Skip to main content
x

पाध्ये, कमल प्रभाकर

   मल प्रभाकर पाध्ये या मुंबईतल्या विनायक भटजी गोठोस्करांच्या कन्या. ब्रीच कँडीच्या फणसवाडी शाळेतून त्या व्हर्न्याक्यूलर फायनल उत्तीर्ण पास झाल्या. १९४० साली कमलाताईंचा विवाह प्रभाकर पाध्ये यांच्याशी झाला. १९४३ साली त्या बी.ए. झाल्या.

हरिभाऊ मोटे यांनी तसेच इंदिराबाई संत यांनी कमलताईंना ‘तुम्ही लिहा’ असा खास आग्रह केला. शिवाय समाज कार्यकर्त्यांच्या प्रकल्पात कमलताई शिबिरांचे आयोजन करीत. अशा शिबिरांत महाराष्ट्रातील सर्व थरांतल्या हजार-दीड हजार स्त्रियांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. ‘माणूस म्हणून न वागल्यान होणारा तुमचा मनोभंग चव्हाट्यावरून मांडा’ असा सल्ला कमलताई त्या स्त्रियांना देत. लग्नापूर्वी कमलताईंनी विभावरी शिरूरकरांचे ‘कळ्यांचे निःश्‍वास’ हे पुस्तक वाचले होते. ‘स्त्री-मनाच्या व्यथा अतिशय संवेदनशील मनाने टिपणारे ते पुस्तक मला फार भावून गेलं होतं’ असे त्या म्हणतात. १९७६मध्ये कृष्णाबाई मोटे यांच ‘काळाची पाउले’ प्रसिद्ध झाले. ह्या पुस्तकाविषयी कमलताईंनी अभिप्रायवजा लेख जानेवारी १९७७ च्या ‘माणूस’ साप्ताहिकात लिहिला होता.

स्वतःच्या ‘बंध-अनुबंध’ आत्मकथनाविषयी त्या लिहितात, हे पुस्तक केवळ स्त्री-प्रश्नांपुरते मर्यादित नाही. माणसांच्या प्राथमिक गरजांप्रमाणे वात्सल्य, प्रेम आणि स्नेह ह्याही त्यांच्या महत्त्वाच्या भावनिक गरजा आहेत. त्यातून निर्माण होणारे भाव-भावनांचे आणि नात्यागोत्यांचे गुंतागुंतीचे बंध-अनुबंध आणि त्यांतून उद्भवणार्‍या समस्या तितक्याच उत्कटतेनं मला भावलेल्या आहेत. या सर्वांबद्दलचे माझे विचार मी या पुस्तकात व्यक्त केले आहेत. शेवटी माझ्या बुद्धीच्या कुवतीनं केलेलं माझं हे चिंतन आहे. त्याच्या शास्त्रशुद्धतेची जाण मला नाही. पण अनुभव मात्र सत्य आहेत आणि ते मी अत्यंत प्रामाणिकपणे मांडले आहेत.

कमलताईंचे आदिवासी प्रकल्पाचे काम पालघर-मनोर रस्त्यावरच्या मासवण आणि आजूबाजूच्या परिसरात होते. जातिभेद, अंधश्रद्धा, स्त्रीमुक्ती, समानता हे कमलताईंच्या व्याख्यानांचे विषय असत.

‘मैत्रीच्या पलीकडे’ या नियतकालिकाच्या संपादक म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले. समाजवादी महिला सभेचे काम करताना महिलांचे प्रशिक्षण करणार्‍या अनेक पुस्तिका त्यांनी लिहिल्या. स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी अनेक स्फुट लेखही प्रसिद्ध केले. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या ‘वुमनहुड ऑफ इंडिया’ या पुस्तकाचा कमलाताईंनी अनुवाद केला.

‘पाध्यांची ३, कमलबाग’चे लेखक विक्रम भागवत लिहितात, ‘३ कमलबागेत तुम्ही कधीही जा. तुम्हांला ती नेहमीच व्यवस्थित, टापटीप आणि कलात्मक सौंदर्याला जपताना दिसेल. याला पाध्यांची आणि कमलताईंची सौंदर्यदृष्टी आणि श्रम कारणीभूत आहेत..... या घराला पाध्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जसे एक परिमाण लाभले आहे, तितकेच कमलताईंच्या व्यक्तिमत्त्वाचेही ठसठशीत परिमाण लाभले आहे. एकीकडे पाध्यांची उत्कटता, वैचारिकता, आणि दुसरीकडे कमलताईंची सदैव जागृत असलेली सामाजिक जाणीव, स्त्रीमुक्तीचा त्यांनी जितका व्यावहारिक विचार केला, तितकाच तात्त्विक अभ्यासही केला. त्यांचे व्यक्तिमत्त्वही पाध्यांच्या इतकेच प्रखर. या दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांचा कमलबागेत सुरेख संगम झालेला आढळतो.’ 

- वि. ग. जोशी

पाध्ये, कमल प्रभाकर