Skip to main content
x

पळशीकर, सुहास प्रभाकर

     तनी शक्ती हमे देना दाता.. मनका विश्‍वास कमजोर ना हो’ ही गाजलेली प्रार्थना असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटातल्या भूमिकेने सुहास पळशीकर प्रकाशझोतात आले. पळशीकरांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. त्यांच्या आई कमल आणि वडील प्रभाकर यांच्यासह घरात अभिनयाची कुठलीच पार्श्‍वभूमी नव्हती. मात्र राधाबाई पळनीटकर प्रशालेत शिकत असतानाच ते अनेक एकांकिकेतही काम करत होते. तेव्हा ते नाट्यस्पर्धेतही भाग घेऊ लागले. शालेय स्तरांवरच्या अनेक स्पर्धांमधून त्यांना अभिनयासाठी बक्षिसे मिळाली. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी हैद्राबादच्या विवेकवर्धिनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.ए. इंटरला असताना राज्य नाट्यस्पर्धेसाठी सॅम्युअल बेकेट यांचे ‘वेटिंग फॉर गोदो’, हे नाटक बसवले होते. या नाटकातील भूमिकेसाठी सुहास पळशीकर यांना अभिनयासाठी रौप्यपदक मिळाले. या नाटकाला १३व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले अभिनेते श्रीराम लागू यांनी सुहास पळशीकर यांचे विशेेष कौतुक केल्याने सुहास यांना प्रोत्साहन मिळाले. अभिनयातल्या या गुणवत्तेने त्यांना युनियन बँकेत नोकरी मिळाली आणि त्यानिमित्ताने पळशीकर मुंबईला स्थायिक झाले.

     सुहास पळशीकर युनियन बँकेतल्या नोकरीबरोबरच नाटकांतून आणि एकांकिकांमधून अभिनय करत होतेच. याच काळात ‘अंकुश’ या चित्रपटासाठी कलाकार निवडण्यासाठी आणि चित्रपटनिर्मितीसाठीच्या बैठका सुरू होत्या. अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी या बैठका होत होत्या. नीलकांती पाटेकरही युनियन बँकेत नोकरी करत असल्याने त्यांनी सुहास पळशीकर यांना एन.चंद्रा यांस भेटण्यास सुचवले आणि ‘अंकुश’मधल्या ‘लाल्या’च्या भूमिकेसाठी सुहास पळशीकर यांची निवड झाली. हा चित्रपट खूप गाजला आणि अभिनेता म्हणून सुहास पळशीकर यांनाही नावलौकिक मिळाला.

    ‘अंकुश’नंतर ‘गुरुदक्षिणा’, ‘प्रतिघात’, ‘कर्मयोद्धा’, ‘चांदनी बार’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचबरोबर ‘ओटी खणानारळाची’, ‘दुर्गा आली घरा’, ‘धुडगूस’, ‘सुपारी’, ‘चकवा’, ‘एक मराठी माणूस’, ‘येळकोट येळकोट जयमल्हार’, ‘धो-धो पावसातली वन डे मॅच’, ‘गाभारा’, ‘मी सिंधुताई सपकाळ’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांपैकी ‘सुपारी’ व ‘गाभारा’ या चित्रपटांतल्या भूमिकांसाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेते म्हणून महाराष्ट्र शासनाचे पारितोषिकही मिळाले. याबरोबरच त्यांचा नाट्यप्रवासही सुरूच होता लेखक सुरेश जयराम यांचे प्रकाश बुद्धिसागर दिग्दर्शित ‘डबलगेम’ हे त्यांची भूमिका असलेले गाजलेले नाटक. त्यांनी या नाटकाचे १२९ प्रयोग केले. भक्ती बर्वे या प्रख्यात अभिनेत्रीची भूमिकाही या नाटकात होती. कुमार सोहनी दिग्दर्शित ‘कुणीतरी आहे तिथे’ हेही त्यांचे गाजलेले नाटक होते. सुहास पळशीकर यांच्या अभिनय कारकिर्दीत वसंतराव गोडसे यांना ते गुरू व मार्गदर्शक मानतात.

    ‘निष्पाप’, ‘मी जिंकलो मी हरलो’ यांसारख्या अनेक दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी केलेले काम निश्‍चितच उल्लेखनीय होते.

    तृप्ती भोईर लिखित आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘टूरिंग टॉकीज’, रमेश मोरे यांचा ‘शूर आम्ही सरदार’, गजानन कुलकर्णी यांचा ‘आभास’ आणि ‘आमरान’ त्याचबरोबर मंदार शिंदे यांच्या ‘ध्यास’ या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. अनेक वर्षानंतर ‘किडनॅप’ या नाटकांद्वारे ते पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. 'रंगा पतंगा', 'रेती', 'सरकार 3', 'भावेश जोशी सुपरहिरो' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. 

- सुजाता कार्यकर्ते

पळशीकर, सुहास प्रभाकर