Skip to main content
x

ओक, माधव काशिनाथ

            माधव काशिनाथ ओक हे कोकणातील पालशेत येथील एक प्रथितयश बागायतदार आहेत. काशिनाथ गणेश ओक व सुमती काशिनाथ ओक यांचे ते चिरंजीव. पालशेत हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आहे. गाव डोंगरांनी वेढलेले आहे. माती कमी, खडकाळ भाग जास्त अशी गावाची परिस्थिती आहे. शेतीयोग्य सपाट जमीन फारच कमी आहे. त्यामुळे फळबाग हे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. आंबा, सुपारी, काजू व नारळ ही कोकणातील महत्त्वाची फळपिके.

            ओक यांच्याकडे आंबा आणि सुपारीची बाग आहे. त्यांच्याकडे आंबा व सुपारीची रोपवाटिकाही आहे. पालशेत गावाभोवती डोंगर आहे. लॅटराइट तथा जांभा जातीचा खडक आहे. त्यांनी आंब्याची लागवड ही डोंगरात केलेली आहे. हापूस आंबा हे या भागाचे खास वैशिष्ट्य आहे. जांभा जातीच्या खडकातच ही लागवड केली जाते.

            ओक यांच्या बागेत पाच हजार झाडे आहेत. आंबा बाग ही मुख्यत्वेकरून हापूस आंब्याची; पायरी, निलम, तोतापुरी, रत्ना या जातींचीही काही तुरळक झाडे आहेत, परंतु त्यास फारशी मागणी नसल्याने हापूस आंब्यावर अधिक भर आहे. हापूस आंब्याच्या झाडाला एक वर्षाआड फळे येतात. साधारणपणे एकूण झाडांपैकी तीस ते चाळीस टक्के झाडांना फळे लागतात. आंबा हे बहुवर्षीय झाड आहे. काही काही झाडे शंभर वर्षेही फळे देत आहेत. फळाच्या कोयीपासून वृक्ष लागवड न करता त्याचे कलम तयार केले जाते व ते जमिनीत लावले जाते. तयार आंब्याच्या व्यापाराबरोबर आंबा रोपांची विक्रीही ओक करतात. आंबा कलम करण्याच्या; भेट कलम, गुटी कलम, कोय कलम या पद्धतींपैकी कोय कलम ते तयार करतात. कलम पद्धतीचा फायदा असा की, ही कलमे घराशेजारी आणून त्यांना पाणी देणे, त्यांची देखभाल करणे, संरक्षण करणे अधिक सोयीचे होते. या पद्धतीत कलमांच्या मृत्यूचे प्रमाण थोडे जास्त असते. वीस ते तीस टक्के हा मृत्युदर अनुभवाला येतो, पण व्यवस्थापन अधिक सोयीचे असते व मोठ्या प्रमाणावर कलमे विकसित करता येतात. अन्य प्रकारात झाडावर कलम केले जाते, पण झाडांची संख्या मर्यादित असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कलमे तयार करता येत नाहीत. फलधारणेच्या दृष्टीने आंबा हे मंद गतीने वाढणारे झाड आहे. सुरुवातीला उत्पादन फारच अल्प असते. विक्रीयोग्य प्रमाणात उत्पादन मिळण्यास पंधरा वर्षे लागतात.

            ओक यांच्याकडील ५००० झाडांपैकी साधारणपणे १/३ झाडांना फळ लागते. झाडांना वेळोवेळी शेणखतासारखी जैविक व युरिया, फॉस्फेट, पोटॅश यासारखी रासायनिक खते द्यावी लागतात. मोहोर लागल्यावर योग्य वेळी औषधांची फवारणीही करावी लागते. फळ धरल्यावर संरक्षणाचीही व्यवस्था करावी लागते. एका झाडाला तीन-चार पेट्या म्हणजे पंधरा ते वीस डझन फळ मिळते. फळांना पुणे, ठाणे, मुंबई येथील बाजारपेठा मिळतात. आंब्याचा रस काढून तो हवाबंद डब्यात साठवणे (कॅनिंग) हाही उद्योग ओक करतात.

            ओक यांची थोडी भातशेतीही आहे. कुटुंबाला पुरेल एवढा तांदूळ ते पिकवतात. दरवर्षी वीस-तीस गुंठ्यात भातशेती केली जाते. जुने देशी वाण (कळपा, राजभोग) ते वापरत नाहीत. सुवास व गोडी या दृष्टीने देशी वाण सरस असले, तरी त्यांची उत्पादकता फार कमी असल्याने त्यांचे उत्पादन होत नाही. शासनामार्फत पुरवल्या जाणार्‍या अधिक उत्पादन देणार्‍या वाणांना पसंती दिली जाते.

            ओक यांची दीड ते पावणेदोन एकर सुपारी बागही आहे. त्यांनी एकूण एक हजार सुपारीची झाडे लावली आहेत. सुपारी बागेला पावसाळा संपल्यावर पाणी द्यावे लागते. सुपारी झाडे सरळ व उंच वाढतात. त्यामुळे वादळवार्‍यांनी ती उन्मळून पडतात. वरचेवर नवी झाडे लावावी लागतात. एका झाडापासून एक किलो वाळलेली सुपारी मिळते. कच्ची वा वाळलेली सुपारी विकली जाते. ओक सुपारीची रोपेही विकतात. ओली सुपारी लावून रोप तयार करतात. रोपे दोन वर्षे सांभाळावी लागतात. श्रीवर्धनची सुपारी ख्यातनाम आहे. तोच नमुना येथे आहे. सुपारीबागेत मसाला पिके घेतली जातात. मिरी, जायफळ, लवंग, दालचिनी इत्यादी मसाला पिके, ओक आपल्या बागेत घेतात. मसाला झाडांना सावली लागते. काही झाडे वेली रूपात आहेत. मसाला पिकांपासूनही चांगले उत्पन्न मिळते.

- डॉ. नीळकंठ गंगाधर बापट

ओक, माधव काशिनाथ