Skip to main content
x

पेंडसे, विनायक विश्वनाथ

      “आमच्या देशात बुद्धिमत्तेची कमतरता नाही तथापि बुद्धीचा सदुपयोग करणं आम्ही विसरतो आहोत.... आपण हे काम अतीव कौशल्याने करता आहात यासाठी आपल्याला मी धन्यवाद देतो.”

      भारताचे पंतप्रधान हे आप्पांच्या शैक्षणिक कार्यासंबंधी सांगत होते. प्रसंग होता मोरारजी देसाई यांनी २१ सप्टेंबर १९७१ रोजी संस्थेला दिलेल्या भेटीचा! विनायक पेंडसे तथा अप्पा यांचा जन्म पुणे येथे झाला. शाळेत श्री. म. माटे, पु. ग. सहस्त्रबुद्धे असे नामवंत शिक्षक आप्पांची घडण करत होते, तर घरी प्रखर राष्ट्रवादाची बीजे अंकुरण्यास पोषक अशी पुस्तके त्यांना वाचायला मिळत होती.

     अब्दुल रशीदने स्वामी श्रद्धानंदांचा गोळ्या घालून खून केल्याचे वृत्त आले नि आप्पांना मोठा धक्का बसला. काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले, खिलाफत चळवळीतही सहभागी झालेले हे दयानंद शिष्य हिंदूकरणाचे महत्त्व जाणून त्या कामात हिरिरीने पडले होते. अशा या नेत्याचा, त्याच्या आजारपणात जो अमानुष खून करण्यात आला त्याचा बालमनावर खोल आघात होऊन त्यांनी ‘मी श्रद्धानंदांची जागा घेईन! त्यांचं अपुरं काम मी पूर्ण करीन!’ ही प्रतिज्ञा उत्स्फूर्तपणे घेतली.

     लाला लजपतराय यांनी स्थापलेली ‘बालचर सेना’ ही पुण्यात पोचली होती. भाऊसाहेब देशमुखांनी यावेळी टिळक पथक सुरु केले. त्यात शिस्तीचे धडे गिरवणारे आप्पा शिवचरित्राची पारायणे करुन झपाटले होते. त्याच प्रेरणेतून बारा वर्षाचे आप्पा गोव्यात शिबिर घेण्यासाठी बालरचनेता म्हणून गेले! आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या मंडळींचे हे प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे पार पाडून आप्पा नवा आत्मविश्‍वास घेऊन पुण्यात परतले.

     १९३६ मध्ये फैजपूर काँग्रेसला आप्पा भगिनी (तारुताई) सह गेेले होते. परत येताना गाडीत डॉ. हेडगेवार यांची गाठ पडली. आप्पांनी १९३३ पासूनच संघ शाखेवर जाणे सुरु केले होते.

     देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघशाखांवर शिस्तबद्ध युवक तयार होत होते. इतकेच नव्हे तर त्यात क्रांतिकार्याचा, शस्त्रसंग्रहाचा विचार करणारे अनेक गट होते. आप्पांचा गट तर १० मे १९४० ला खास क्रांतिदिनी स्थापन झाला होता. काही शस्त्रे मिळविण्यासाठी आप्पांनी थेट खैबर खिंडीपर्यंत प्रवास केला. रणजितसिंगांचा महाप्रतापी सरदार हरिसिंह नलुआची माहिती गोळा करण्याचे कामही झाले व पुढे ते चरित्रही आप्पांनी लिहून प्रसिद्ध केले.

     हा समाज आसेतु हिमाचल संघटित करण्याचे महत्त्वही इतिहास अध्ययनातून आप्पांच्या हृदयात ठसले होते म्हणून संघाच्या आदेशाप्रमाणे आप्पा थेट आंध्रात मच्छलीपट्टण येथे प्रचारक म्हणून गेले. दरम्यान देशाची फाळणी होऊन स्वातंत्र्य आले. म. गांधी हत्या, संघ बंदी व त्यानंतरचा कारावास भोगून आप्पा पुण्यास परतले.

