Skip to main content
x

पई, रत्नाकर शांताराम

           यपूर गायकीशी एकनिष्ठ राहून श्रद्धेने आणि इमानाने गाणारे गायक रत्नाकर शांताराम पई यांचा जन्म सावंतवाडी येथे झाला. वडिलांना गायनाची आवड होती. त्यांच्या आईचे नाव रमाबाई होते. रत्नाकर पई यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. शाळेत, तिसर्‍या इयत्तेत शिकत असतानाच त्यांचे गाणे उ. अब्दुल करीम खाँसाहेबांचे शिष्य बेहेरेबुवा यांनी ऐकले. बेहेरेबुवा हे त्याच शाळेत संगीत शिक्षक होते. ‘‘तुला मोठी मंडळी गातात तसं गायचं असेल तर पद्धतशीर गाणं शिकायला हवं,’’ असे बेहेरेबुवांनी सांगितले, आणि रत्नाकर पई यांचे शालेय शिक्षणाबरोबर गायनाचे शिक्षणही सुरू झाले.
       रत्नाकर पई यांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण बेहेरेबुवांचेच शिष्य एन.एल. रानडे यांच्याकडे सुरू झाले. पुढे बेहेरेबुवा कोकणात गेल्यामुळे रानडे यांच्यानंतर रत्नाकर पई मोहनराव पालेकर यांच्याकडे शिकू लागले. रानडे कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी अलिबागला गेले ते परत आलेच नाहीत; त्यामुळे रत्नाकरांच्या वडिलांनी पालेकरांनाच त्यास तालीम देण्याची विनंती केली. रत्नाकर पई १९४१ पासून यांना मोहनराव पालेकरांची तालीम सुरू झाली. मोहनराव पालेकर हे जयपूर घराण्याचे विद्वान गायक आणि अनवट बंदिशीतील मर्मज्ञ जाणकार. मोहनरावांनी जहांगीर खाँसाहेबांचे नातू अहमदभैया यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची पक्की तालीम घेतली होती. १९४१ ते १९६२ अशी जवळजवळ अठरा वर्षे रत्नाकर पईंनी मोहनराव पालेकरांकडून तालीम घेतली. रत्नाकर पईंचे गायन शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणही सुरू होते. मॅट्रिक झाल्यानंतर सिडन्हॅम महाविद्यालयामधून त्यांनी मुंबई विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर वडील ज्या कंपनीत काम करत होते, त्याच म्हणजे फोर्ब्स अ‍ॅण्ड फोर्ब्स कंपनीत त्यांनी नोकरी केली.
      मोहनराव पालेकरांचे १९६२ साली निधन झाले, त्यानंतर रत्नाकर पईंनी जयपूर घराण्याचे गायक गुलूभाई जसदनवाला यांच्याकडे तालीम घेतली. गुलूभाई हे व्यापारी क्षेत्रातले, गाणे हा त्यांचा शौक होता. गुलूभाईंनी प्रथम मंजी खाँसाहेबांची व त्यानंतर अल्लादिया खाँसाहेबांची तालीम घेतली होती. जवळजवळ तीन हजारांच्या आसपास बंदिशी त्यांच्या संग्रहात होत्या. रत्नाकर पई यांची गायकी व बंदिशींचा संग्रह गुलूभाईंच्या तालमीमुळे अधिक  समृद्ध झाला.
     गुरुजनांकडून मिळालेल्या परंपरागत अभिजात आणि अवघड गायकीचे जतन करून, कुठल्याही प्रकारची भेसळ न करता ती सातत्याने व श्रद्धेने मांडणे हे रत्नाकर पईंचे योगदान होय. जयपूर गायकी ही बुद्धिप्रधान गायकी. रत्नाकर पईंनी या श्रीमंत गायकीचा बोज व आब राखून, करमणुकीच्या वा रंजकतेच्या पातळ थरावर  येऊ न देता पेश केली. त्यांच्याकडे वेगवेगळ्या रागांतील व तालांतील विविध बंदिशींचा प्रचंड संग्रह होता. मेघावली, गोधनी, बरारी, कौशी बहार, बागेश्री बहार, बसंती केदार, तसेच कानडा व नटाचे असंख्य प्रकार त्यांच्या संग्रहात होते. आमराग, अनवट राग, जोडराग,  ते सहजपणे मांडत. रत्नाकर पई म्हणजे जयपूर घराण्याच्या राग-बंदिशींचा महाकोषच होते.
     पातळ, सुरेल व टोकदार आवाज, बंदिशींची काटेकोर मांडणी, आडलयीशी सतत चाललेला खेळ, लयीला लपेटून अनाघाती आलापी आणि बलपेचाच्या दुहेरी पेडाच्या गुंतागुंतीच्या ताना हे पईंच्या गायनाचे वैशिष्ट्य; परज, पटबिहाग, डागोरी इत्यादी रागांत ते अधिक खुलत. ते १९६७ पासून मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात जयपूर घराण्याचे उस्ताद म्हणून कार्यरत होते. आकाशवाणीवर ते ‘ए’ ग्रेड कलावंत होते. त्यांना १९९५ साली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला. त्यांना २००१ साली आयटीसी संगीत रिसर्च अकॅडमीचे पारितोषिक मिळाले.
       अनेक जणांनी त्यांच्याकडून तालीम घेतली, तसेच मार्गदर्शनही घेतले. त्यांच्या प्रमुख शिष्यांत पं. जितेंद्र अभिषेकी, नरेंद्र कणेकर, अश्विनी भिडे-देशपांडे, मिलिंद मालशे, भालचंद्र टिळक यांचा समावेश आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

माधव इमारते

पई, रत्नाकर शांताराम