Skip to main content
x

पाटील-बेनाडीकर,सदाशिव लक्ष्मण

द्य शंकराचार्यांनी भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागांत अनुक्रमे जगन्नाथपुरी व द्वारका, तर दक्षिण आणि उत्तर भागांत शृंगेरी व बद्रीनारायण अशा चार मठांची स्थापना केली होती. महाराष्ट्राचा प्रदेश द्वारकेच्या शारदा मठाच्या कक्षेत येतो. शृंगेरी मठाचे पदच्युत स्वामी शंकरानंद यांनी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील संकेश्वर मठाची स्थापना केली होती. करवीर पीठाची स्थापना प्राचीन काळात कोल्हापूरच्या राजाने केली होती. शंकराचार्यांचे करवीर पीठात संकेश्वर व करवीर असे दोन मठ अस्तित्वात असल्याचे मानले जाते. करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी आपला वारसा निवडताना कोल्हापूरच्या छत्रपतींशी विचार-विनिमय करून तो वारसा निवडायचा होता. इतकेच नव्हे, तर त्याची निवड झाल्यावर कोल्हापूरच्या छत्रपतींनी त्याला मान्यता देणे आवश्यक होते. कोल्हापुरात जेव्हा वेदोक्त प्रकरण घडले, त्या वेळी विद्याशंकरभारती ऊर्फ गुरुस्वामी करवीर पीठाचे शंकराचार्य होते. त्यांनी आपला वारस म्हणून काशीनाथ गोविंद ब्रह्मनाळकर यांची निवड केली होती. तेच पुढे विद्यानृसिंहभारती ऊर्फ शिष्यस्वामी म्हणून ओळखले जात होते. हा वारस निवडताना विद्याशंकरभारती यांनी शाहू छत्रपतींशी सल्लामसलत न करता सांगलीकर पटवर्धन यांच्याशी विचारविनिमय केला. त्यामुळे शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानच्या हद्दीतील मठाची मालमत्ता जप्त केली होती.

शाहू छत्रपतींनी दि. १० जून १९१७ रोजी डॉ.कुर्तकोटी यांची करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून नेमणूक केली. डॉ.कुर्तकोटी हे संस्कृतचे गाढे पंडित होते. पीठासनावर आरूढ होताच या नव्या स्वामींनी आपल्या भाषणांतून अनेक सुधारणांचा जोरदार पुरस्कार केला. अस्पृश्यतेचा जाहीर निषेध केला. पण, वर्षभराच्या आतच त्यांनी आपले प्रतिगामी स्वरूप प्रकट केले. शाहू महाराजांनी कुलकर्ण्यांचे वतन बंद केले. त्या प्रकरणात कूर्तकोटी यांनी कुलकर्ण्यांची बाजू घेऊन छत्रपतींना विरोध केला. त्यांच्यावर टीका सुरू केली. त्यामुळे छत्रपतींनी एक ठराव करून डॉ.कुर्तकोटी यांची करवीर पीठाच्या शंकराचार्य पदावरून हकालपट्टी केली.

वेदोक्त प्रकरण संपले तरी ब्राह्मणशाहीचे चटके येथून पुढेही महाराजांना बसतच राहिले. त्यामुळे अहंकारी आणि ऐषोरामी ब्राह्मण पुरोहितांच्या विळख्यातून आपल्या जातीस सोडविण्याचे विचार त्यांच्या मनात उत्पन्न झाले. दैवज्ञ सोनार,शेणवी, लिंगायत जैन या जातींच्या लोकांनी ज्याप्रमाणे ब्राह्मणी पुरोहितशाहीचे जोखड फेकून देऊन स्वत:चे धर्मगुरू निर्माण केले, तसे मराठ्यांनी का करू नये,असा एक विचार त्यांनी १९०४ सालीच एका पत्रात व्यक्त केला होता.

महाराजांनी कोल्हापुरात जुलै १९२० मध्ये मराठा पुरोहित तयार करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक विद्यालय’ स्थापन केले. शाहू छत्रपतींनी सुरू केलेले हे ‘शिवाजी वैदिक स्कूल’ही क्षात्रजगद्गुरुपीठाच्या निर्मितीची पार्श्वभूमी होती. क्षात्रजगद्गुरूंच्या नेमणुकीचे उचललेले ते पहिले दमदार पाऊल होते.

देव आणि मानव यांच्यामध्ये दलाली करणारा पुरोहितवर्ग एकदम नष्ट करणे शक्य नाही, याची पूर्ण जाणीव महात्मा फुले यांना होती. म्हणूनच ते आपल्या व्याख्यानातून शूद्र लोकांनी आपल्या जातीचे उपाध्ये निर्माण करावेत, असा स्पष्ट उपदेश करीत. महात्मा फुले यांचा पुरोहितवर्गाच्या वर्चस्वाविरुद्धचा लढा शाहू छत्रपती निश्चितच पुढे चालवीत होते.

