Skip to main content
x

पद्मावार, श्रीधर विठोबा

          श्रीधर विठोबा पद्मावार यांचा जन्म भद्रावतीपासून १८ किलोमीटरवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बेळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचा शेती हाच व्यवसाय होता. ते १९५१मध्ये तत्कालीन नागपूर विद्यापीठाच्या बी.एस्सी. (कृषी) परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम आले. परंतु ‘शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ यावर विश्‍वास ठेवून आरोग्याची दीर्घकालीन बेगमी करण्यासाठी हिमालयात हृषीकेश येथील स्वामी शिवानंदाच्या आश्रमात ते राहिले. त्यानंतर ते लोणावळा येथील स्वामी कुवलयानंद यांच्या आश्रमातही होते. या काळातील साधनेत शारीरिक, मानसिक बळ त्यांनी संपादन केले. त्यांनी १९४२च्या चले जाव चळवळीत वर्धा येथील क्रॅडॉक हायस्कूलमधील आंदोलनात विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. माफीपत्र देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना शाळा व वसतिगृह यातून काढून टाकण्यात आले. त्यांनी १९५५मध्ये गोवामुक्ती सत्याग्रहात वि.घ. देशपांडे यांच्या नेतृत्वातील ५व्या तुकडीत भाग घेतला. गोवा पोलीस प्रमुख माँटेरिओ व निग्रो सैनिकांनी त्यांचा अनन्वित छळ केला. योग साधनेतील संचितामुळे प्राप्त सहनशीलता व उच्च मनोबल यामुळे ते खरेखुरे सत्याग्रही ठरले.

          माधानच्या कस्तुरबा आश्रमात संस्कारित कमलताईंशी त्यांनी विवाह केला. अण्णासाहेब सहस्रबुद्धे, बाबा आमटे व मामा क्षीरसागर यांनी पालकत्व स्वीकारले. त्यांनी बेळगाव येथे सामुदायिक श्रमशेतीचा पुरुषार्थी प्रयोग  सफल केला. आत्मनिर्भर बेळगावच्या (विदर्भ) ग्रामोन्नतीचे ते शिल्पकार ठरले. ५ वर्षांच्या सामूहिक प्रयत्नातून बेळगाव आदर्श ग्राम झाले. तेथे शाळा व ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. तलाव खोल करून कायम पाण्याची व्यवस्था केली, तसेच गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी  वाढली. आखाडा बांधला, वृक्षारोपणावर भर दिला. गावात प्रवेश करण्यासाठी पक्का रस्ता श्रमदानाने बांधून काढला. वरील सर्व कामांमुळे बेळगाव, अविभक्त चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांनी कृष्णमूर्ती मिरमिरा यांच्या ग्रामोदय संघाचे विश्‍वस्त म्हणून काम केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अधिक धान्य पिकवा मोहीम आली. त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र, शेतीला आवश्यक जोडधंदे आणि उत्पादनवाढ यांचा सर्वांगीण अभ्यास करून ते सर्व अमलात आणले.

          पद्मावार यांचा जनावरांच्या वंशसुधारणेवर भर आहे. ते सेंद्रिय शेती व दुग्धोत्पादन यांचा आग्रह धरतात. पाणीपुरवठ्यासाठी विहिरी बांधण्यासाठी ते आग्रही आहेत. आपण निलगिरीची लागवड स्वीकारली पाहिजे, असे श्रीधररावांचे मत आहे. चंद्रपूर-गडचिरोली वनव्याप्त प्रदेश आहे, पाऊस भरपूर पडतो, त्यामुळे वनशेतीला प्राधान्य हवे. बल्लारपूर इंडस्ट्रीजसारखा मोठा ग्राहक असल्यामुळे ज्या झाडांपासून कागदाचा लगदा तयार होतो, त्या झाडांची लावणी मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. बियाण्यांचे उत्पादक म्हणून त्यांचा लौकिक आहे. एच-४ जातीचे कापूस बियाणे सतत २५ वर्षे तयार केले. त्यांनी संकरित ज्वारी, भेंडी, तूर आणि जंगली वांगी यांचे बी वेळोवेळी तयार केले आहे.

          पद्मावार यांच्यासोबत त्यांचा मुलगा गिरीश शेती व्यवसायात उतरला आहे. मुलगा गिरीश व मुलगी सुषमा हे दोघेही बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात सहभागी झाले होते.

- मदन धनकर

पद्मावार, श्रीधर विठोबा