Skip to main content
x

ओतुरकर, राजाराम विनायक

       राजाराम विनायक ओतुरकर यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथे झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची होती, तरी त्यांच्या वडिलांनी मोठ्या प्रयासाने त्यांना शिक्षण दिले. १९०६ साली ते पुण्यात स्थायिक झाले. १९१५ साली ओतुरकर मॅट्रिक झाले. त्यानंतर १९१७ साली पुढील शिक्षणासाठी न्यू पूना कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथे त्यांना अण्णा खैर, ना.भि.परुळेकर, मामा दाते, शि.ल.करंदीकर असे स्नेही भेटले. पुढे १९१८ साली त्यांचे वडील निवर्तल्यामुळे ते निराधार झाले. तेव्हा त्यांच्या वडिलांच्या पितृतुल्य मित्रांनी धीर देऊन त्यांचे शिक्षण केले. ज्ञातिसंस्थेनेही त्यांना मदत केली. १९२० साली ओतुरकर बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी नोकरी करून दोन बहिणी व आई यांचा व्यवस्थित सांभाळ केला.

     सन १९२४मध्ये अर्थशास्त्र या विषयात दुसरा वर्ग मिळवून ओतुरकर एम.ए. झाले. या आवडीच्या विषयात त्यांनी अध्यापन करून व बहुमोल लिखाण करून पुढील पिढीकरिता ज्ञानाचे दार खुले केले. १९२६ मध्ये नाशिकच्या एच.पी.टी. कॉलेजमध्ये शिकवत असताना त्यांनी आंबेडकरांच्या व गांधीजींच्या चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांची नोकरी गेली. नाशिकमध्ये असताना त्यांनी मुलाच्या मुंजीत अस्पृश्यांना आमंत्रण दिले, म्हणून त्यांच्यावर समाजाचा रोष ओढवला.

     ओतुरकर यांनी नाशिक सोडल्यानंतर पुण्यातील स.प. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून १४-१५ वर्षे काम केले. बडोेदे संस्थानातून महाविद्यालयाला देणगी मिळवून दिली. ओतुरकर यांचे गुणग्रही विद्यार्थी उच्चपदी पोहोचले, याचा त्यांना अभिमान होता. आचार्य प्र.के.अत्रे त्यांचे वर्गमित्र होते.

     स.प. महाविद्यालयामधून निवृत्त झाल्यावर ओतुरकर ; कायदा महाविद्यालयाच्या प्राध्यापकपदी रुजू झाले; परंतु ते महाविद्यालय दोन वर्षे बंद पडले. त्या वेळी मुंबईतील चर्चगेटच्या के.सी. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांना आमंत्रण आले. नंतर पुण्यातच राजाराम ओतुरकर ‘कॉलेज ऑफ जर्नालिझम’ व ‘कॉलेज ऑफ मार्केटिंग’ या दोन्ही महाविद्यालयांचे संस्थापक व प्राचार्य झाले.

     ओतुरकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली. या पुस्तकांमुळेच ते प्रसिद्धीच्या झोतात आले. ती पुस्तके अशी -‘हिंदुस्थानचा सोपपत्तिक इतिहास’, ‘भारताचा सांस्कृतिक इतिहास’, ‘भारताची राज्यघटना’, ‘जग आणि भारत’ (अनेक खंड), ‘जगाचा संक्षिप्त इतिहास’ इ. याशिवाय स्वतंत्र अभ्यासपूर्ण लेखही त्यांनी लिहिले. विजयनगरचे साम्राज्य, अंमळनेर व येवले येथील विणकरी कामगारांचे जीवनमान यांसारखे अनेक लेख इंग्रजी-मराठी भाषांमध्ये त्यांनी लिहिले. अनेक ग्रंथांना प्रस्तावना व परिशिष्टे लिहिली. ओतुरकरांनी आपली सर्व पुस्तके अनाथ विद्यार्थी गृहास प्रकाशनास दिली. याद्वारे संस्थेस दोन लाखांपेक्षा जास्त अर्थप्राप्ती झाली. अ.वि. गृहाने छापखाना काढला. ओतुरकर यांचे ‘हिंदुस्थानचा सोपपत्तिक इतिहास’ हे त्याचे पहिले प्रकाशन होते. त्यानंतर या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. मुंबई राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने ओतुरकरांच्या पुस्तकातील एका लेखाबद्दल आक्षेप घेऊन प्रकाशनावर बंदी आणली. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. अखेर ते खटला जिंकले व प्रकाशनावरील बंदी उठली.

     १९५५-५६ या काळात कलकत्त्यास भरलेल्या ‘ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेस’च्या एका विभागाचे ओतुरकर प्रमुख होते. १९५७-५८ या काळात त्यांनी रशिया, इजिप्त, चीन या देशांचा प्रवास केला. जागतिक इतिहासासंबंधीचा पूर्वेकडील विद्वानांचा दृष्टीकोन समजावा, हा त्यामागील उद्देश होता.

     प्रा. रा.वि. ओतुरकर यांनी इतिहास संशोधक मंडळात ४० वर्षे सातत्याने काम केले. तसेच वडिलांच्या नावे २५,००० रु. देणगी दिली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे ते मानद सल्लागार होते.

संपादित

ओतुरकर, राजाराम विनायक