शाहू महाराजांनी १२ ऑक्टोबर १९२० रोजी क्षात्रजगद्गुरू पदासंबंधीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी आपल्या निर्णयामागची तात्त्विक भूमिका स्पष्ट केली, ती अशी : ‘हिंदू समाजात ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन पक्ष निर्माण होऊन, त्या दोहोंमधील वाद विकोपास गेला आहे. ही स्थिती देशहितास योग्य नाही. मूळच्या वैदिक धर्माचा लोप ब्राह्मणांनी केला असून ब्राह्मणवर्गाकडून ब्राह्मणेतरांना खऱ्या धर्माचा लाभ होणार नाही. यासाठी क्षत्रिय मराठ्यांनी आपला स्वतंत्र मार्ग अनुसरण्याचे ठरविले आहे.

‘करवीर राज्यात क्षत्रिय मराठ्यांचे खरे जगद्गुरुस्थान फार प्राचीन आहे. पण आम्हां क्षत्रिय मराठ्यांत आजवर त्याची विस्मृती पडली होती. ते गुरुस्थान पाटगाव मौनी महाराजांचे होय. याच मौनी महाराजांनी क्षत्रियांतील देव अवतार, जे श्री शिवछत्रपती यांना उपदेश केला होता, हे इतिहास प्रसिद्ध आहे.

श्री शिवछत्रपती हे कोणत्याही संकटकाळी मौनी महाराजांकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत असत. श्री शिवाजी महाराजांनंतर कोल्हापूरची गादी स्वतंत्र स्थापन झाल्याने नंतर कोल्हापूरचे महाराजही त्यांना जगद्गुरू मानत असत. त्या संस्थानाचा परामर्श व उत्कर्ष व्हावा या हेतूने त्यांनी इनाम गावेही पाटगाव संस्थानास दिली आहेत. यावरून कोल्हापूरच्या महाराजांना हे संस्थान अत्यंत पूज्य होते, हेही निर्विवाद शाबीत होते. ही गादी निव्वळ क्षत्रिय मराठ्यांची असून शिष्यपरंपरेने आजवर चालत आलेली आहे. म्हणून मी या पाटगावच्या क्षात्रजगद्गुरुपीठाची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित केले आहे.’

शाहू महाराजांनी क्षात्रजगद्गुरूंची नियुक्ती करण्याचे निश्चित केल्यानंतर योग्य व्यक्तीचा शोध सुरू झाला. बहुजन समाजातील कर्तबगार व गुणवान, सुशिक्षित तरुणांवर शाहू महाराजांची बारीक नजर असे. कोल्हापूरनजीक असणाऱ्या बेनाडी गावातील एक तरुण टोपणनावाने वृत्तपत्रांत वैचारिक लेख लिहीत असे. शाहू महाराजांनी त्याचे समाजसुधारणेसंबंधी पुरोगामी विचारांचे लेख वाचले. हा तरुण म्हणजेच सदाशिवराव बेनाडीकर यांचा जन्म बेनाडी गावच्या वतनदार पाटील घराण्यात झाला. बेनाडीकर यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. ते व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगचे विद्यार्थी होते. नंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. संस्कृत व तत्त्वज्ञान या विषयांत ते पारंगत होते. शाहू महाराजांनी त्यांचे लेख वाचले, ते प्रभावित झाले. त्यांनी हेतुपूर्वक सदाशिवरावांना काही दिवस आपल्या सान्निध्यात ठेवून घेतले. त्या वेळी शाहू महाराजांनी सदाशिवरावांचे धर्मसुधारणेविषयीचे विचार मन:पूर्वक ऐकले. त्यांचे वर्तन लक्षात घेऊन त्यांची नेमणूक पाटगावच्या क्षात्रजगद्गुरुपीठावर करण्याचा शाहू छत्रपतींनी निश्चय केला. पाटगावच्या धर्मपीठावर कार्यरत असलेले जगद्गुरु रामगिरी यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांना शिष्य नसल्याने ते धर्मपीठ रिक्तच होते. म्हणून त्या क्षात्रजगद्गुरुपीठावर शाहू महाराज यांनी सदाशिवराव लक्ष्मणराव पाटील-बेनाडीकर यांची नेमणूक केली. १५ नोव्हेंबर १९२० रोजी क्षात्रजगद्गुरू नेमणुकीचा हुकूम जारी करण्यात आला.

