प्रभुदेसाई, विठ्ठल बाबू
डॉ.विठ्ठल बाबू प्रभुदेसाई यांचा जन्म गोमंतकातील काणकोण जिल्ह्यातील खरगाळी गावी झाला. मूळचे ते त्याच गावचे. प्रारंभीचे शिक्षण पोर्तुगीजमध्ये झाल्यानंतर पुढे कारवार येथून ते मॅट्रिक झाले व नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात पदवी घेतल्यावर नागपूर विद्यापीठाची एम.ए.पदवी त्यांनी प्राप्त केली. मुंबईला राहून त्यांनी ज्येष्ठ संशोधक अ.का.प्रियोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सतराव्या शतकातील गोमंतकी बोली’ या विषयावर पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. जेजुइतांनी सतराव्या शतकात लिहिलेल्या मराठीच्या गोमंतक बोलीतील वाङ्मयाचे चिकित्सक विश्लेषण त्यांनी प्रबंधात केले आहे. हा प्रबंध पुस्तकरूपाने छापून झाल्यावर त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
मडगावच्या चौगुले महाविद्यालयात मराठी विभाग-प्रमुख म्हणून दोन वर्षे काम केल्यावर ते नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणून रुजू झाले आणि त्याच विद्यापीठातून मराठी विभाग-प्रमुख पदावरून १९९२ मध्ये निवृत्त झाले.
त्याचे संशोधन मुख्यत्वेकरून पोर्तुगीज साहित्यिकांनी मराठीत केलेली वाङ्मयरचना आणि भारतीय प्राचीन ग्रंथ यांचे समीक्षात्मक टीका-टिप्पणी करणारे आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभारोहण प्रसंगीचे (१९७१), पाद्री मिंगेल द आल्मैद कृत वानवळ्यांचो मळो (१९७४), शांतानंद शिष्य विरचित क्रिस्ताचे यातनागीत (१९९०), कविनंदनविरचित उषाहरण कथा (१९६५), विप्रविश्वनाथविरचित अभिमन्यु विवाहो (१९७२) आदी ग्रंथ त्यांनी संपादीत केले. मराठी संशोधन मंडळातील सूक्ष्मपटांची सूची त्यांनी १९७८मध्ये तयार केली. गोवा शासनाने त्यांना २००९ मध्ये जीवनगौरव पुरस्कार दिला.
- डॉ. सुभाष भेण्डे