Skip to main content
x

पाटील, गंगाधर गणेश

     गंगाधर गणेश पाटील यांचा जन्म खिडकी, तालुका अलिबाग येथे झाला. प्राथमिक शिक्षण लोकल स्कूल बोर्ड, चरी-अलिबाग येथील मराठी शाळेतून झाले. माध्यमिक शिक्षण अलिबागच्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंडस्ट्रिअल हायस्कूलमध्ये झाले. १९४९मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईतील रुईया महाविद्यालयात दाखल झाले. १९५९ मध्ये मुंबई विद्यापीठातून ते एम.ए. झाले.

१९६० ते १९८२  या काळात मुंबईच्या के.सी.महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख; १९८२मध्ये मुंबई विद्यापीठात प्रपाठक; १९८९मध्ये निवृत्त झाले.

पाटील यांचे सर्व लेखन समीक्षात्मक आहे. १९६६ मध्ये त्यांनी ‘आलोचना’ मासिकातून लेखनाला सुरुवात केली. १९७८पासून ‘अनुष्टुभ’मधून ‘रेखेची वाहाणी’ हे साहित्यशास्त्र समीक्षाविषयक सदर नियमितपणे लिहीत होते. हे सदर प्रथम ते ‘सुहृद’ या नावाने लिहीत. पण १९८०नंतर मात्र स्वतःच्याच नावाने लिहू लागले. तत्पूर्वी आदिबंधात्मक समीक्षापद्धतीचा अवलंब करून, त्यांनी पु.शि.रेगे यांच्या काव्यविश्वाचा शोध घेणारा प्रदीर्घ निबंध लिहिला.

‘अनुष्टुभ’, ‘चिन्हमीमांसा’, ‘कथनमीमांसा’, ‘वि- रचना’, ‘वाचक प्रतिसादमुखी समीक्षा सिद्धान्त’, ‘रशियन रूपवाद’ इत्यादी साहित्य समीक्षेच्या सिद्धान्तांचा आमूलाग्र परिचय घडवून देणारे लेखही त्यांनी लिहिले. ‘अनुष्टुभ’ मासिकाला विशिष्ट अशा वाङ्मय-समीक्षात्मक नियतकालिकाचा दर्जा आणून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ‘अनुष्टुभ’ प्रतिष्ठानचे ते सभासद, विश्वस्त व अध्यक्ष होते. तसेच १९९८ ते २००१ या काळात संपादकही होते.

समीक्षा-व्यापार हा एक ज्ञानगर्भ व मूल्यगर्भ व्यवहार असून तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे निकष, संकल्पना, नियम, संकेत व नमुनादर्श ह्यांची आवश्यकता असते, त्या सर्वांची गांभीर्याने चर्चा करून, भरीव अशी सामग्री त्यांनी मराठी वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहे.

पु.शि.रेगे यांच्या निवडक कवितांचे त्यांनी केलेले संपादन विस्तृत प्रस्तावनेसह ‘सुहृदगाथा’ हे १९७५मध्ये प्रसिद्ध झाले. १९८१मध्ये त्यांच्या निवडक समीक्षालेखांचा संग्रह ‘समीक्षेची नवी रूपे’ प्रकाशित झाला. या पुस्तकात कविता, कादंबरी व नाटक असे तीन विभाग आहेत. या तीन विभागांत साहित्य- विचारात्मक आणि समीक्षात्मक असे एकूण बारा लेख समाविष्ट केले आहेत.  या पुस्तकातील सर्व लेख आलोचना, मौज, अनुष्टुभ, उत्तम, पाऊलवाट इत्यादी नियतकालिकांतून पूर्वप्रकाशित झाले आहेत.

दुसर्‍या महायुद्धानंतर पाश्‍चात्त्य सौंदर्यमीमांसेच्या विश्वात घटितार्थ शास्त्रीय, अस्तित्ववादी, संरचनावादी, नवमार्क्सवादी, आदिबंधात्मक इत्यादी सौंदर्यविचारांचे व समीक्षेचे नवे प्रवाह प्रवर्तित झाले. त्या-त्या साहित्यकृतीच्या व साहित्याच्या प्रकृतीप्रमाणे व गरजेप्रमाणे त्या-त्या समीक्षापद्धतीचा व वाङ्मयीन दृष्टीचा अवलंब करणे गरजेचे असते. या नवीन सौंदर्यविचारांच्या व समीक्षेच्या दृष्टीतून साहित्यविषयक प्रश्नांचा विचार या पुस्तकात पाटील यांनी केला आहे. त्यामुळेच मराठी समीक्षेला आकृतीवादाच्या व सौंदर्यवादाच्या चर्चेच्या आवर्तातून बाहेर काढण्याचे श्रेय पाटील यांना दिले जाते.

- प्रा. मंगला गोखले

पाटील, गंगाधर गणेश