे बनविणे, शिवणकाम, मेणबत्या बनविणे, फिनेल-लिक्वीड सोप तयार करणे हे उद्योग सुरू झाले. कलाकुसरी वस्तूही तयार होऊ लागल्या. मुलांना त्यांच्या आवडी व कुवतीप्रमाणे शिकविले जाऊ लागले. कच्चा माल आणण्यासाठी आणि तयार मालाच्या विक्रीसाठी मुलांना बाहेर पाठविले जाऊ लागले. मालाची विक्री व्हावी म्हणून ग्राहक पेठ व इतर काही दुकानातही प्रयत्न केले गेले. प्रदर्शनातून छोटी दुकाने घेऊन शाळेचे माहिती पत्रक दिले जायचे. त्यामुळे त्यातून आर्थिक फायदा झाला नाही तरी संस्थेची आणि शाळेची माहिती लोकांना होत असे. विक्रीसाठी आवश्यक असलेले परवाने काढले गेले,स्टॉलवर मुले जावू लागली.

     संस्थेची विश्‍वस्त व खजिनदार या नात्याने त्यांनी स्वत:ची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. सुरूवातीची काही वर्षे पद्माताई त्यांच्या कामासाठी लंडन व कॅनडाला जास्त दिवस जात असत. तेव्हाही संस्थेची व तिन्ही शाळांची जबाबदारी माधवी यांच्यावरच पडत असे.

     माधवी यांनी स्वत:साठी गाडी न घेता रिक्षा घेतली होती. एक चालक नेमला होता. शाळेसाठी या रिक्षाचा खूप उपयोग व्हायचा. हा चालक शाळेच्या इतर कामातही मदत करायचा. माधवी यांनी संगणक शिकून नवीन पिढीशी बरोबरी केली. त्यांच्याच प्रोत्साहानाने शाळेतील विभाग प्रमुख व प्राचार्यांना शाळेतर्फे संगणकाचे शिक्षण घेण्यासाठी पाठविले गेले. त्याचा सर्वांनाच खूप उपयोग झाला.

     नंतर माधवी यांनी अध्यात्मिक उपचार करण्याचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी निसर्गोपचारमध्ये पदवी मिळवली. होमिओपॅथी व आयुर्वेदावर त्यांचा विश्‍वास होता, परंतु त्यांनी जास्त अभ्यास केला तो निसर्गोपचाराचा. या संदर्भातील अ‍ॅक्युप्रेशर, मॅग्नेट, वॉटर थेरपी, मसाज वगैरेंचा अभ्यास करून घरात उपचार केंद्रही चालू केले. त्यांनी सुरू केलेल्या प्रिझम पूर्वव्यावसायिक शाळेला १० वर्षे पूर्ण झाली आणि त्यांचे ६ ऑक्टोबर २००७ रोजी हृदयरोगाने निधन झाले. पूर्वीची प्रिझम पूर्वव्यावसायिक शाळा आता माधवी ओगले व्यावसायिक शाळा म्हणजेच ‘एम.ओ.व्ही.एस.’ नावाने आज ओळखली जाते.

     - मंजिरी ओगले - मुळे

ओगले, माधवी मधुसूदन