या क्षात्रजगद्गुरूंसाठी शाहू छत्रपतींनी अत्यंत विचारपूर्वक पुढील काही नियम घालून दिले :

१) धार्मिक बाबींच्या विचारांकरिता एक धर्माधिकारी असावा आणि धर्म-निर्णयासाठी एक पंचायत कोर्ट असावे. २) वैदिक धर्मशिक्षण देण्याचे एक विद्यालय असावे. ३) पाटगाव संस्थानात आजपर्यंत अविवाहित शिष्यपरंपरा घेण्याची वहिवाट चालू आहे; परंतु त्यापासून मठाची पवित्रता मुळीच सांभाळली जात नाही, असे अनुभवांती लक्षात आले आहे. म्हणून धर्मपीठावर रूढ-आरूढ झालेल्या गुरूंना विवाह करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी तो खुशाल करावा. ४) गादीवरील पुरुष गृहस्थाश्रमी अगर ब्रह्मचारी असला तरी चालेल; परंतु यांपैकी कोणाच्याही पूर्व घराण्यातील इसमाचा या संस्थानावर वारसा सांगण्याचा हक्क नाही. गादी शिष्य- परंपरेतच चालली पाहिजेे. ५) गादीवर स्थापन झालेल्या जगद्गुरूंच्या सान्निध्यात दोन होतकरू, बुद्धिमान व सत्त्वशील असे शिष्य ठेवावेत. यांपैकी, अगर गादीवर स्थापन झालेल्या जगद्गुरूंच्या औरस मुलांपैकी कोणीही योग्य असेल, तर त्यासही शिष्य करण्यास अगर वरील दोघांपैकी कोणीही योग्य असेल, तर हुजूर मंजुरीने शिष्य करून घेण्यास हरकत नाही. ६) या गादीस दोन मोर्चेलांचा व सूर्यपानाचा अधिकार हुजुरून देण्यात येत आहे. ७) जगद्गुरूंनी मानवी प्राण्यास पशूप्रमाणे वागवून त्याच्या खांद्यावर पालखी वगैरे वाहन देऊन, त्यात बसून जाण्याचे वर्ज्य करण्याचे आहे. त्यांच्या प्रवासाकरिता त्यांना चार घोडी व मठाच्या शोभेकरिता असलेल्या जनावरांचा उपयोग त्यांनी करावा. ८) क्षात्रजगद्गुरूंनी भिक्षा मागायची नाही. त्याचप्रमाणे, त्यांनी पाद्यपूजाही करून घ्यावयाची नाही. क्षात्रजगद्गुरूंना दुसऱ्यापुढे मदतीसाठी हात पसरावेे लागू नयेत व त्या पदाची प्रतिष्ठा राहावी म्हणून शाहू महाराजांनी क्षात्रजगद्गुरूंना राहण्यासाठी एक एकर जागा अवतीभोवती असणारा बंगला बहाल केला. मठाला खास जमिनी नेमून दिल्या. तसेच, मंगळवार पेठेतील आनंदीबाई राणीसाहेब यांचा वाडा आणि पद्माळे तलावाच्या पश्चिम बाजूचा बंगला व सभोवतालची बाग मठाच्या देणगीस जोडून दिली. क्षात्रजगद्गुरू हा शंकराचार्यांसारखा असता कामा नये, अशी महाराजांची अपेक्षा होती. ब्राह्मण जगद्गुरूंप्रमाणे म्हणजे शंकराचार्यांप्रमाणे भक्तांकडून भिक्षा म्हणून द्रव्य संपादन करणे, पाद्यपूजा करवून घेणे, भक्तांनी खांद्यावर घेतलेल्या पालखीतून मिरवणे या अनिष्ट प्रथांपासून महाराजांचे जगद्गुरू दूर राहणार होते. १९२१च्या सुरुवातीस त्यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे, त्यात ते लिहितात : ‘स्वामींनी आपल्या कार्यास लवकर आरंभ करावा. फिलॉसॉफीचा अभ्यास सुरू करावा. आपण आपले ध्येय देवासंबंधी दलाल असू नये, असे ठेवावे. तसेच, इतर स्वामींप्रमाणे आपले ध्येय असू नये. देशसेवा, लोकसेवा असेच ध्येय ठेवावे.’

११ नोव्हेंबर १९२१ रोजी पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठात सदाशिवरावांना सशास्त्र पट्टाभिषेक होऊन वैदिक मंत्रांच्या घोषात क्षात्रजगद्गुरुपदी स्थापन करण्यात आले. या निमित्ताने भरवलेल्या खास दरबारात खुद्द शाहू महाराजांनी नूतन क्षात्रजगद्गुरूंना वाकून मुजरा केला. त्यांचे अनुकरण दरबारातील सर्व सरदार, मानकऱ्यांनी  आणि अधिकाऱ्यांनी केले.

प्रा. नीलकंठ पालेकर

पाटील-बेनाडीकर,सदाशिव लक्ष्मण