      स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बाजूस टाकलेले शिक्षण आप्पांनी पुनश्‍च सुरू केले. ते बी. एस्सी. व एम.एड. झाले होते. त्यांचे शास्त्रगणिताचे अध्ययन झाले होते व अनेक स्वयंसेवकांना हे विषय ते सोपे करून शिकवत होतेच. तरीही शिक्षणशास्त्रातील उच्च पदवी मिळवून त्यांनी विद्यावाचस्पती पदवीसाठी त्यांच्या आवडीचा नेतृत्व हा विषय घेतला. हुकुमशाही, लोकशाही व सहविचारात्मक नेतृत्वपद्धतींमधील नेत्यांची कार्यशैली याचे प्रयोगाधिष्ठित अध्ययन करून आप्पांनी मानस विद्यावाचस्पती ही उच्च पदवी प्राप्त केली. बरोबर पुणे विद्यापीठात मानसशास्त्राचे अध्यापनही त्यांनी केले. सेवादल संस्थापक डॉ. हर्डीकरांच्या जन्मशताब्दी निमित्त योजलेल्या अखिल भारतीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन आप्पांनी भारतातील युवक संघटनांचा अभ्यास करून जो निबंध लिहिला त्याला प्रथम पारितोषिक मिळाले होते.

      स्वातंत्र्यात युवक संघटनांची नव्याने मांडणी व्हावी हे आप्पांना आवश्यक वाटत होते. त्यासाठी त्यांनी संघाच्या सरसंघचालकांना एक शारीरिक शिक्षणाची नवीन रूपरेषाही सादर केली.

      युवक संघटनांचा अभ्यास, नेतृत्वशैलींचे शास्त्रीय अध्ययन, बुद्धिमत्तेचे स्वरूप कसे असते त्याचे शास्त्रीय संशोधन; संघातील युवककार्याचा निदान २५ वर्षांचा अनुभव; या साधन सामुग्रीसह आप्पांना देश घडविण्यासाठी जे व्हावे असे उत्कटत्वाने भावत होते, ते आपणच का करू नये असे वाटू लागले अन् ज्ञान प्रबोधिनीची स्थापना झाली.

      ८ ऑगस्ट १९६२ या दिवशी ज्ञानप्रबोधिनीचे कार्य सुरू झाले. आरंभी १४० बुद्ध्यांकाचे विद्यार्थी निवडून घेण्याचे, सायंकाळी तासभर खेळ आणि नंतर दोन तासिका शालेय विषयांचे अध्यापन करण्याचे तंत्र या प्रबोध शाळेसाठी योजले होते. आठवीत घेतलेले विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला अशोक निरफराके यासारखा पुण्याच्या पूर्वभागातील विद्यार्थी चमकला !

      अशा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी जीवन देशकार्यार्थ झोकून द्यावे या अपेक्षेने अप्पांनी या सुमारास समर्पणाचा आदर्श असे ‘विवेकानंद कन्या निवेदिता’ हे पुस्तक लिहिले. १९६८ मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या संघटनेच्या मान्यतेने ज्ञा. प्रशालेचा प्रारंभ झाला. आप्पांचे आणि त्यांच्या विद्यार्थिनी डॉ. उषा खिरे, डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ. अशोक निरफराके इ. नी १४० बुद्ध्यांकाचा निकश कालबाह्य ठरवून १२० पैलूंच्या आधारावर प्रबोधिनीचे प्रवेशाचे तंत्र सुरू केले. त्यासाठी डॉ. गिलफर्डने मांडून ठेवलेल्या या पैलूंचे प्रत्यक्ष मोजमाप करणार्‍या शास्त्रीय चाचण्या प्रज्ञा मानस संशोधिकेद्वारा विकसित केल्या व डॉ. गिलफर्ड यांच्याकडून त्यासाठी प्रशंसा प्राप्त केली. प्रबोधिनी अशा प्रकारे शिक्षणाच्या आणि मानसशास्त्र संशोधनाच्या जागतिक नकाशावर दिसू लागली. युरोपचा प्रवास करून आप्पांनी इंग्लंड, फ्रान्स इ. देशातील शिक्षण पद्धती पाहिली व आपल्या कल्पनांचे वेगळेपण त्यांना अधिकच भावले !

     प्रबोधिनीने पूज्य विनोबांच्या प्रेरणेने देवनागरीतून इंग्रजी शिकवण्याचा, दोन इयत्तांचे इंग्रजीचे अध्यापन एका वर्षात करण्याचा, वाचन  वेगाचा असे अनेक प्रयोग यशस्वी केले. स्वतंत्र इतिहास पाठ्यपुस्तके शिक्षकांनीच लिहून तयार केली. मातृभाषेच्या अध्यापनावर भर दिला. देशप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी विविध विषयांचे अध्यापन व्हायला हवे असे उद्दिष्ट ठरवले, तास आवश्यक केले. प्रकल्पांची कल्पना अगदी प्रारंभापासून राबवली.

