पोशट्टीवार, अण्णासाहेब राजेश्वर
अण्णासाहेब राजेश्वर पोशट्टीवार यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूर येथील तळोधी गावात झाले, तर माध्यमिक शिक्षण ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे झाले. त्यापुढे त्यांनी नागपूर येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयातून इंटरमीडिएटचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचा कल शेतीसोबतच शेतीला पूरक व्यवसायाकडे होता. मोठे भाऊ प्रभाकर पोशट्टीवार यांचे अचानक निधन झाल्यामुळे १९५७मध्ये कुटुंबाची जबाबदारी अण्णासाहेबांना स्वीकारावी लागली. शेतीची लहानपणापासूनच आवड व जनावरे पाळण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी लवकरच व्यवस्थित बस्तान बसवले. त्यांनी त्याच वर्षी तळोधी येथे राइस मिल सुरू केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करून व त्यापासून उत्तम प्रतीची तांदूळनिर्मिती करून नागपूर येथील धान्यबाजारात त्यांनी विक्री केली. त्या वेळच्या मध्य प्रदेशात १९५०च्या दरम्यान धानाचा ‘लुचाई’ हा वाण प्रचलित होता. या वाणाची तळोधी परिसरात लागवड व्हायची, परंतु अण्णासाहेबांचा शुद्ध बियाणे वापरण्यावर भर असल्यामुळे तोच वाण पुढे ‘तळोधी लुचाई’ म्हणून जनमानसात रुजला. ऊस, हळद, फळपिके, आंबा, संत्री इ. औषधी वनस्पती, वनशेती यांवर त्यांचा भर होता. त्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळत होते. त्यांनी १९६४मध्ये आपल्या शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यावर स्वखर्चाने बंधारा बांधून आपली, तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पडीक जमीन ओलिताखाली आणली. या नवनवीन यशस्वी प्रयोगांमुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये शेतीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला. परिणामी पारंपरिक शेती पद्धतीमध्ये योग्य बदल दिसू लागला. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यांना या कामाची पावती म्हणून १९७४मध्ये मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या हस्ते शेतिनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांनी खोब्रागडे यांच्या एच.एम.टी. या भाताच्या जातीचा प्रसार व चिनोर जातीची प्रायोगिक चाचणी व बीजोत्पादन कार्यक्रमही घेतले.
पोशेट्टीवार यांनी गांडुळखत निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्यांनी भातशेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केला आणि सेंद्रिय शेतीमुळे उत्पन्नात कमतरता येत नाही हे तळोधी भागातील शेतकऱ्यांना दाखवून दिले. त्यामुळे या भागात शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. नवोदय विद्यालयाच्या स्थापनेनंतर शाळेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, तेव्हा अण्णासाहेबांनी स्वतःच्या शेतामधील विहीर शाळेच्या विहिरीला जोडून प्रश्न कायमस्वरूपी सोडवला. सध्या ते यादवराव पोशट्टीवार शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. अण्णासाहेबांच्या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी शशिकलाताई यांची उत्तम साथ मिळाली. तसेच बियाणा निर्मितीमध्ये त्यांचे सहकारी गुलाबराव तुळशीराम शेंडे व परिसरातील शेतकऱ्यांची योग्य साथ मिळाली.