Skip to main content
x

पाटील, राजीव

दिग्दर्शक

२७ मार्च १९७२ - ३० सप्टेंबर २०१३

मराठीतील  अभिजात साहित्यकृती  चित्रपट माध्यमाद्वारे सामाजिक प्रबोधनासाठी प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कौशल्य असणारा एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून राजीव पाटील यांचे नाव चित्रपटसृष्टीने स्वीकारले होते. अशा या दिग्दर्शकाचा जन्म नाशिकमध्ये झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर राजीव यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. याच काळात त्यांचा प्रयोग परिवारया नाट्यसंस्थेशी परिचय झाला. अभिनयापेक्षा दिग्दर्शनाचे क्षेत्र त्यांना जवळचे वाटल्यावर त्यांनी नाटकांच्या संहितांमध्ये प्रयोगशीलता आणणार्‍या श्याम मनोहर यांची तत्कालीन प्रवाहापेक्षा वेगळी असणारी नाटके रंगमंचावर आणली. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके दिल्लीच्या महोत्सवांमध्येही दाखवली.

नाटकांमध्ये जम बसत असतानाच राजीव पाटील यांनी आपली या क्षेत्रातील कारकिर्द घडवण्यासाठी मुंबईला स्थलांतर केले. मुंबईत आल्यावर त्यांना बेधुंद मनाच्या लहरी’, ‘पिंपळपानया दूरदर्शनवरील मालिकांचे पटकथा-संवाद लिहिण्याचे काम मिळाले. बेधुंद मनाच्या लहरीही मालिका तरुणाईच्या चांगलीच पसंतीस उतरली ती अर्थात त्यातल्या स्टार कास्टबरोबरीनेच संवादांमुळे.    

छोट्या पडद्यावर यशस्वी ठरलेल्या राजीव पाटील यांनी अमोल पालेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी या आघाडीच्या दिग्दर्शकांकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. परंतु राजीव पाटील यांना चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली ती सावरखेड - एक गाव’ (२००४) या चित्रपटाच्या निमित्ताने. पदार्पणातलाच चित्रपट गाजल्यावर आत्मविश्‍वास वाढीला लागलेल्या पाटील यांनी सनई चौघडे’ (२००८) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पारंपरिक विवाहसंस्थेवर भाष्य करणार्‍या या सामाजिक चित्रपटाने प्रबोधनाबरोबरीनेच प्रेक्षकांचे मनोरंजनही केले, हे विशेष. किंबहुना राजीव पाटील या हरहुन्नरी, तरुण दिग्दर्शकाने मनोरंजनाची रूढ संकल्पना बदलत सामाजिक विषयही हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यास सुरुवात केली, हेच त्यांच्या यशामागचे खरे कारण होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

राजीव पाटील यांना यशाच्या शिखरावर नेणारा महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणजे जोगवा’. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर पाच राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटली. अर्थात पुरस्कारांचे सारे श्रेय जाते, ते राजीव पाटील यांच्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनाला. दिग्दर्शकीय दृष्टिकोनातूनच त्यांनी राजन गवस यांच्या भंडारभोगआणि उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवाया देवदासी प्रथेवर भाष्य करणार्‍या कादंबर्‍या चित्रपटासाठी निवडल्या. देवाच्या नावाने सोडलेल्या स्त्री-पुरुषांची मानसिक कुचंबणा, सामाजिक अवहेलना दाखवताना त्यांनी कलाकार निवडीचे तारतम्यही बाळगले. म्हणूनच मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये या कलाकारांनी या चित्रपटातील कथानकाला खर्‍या अर्थाने न्याय दिला. कथानकाची निवड, कलाकारांची निवड आणि त्याहीपेक्षा आजही समाजात अशा अंधश्रद्धा प्रसूत करणार्‍या परंपरा टिकून आहेत; इतकेच नाही, तर त्या जोपासण्यासाठी एक विशिष्ट वर्ग दक्ष आहे, याचे भान या चित्रपटाने व्यक्त केलेले दिसते, म्हणूनच या चित्रपटाची दखल समीक्षकांना आवर्जून घ्यावी लागली आणि सर्वार्थाने रंगलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला, हे विसरता येत नाही.

सन २०१० मध्ये आलेल्या विश्‍वास पाटील लिखित पांगिराया चित्रपटाने सामान्य शेतकर्‍यांच्या दाहक जीवनाचे चित्र रेखाटले आहे. आजच्या युगात ग्रामीण मूल्य बदलताना दिसत आहेत. ग्रामीण अर्थकारण आणि राजकारण यात बदल होत आहे. परंतु सर्वसामान्य शेतकर्‍याला ग्रामीण अर्थकारणाचा उपयोग होत नाही. समाजव्यवस्थेतला हा विरोधाभास, सामान्य माणसाचे दुष्टचक्र पांगिराच्या निमित्ताने राजीव पाटील मांडून जातात. यातूनच दिग्दर्शक या नात्याने समाजव्यवस्थेकडे पाहण्याची त्यांची संवेदनशील दृष्टी अधोरेखित होते.

पांगिराया चित्रपटाच्या यशानंतर पाटील वळले, ते गावकुसाबाहेरच्या समाजाकडे. म्हणूनच अशोक व्हटकर यांच्या ७२ मैल - एक प्रवासया आत्मकथनाचे चित्र प्रेक्षकांना देण्याचा विचार त्यांनी केला. वसतिगृहातून पळून आलेल्या मुलाचा एका अनोळखी स्त्रीबरोबरचा ७२ मैलाचा प्रवास. त्या प्रवासात आलेल्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड, स्वत:वर ओढवलेल्या प्रसंगातून अल्पवयीन मुलाचे प्रगल्भ होत जाणे, याचे हृदयद्रावक व प्रत्ययकारी चित्रण या चित्रपटात केले आहे.

सामाजिक चित्रपट देणार्‍या व प्रेक्षकांना विचार प्रवृत्त करणार्‍या या दिग्दर्शकाचे आणखी एक वैशिष्ट्य दडलेले आहे ते कलाकार निवडीत. चित्रपट चालण्यासाठी नावाजलेल्या कलाकारांना घेऊन चित्रपट करण्याची प्रथा असूनही पाटील यांनी नेहमीच नव्या चेहर्‍यांना प्राधान्य दिले. अर्थात या नव्या चेहर्‍यांनीही त्यांचा अपेक्षाभंग न करता सतत आपल्या अभिनयातून चित्रपटांना लोकप्रियता मिळवून दिली, यातही तथ्य आहे.

सामाजिक आशय संप्रेषित करणारी कथानके, त्यासाठी आवश्यक असणारी दिग्दर्शीय सूत्रे व त्याबरहुकूम काम करत यश मिळवण्यापेक्षा सामाजिक प्रबोधन करण्याची आकांक्षा या जोरावरच राजीव पाटील अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झाले. एकूणच चित्रपटसृष्टीच्या, प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढत असतानाच वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे त्यांचे निधन झाले आणि चित्रपटसृष्टीला, चित्रपट रसिकांना एक मौल्यवान व मूल्यवान दिग्दर्शक हरपण्याचे दु:ख पचवावे लागले.

- डॉ. अर्चना कुडतरकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].