     देशप्रश्‍नांचा केवळ पुस्तकी अभ्यास कामाचा नाही, म्हणून तमिळनाडूतील हिंदी विरोधी आंदोलन, नागा बंडखोरी, बिहारचा भूकंप, राजस्थानमधील सती प्रकरण, कोयना भूकंप, गुजरातमधील जलप्रलय, पंजाबमधील भिंद्रनवाले यांनी उभे कलेले शिखिस्तानचे संकट अशा प्रसंगी विद्यार्थी त्या त्या राज्यात गेले व त्यांनी केवळ अभ्यासच केला नाही तर त्यावर आपापल्या कुवतीप्रमाणे तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला. पुढे दोन वर्षे दोन युवती पंजाबात ठाण मांडून राहिल्या, पंजाबी विद्यार्थी महाराष्ट्रात घेऊन आल्या. प्रखर देशभक्ती त्यांच्यात निर्माण व्हावी असा प्रयत्न चालू ठेवला. बुद्धिमान वा प्रगत मुलांसाठी शिक्षण व्यवस्था करून न थांबता उपेक्षितांसाठी साखरशाळा, हरयानात जाऊन भट्टी शाळा, वनवाशांसाठी १०० दिवसांची शाळा अशा प्रकारे अभिजनांपासून सामान्यांपर्यंत सर्वत्र शिक्षणाची व्यवस्था उभी करण्यात प्रबोधिनीस यश आले. प्रकल्प पद्धतीचा आग्रह अगदी प्रबोध शाळेपासून सुरू झाला. तो आता सार्वत्रिक झाला आहे. अशा प्रकारे प्रबोधिनीच्या कल्पनांना समाजमान्यतेबरोबर शासनानेही स्वीकृती दिल्याचे दिसते.

     विद्याव्रताचा प्रबोधिनीचा संस्कार हा व्यक्तिमत्त्व विकसनाचा संस्कार! व्यक्तिमत्त्व विकसनाचा हा विषय शाळांमध्ये सरकारने समाविष्ट केला आहे. शिक्षण, संशोधन, उद्योग यांचे परस्कर पूरकत्व ध्यानी घेऊन आप्पांनी प्रज्ञा मानस संशोधिका, संस्कृत-संस्कृति-संशोधिका, आयुर्वेद संशोधिका व ‘शैक्षणिक उपक्रम संशोधिका’ अशा संशोधिका उभारल्या.

     उद्वाहक, खांडसरी धारक, यंत्रशाळा असे छोटे उद्योगही उभारले व अर्थस्वावलंबनासह माणसांची अनुभव समृद्धीही साधण्याचा प्रयास केला. जीवनाच्या सर्व क्षेत्रात चांगले नेतृत्व लाभले तर देशाचा हवा तसा विकास होऊ शकतो. म्हणूनच प्रबोधिनीमध्ये नेतृत्व म्हणजे राजकीय नेतृत्व असा मर्यादित अर्थ घेतलेला नाही. प्रत्यक्ष प्रशासनात प्रभावी कार्य करून दाखविल्यानंतर तसे प्रशासक घडविण्याचे काम आणखी एक प्रबोधक आज करतो आहे.

      मानस विद्या वाचस्पती आप्पा पेंडसे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचे नित्यवर्धमान असलेले  स्वरूप म्हणजे लवकरच सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारे ज्ञान प्रबोधिनीचे वर्तमान कार्य! काश्मिरातील संगणक शिक्षण वर्ग, पूर्वाचलातील शिक्षक प्रशिक्षण वर्ग आजही चालू आहेत.

     सुप्रसिद्ध लेखक डॉ. वि. रा. करंदीकर, संस्कृत व मराठीचे आधुनिक वैयाकरण प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर, आप्पा सोहोनी अशा अनेकांना आप्पांनी शिकण्यास प्रवृत्त करून त्यांना जीवनात प्रतिष्ठित केले.

- यशवंतराव लेले

संदर्भ
१.भिशीकर स्वर्णलता;‘ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक वि. वि. पेंडसे’
पेंडसे, विनायक विश्वनाथ