पाटील-थोरात, पांडुरंग चिमणाजी
पांडुरंग चिमणाजी पाटील-थोरात यांनी १९०२मध्ये पुणे येथील कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. तेथे कृषीचा लायसेन्शिएट एल.एजी. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. पुढे कॉलेज ऑफ सायन्समधील कृषी विभाग काढण्यात आला व १९०६मध्ये कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. या महाविद्यालयाच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या बॅचमधील पहिले विद्यार्थी पाटील-थोरात हे होत. त्याच वर्षी त्यांना एल.एजी.ची पदवी प्रथम श्रेणीत प्रथम येऊन मिळाली. त्यामुळे त्यांना याच महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून अधीक्षकाची जागा मिळाली. तेव्हा त्यांनी संस्थेच्या इमारत उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. येथे त्यांनी १९०८पर्यंत काम केले. पाटील-थोरात यांची १९०८मध्ये डेक्कन विभागासाठी विभागीय इन्स्पेक्टर ऑफ अॅग्रिकल्चर म्हणून नियुक़ती करण्यात आली. तसेच पाटील-थोरात यांनी १९०८ ते १९१६ या काळात मांजरी फार्मची जबाबदारी स्वीकारली.
प्रा.नाईट १९१४मध्ये रजेवर गेल्यामुळे पाटील-थोरात यांची नाईट यांच्या जागी हंगामी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. या काळात त्यांना भारतीय असल्यामुळे संस्थेच्या निवासस्थानात राहता आले नाही. त्यांची १९१४मध्येच संस्थेच्या इतर कामांसाठी कृषी अतिरिक्त उपसंचालक नेमणूक झाली. त्यांना १९१५मध्ये उपसंचालक करण्यात आले.
पाटील-थोरात हे महाविद्यालयाचे पहिले भारतीय उपसंचालक होते. कृषी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांना उत्पादन दराचे नियोजन करण्याची संधी मिळाली. कृषि-अर्थशास्त्रातील ही नवी संकल्पना त्या वेळेस इंग्लंडमध्येही परिचित नव्हती. या नव्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ते १९२१मध्ये यू.एस.ए.ला. गेले. त्यांनी १९२२ ला कृषी-अर्थशास्त्रातील एम.एस.ची पदवी प्राप्त केली. त्यांनी उरलेल्या सहा महिन्यात यू.एस.ए., कॅनडा, जपान आणि जाव्हा या देशांतील कृषी क्षेत्र परिस्थितीचा सूक्ष्मपणे आढावा घेतला.
पाटील-थोरात भारतात परत आल्यावर त्यांना कृषी-अर्थशास्त्रज्ञाचे पद मिळाले. या जागी एखाद्या युरोपीअन व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार होती, पण डॉ.मॅन यांनी पाटील-थोरात यांच्याच नावाची शिफारस केली, परंतु शासनाच्या नियमांप्रमाणे पाटील-थोरात यांना १९२५मध्ये पुन्हा कृषी-अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करावे लागले. या पदावर ते १९३२पर्यंत कार्यरत होते. याच काळात त्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद मिळाले. त्या काळात शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य होण्याचा मान भारतीय असणाऱ्या पाटील-थोरात यांना मिळाला.
पाटील-थोरात यांनी एल.एजी. बीए.जी.च्या वर्गांना सामान्य अर्थशास्त्र, कृषी-अर्थशास्त्र, कृषी-सहकार आणि विपणन हे विषय शिकवले. त्यांनी संशोधनावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले, परंतु त्यांना ते प्रकाशित करता आले नाही. त्याच्या पुढील संशोधन करून डी.एस्सी. पदवीसाठी लागणारा प्रबंध त्यांनी सादर केला. पाटील-थोरात हे मुंबई विद्यापीठाचे डी.एस्सी. पदवी प्राप्त करणारे पहिले विद्यार्थी होते. तेव्हा त्यांना विद्यापीठाकडून मूस सुवर्णपदक मिळाले होते.
- संपादित