Skip to main content
x

पाटील, जालंधर धोंडी

     जालंधर धोंडी पाटील तथा जे.डी. पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे झाला. त्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीयच होती. त्यात तासगावसारखे दुष्काळग्रस्त गाव, वडील शेतकरी असले तरी मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे या ध्यासाने त्यांनी शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दिले. पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगावीच झाले. ते मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीतीने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात घेऊन १९६८मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यांची प्रथम नेमणूक १९७०मध्ये दापोली (जि.  रत्नागिरी) येथील कृषी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक पदावर झाली. त्यानंतर दिग्रज (जि. सांगली) येथे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात क्षारपड जमिनी सुधारण्याचे तंत्र निर्माण करण्यात त्यांचा सहभाग होता. पीएच.डी. पदवी प्राप्त करण्यासाठी केलेल्या संशोधनावर आधारित भूईमूग पिकास बोरॉन या सूक्ष्मद्रव्याची शिफारस होण्यात त्यांच्या संशोधनाचा वाटा होता.

     ऑक्टोबर १९९१मध्ये त्यांची नेमणूक सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रावर प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून झाली. या ठिकाणी काम करताना त्यांच्यातील शास्त्रज्ञ व व्यवस्थापकीय गुणांचा लाभ कोरडवाहू शेतीसाठी झाला. १९८५मध्ये कोरडवाहू शेतीत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनास शेतकऱ्यांच्या शेतावर सुरुवात झाली. त्या काळात डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग झाला. केलेल्या कामाची त्यांनी उत्तम नोंद व निष्कर्ष काढून नियोजन, रचना अणि पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर केल्याने कोरडवाहू क्षेत्रात वाढीव व शाश्‍वत पीक येऊ शकते, हे दाखवून दिले. त्या कामाचे महत्त्व दिल्लीतील भा.कृ.अ.प.ने मान्य करून१९९७मध्ये त्यांना वसंतराव नाईक यांच्या नावे असलेला एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला.

     डॉ.जे.डी. पाटील यांना कॅनडाला भेट देण्याची संधी मिळाली. तसेच सोलापूर येथे कार्य करताना इक्रिसॅट संस्थेशी संपर्क येऊन ही संस्था तसेच भा.कृ.अ.प., नवी दिल्ली यांच्या संयुक्त प्रकल्पामध्ये कोरडवाहू शेतीत शाश्‍वत उत्पादन कसे येईल हा व्यापक अभ्यास करण्याची संधी मिळाली. १९९९ ते २००३पर्यंतच्या काळात डॉ. पाटील यांनी विभाग प्रमुख, मृदा-रसायनशास्त्र म्हणून कार्य केले. तसेच या कालावधीत त्यांनी काही काळ राहुरी येथील प्रक्षेत्र संचालक म्हणूनही काम केले.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

पाटील, जालंधर धोंडी