Skip to main content
x

पाटील, विजय

राम - लक्ष्मण

     लक्ष्मण म्हणजे विजय पाटील यांचा जन्म नागपूर येथे झाला. घरातच संगीताचे वातावरण होते. त्यांचे वडील आणि काका उत्कृष्ट हार्मोनियम वाजवत. लहानपणापासून हार्मोनियम हाताळल्याने त्यांचा स्वरांशी चांगला संवाद होता. त्यामुळे संगीतातील त्यांची गोडी वाढू लागली. वडिलांकडून त्यांनी हार्मोनियमचे धडे घेतले. भातखंडे संगीत विद्यालयातही काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. अधूनमधून ते वाद्यवृंदात वाजवायला जात.

     एकदा मुंबईचा वाद्यवृंद नागपूरला आला होता. ऐन वेळी एक वादक येऊ न शकल्याने लक्ष्मण यांनी त्याची जागा भरून काढली. वाद्यवृंदातल्या मंडळींनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले आणि घरच्यांचा विरोध पत्करून लक्ष्मण यांनी मुंबई गाठली. सुरुवातीला ते गिरगावात राहून छोट्या-मोठ्या कार्यक्रमात अ‍ॅकॉर्डियनची साथ करून पैसे मिळवू लागले. लक्ष्मण यांचे मोठे भाऊ राम (सुरेंद्र पाटील) हेही वाद्यवृंदात वाद्य वाजवत. एकदा एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी लक्ष्मण यांचे गाणे वाजवणे ऐकले. ते गाणे होते -

     ‘मी डुगीनं सांगतो तुला, काही बोलायचं नाही मला

      तुझी नी माझी जन्माची गाठ, पुढच्या वर्षाला...’

      हे ठसक्यातले गाणे दादा कोंडके यांना फार आवडले. त्यांनी या दोघा भावांना आपल्या कार्यालयामध्ये आमंत्रित करून त्यांच्याकडून गाणी ऐकली आणि पुढच्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांच्याकडे सोपवले. चित्रपट होता ‘पांडू हवालदार’. मग दादा कोंडके यांनीच या जोडीला ‘राम-लक्ष्मण’ हे नाव दिले.

     ‘पांडू हवालदार’च्या यशानंतर राजश्री प्रॉडक्शनने त्यांना संगीत दिग्दर्शन करण्यासाठी चित्रपट दिला. याच सुमारास राम यांना कावीळ झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. लक्ष्मण यांच्यावर संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी आली. पण राम-लक्ष्मण याच नावाने त्यांनी पुढची वाटचाल केली.

     हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी शंभरपेक्षा जास्त चित्रपटांना संगीत दिले. त्यातले ‘मैने प्यार किया..’, ‘हम आपके है कौन’.. या चित्रपटांचे संगीत अतिशय लोकप्रियझाले.

      मराठीत दादा कोंडके यांच्या अकराही चित्रपटांना राम-लक्ष्मण यांनी संगीत दिले. यामध्ये ‘पांडू हवालदार’सह ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आपली माणसं’, ‘दीडशहाणे’, ‘हीच खरी दौलत’, ‘ह्योच नवरा पाहिजे’, ‘सुळावरची पोळी’, ‘घरजावई’, ‘आली अंगावर’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘देवता’ अशा अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलेली गाणी लोकप्रिय झाली.

- मधू पोतदार

संदर्भ
१) पोतदार मधू, 'संगीतकार कोश', प्रतीक प्रकाशन, पुणे; २०१२.
पाटील, विजय